सतीश घाटगे : कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ५० टक्के महिलांना आरक्षण, जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असतानाही कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीसाठी सभागृहात एकही महिला उपस्थित नव्हती हे दुर्दवी चित्र पहायला मिळाले. महिलांना राजकारणात मोठी संधी दिली असताना जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिलांसाठी त्यांचे पती मात्र आरक्षण सोडतीच्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, पण सरकारी महिला कर्मचारी, महिला पत्रकाराशिवाय एकही महिला सभागृहात उपस्थित नसल्याचे दिसून आले. (Women’s backs on reservation lottery)
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज सोमवारी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीला उपस्थित राहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी आणि इच्छुक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीत महिला मोठ्या प्रमाणांवर संधी असताना ज्या महाराणी ताराराणी यांच्या नावाने सभागृह आहे तिथे एकही महिला आरक्षण सोडतीसाठी उपस्थित नव्हती. (Women’s backs on reservation lottery)
जिल्हा परिषदेचे निम्मे सभागृह महिलांचे असणार आहे. पहिली अडीच वर्षे महिलांसाठी अध्यक्षपद आरक्षित झाले आहे. तरीही सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षातील एक महिला पदाधिकारी आरक्षण सोडतीच्यावेळी उपस्थित नव्हती. महिलांच्या अनुपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. (Women’s backs on reservation lottery)
एकीकडे महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असते. गतवर्षी झालेल्या निवडणूकीत मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना गेमचेंचर ठरली होती. महिलांनी उत्फुर्तपणे भाग घेतला होता. राजकीय पक्ष महिलांसाठी महिला बचत गटाचे मेळावे, होम मिनिस्टर, कुंकुममार्चन या कार्यक्रमांसाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पण महिलांना राजकारणात मोठी संधी असलेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीच्यावेळी राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखवली होती. राजकारणात महिला संधी मिळावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना संधी मिळावी यासाठी ३३ वर्षापूर्वी महिलांसाठी आरक्षण सुरू झाले. सुरवातीला असलेली ३३ टक्के आरक्षणांची मर्यादा ५० टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना राजकारणात चांगली संधी मिळत आहे. पण राजकीय पक्ष कर्तुत्ववान महिलांना संधी देण्यासाठी ऐवजी राजकारणातील प्रस्थापित घराण्यातील महिलेला संधी देत असल्याने खरोखरच महिलांना संधी मिळते का संशोधनांचा विषय झाला आहे. आज झालेल्या जिल्हा परिषद आरक्षण सोडतीच्यावेळी महिलांऐवजी त्यांच्या घरातील ‘कर्तुत्ववान’ पुरुष मंडळीच उपस्थित होते. महिला आरक्षण हे कागदावरच राहणार असल्याचे चित्र सोडतीच्यावेळी पहायला मिळाले. निवडणूकीच्या रिंगणात पुरुषप्रधान घरातील ‘तडफदार’ महिला रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.