मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या धाकट्या भावजय प्रिया यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माझे फसवून लग्न लावले. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मला धमक्या देण्यात आल्या. बलात्कार करण्यासाठी तुझ्या घरी माणसे पाठवू अशी धमकीही दिली गेली, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. (Priya Fuke alleges)
प्रिया या परिणय फुके यांचे धाकटे बंधू संकेत यांच्या पत्नी आहेत.
प्रिया फुके यांनी केलेल्या आरोपांमुळे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.(Priya Fuke alleges)
त्या म्हणाल्या, “फुके घराण्यातील सर्वांत धाकटे पुत्र संकेत यांच्याशी २०१२ मध्ये लग्न झाले. २०२२ मध्ये माझ्या पतीचे निधन झाले. आमच्या कुटुंबाची फसवणूक करून ते लग्न झाले होते. लग्नाच्या दोन वर्षे आधी संकेत फुकेंवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. आम्हाला त्याची कल्पना दिली नव्हती. लग्नानंतर काही महिन्यांनी माहिती मिळाल्यावर त्यांना विचारले. त्यावर त्यांनी बाहेर वाच्यता केलीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला इजा पोहोचवू. घाणेरड्या पद्धतीने धमक्या दिल्या. बलात्कार करण्यासाठी तुझ्या घरी माणसं पाठवू अशी धमकीही दिली.”(Priya Fuke alleges)
संकेत फुके यांच्या निधनानंतरही मला त्रास दिला जात होता. संपत्तीवरून वाद होत होते. त्यातच एके दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास सासरकडच्या मंडळींनी मला घराबाहेर काढले. आजही ते लोक त्रास देतात. माझ्या घरी लोक पाठवले जातात. जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मी येथे आले तेव्हाही दोघेजण मागावर होते, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली नाही
मुख्य्यमंत्र्यांकडे यासंदर्भात मी दाद मागितली, पण त्यांनीही दखल घेतली नसल्याचे सांगून प्रिया फुके म्हणाल्या, गेल्या दीड वर्षांपासून लढतेय. पोलीस ठाण्यात हेलपाटे मारतेय, मुख्यमंत्र्यांसह राजकारणातील अनेक भावांना भेटले, मदत मागितली. मात्र कोणीही माझ्यासाठी उभे राहिले नाही. मात्र, सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे या माझ्यासाठी पुढे आल्या, याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.