मुंबई : मुंबई आमची आहे. आम्हाला ती मोदी-शहा आणि त्यांच्या व्यापारी मंडळीच्या ताब्यात सोपवायची नाही. मुंबई मराठी माणसाकडेच राहील असे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (१६ ऑगस्ट) सांगितले. (Raut slams Shah-Modi)
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, राऊत यांनी हे विधान केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. (Raut slams Shah-Modi)
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेने कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. नाशिकला येत्या काही दिवसात मोर्चा निघणार आहे. नाशिकमध्ये ड्रग्जची बजबजपुरी माजली आहे. कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे. तिथे शिवसेना-मनसे एकत्र येऊन विराट मोर्चा काढणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
फडणवीसांचे कारस्थान
बेस्टच्या पतपेढी निवडणुकीची जबाबदारी भाजपने प्रसाद लाड यांच्यावर दिली आहे. याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट ज्यांच्याकडे होते आणि ज्यांनी त्यांच्या पगाराचे पैसे लुटले, ते आता पतपेढी लुटायला निघाले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नये यासाठी फडणवीस कारस्थान करत आहेत. ते सातत्याने मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पतपेढीवर शिवसेना-मनसे एकत्र येऊन लढत आहे, त्याचा नक्की परिणाम दिसेल, असेही राऊत म्हणाले. (Raut slams Shah-Modi)
शिंदे नेते नव्हेत
एकनाथ शिंदे हे नेते नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद आहे. एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणे बंद केले तर कार्यकर्तेही निघून जातील, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत विचारले असता राऊत तसे स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे काही नेते नाहीत. ते ठाण्याचेही नेते नाहीत. कोपरी-पाचपाखाडी, टेंभी नाक्याचेही नेते नाहीत. ज्या दिवशी ईडी त्यांचे पैसे जप्त करेल, त्यांच्या संपत्तीवर टाच आणेल, त्या क्षणी ते एकटे राहतील, असा इशाराही राऊत यांनी दिला.