गोकुळमध्ये सतेज पर्व

  • विजय चोरमारे

कोल्हापूरचे लोक लढणा-या माणसाला ताकद देतात, हा आजवरचा इतिहास आहे. त्या इतिहासाला जागत गोकुळ दूध संघाच्या सभासदांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे गोकुळ दूध संघाची सूत्रे दिली. एकीकडे महायुतीच्या तीन मंत्र्यांसह दहा आमदार आणि दोन खासदार तर विरोधात एकटे सतेज पाटील अशी ही लढाई होती. महायुतीच्या बाजूला ठरावधारकांची संख्याही मोठी दिसत होती. परंतु आर्थिक प्रलोभने आणि देवादिकांच्या शपथा अशा दोन्ही दबावांना झुगारून मतदारांनी सतेज पाटील यांच्या पारड्यात वजन टाकले. गोकुळ दूध संघ मुख्यमंत्र्यांच्या दावणीला बांधण्याचा भाजपच्या नेत्यांचा डावही मतदारांनी उधळून लावला.

महापालिकेत हुलकावणी

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही सतेज पाटील विरुद्ध बाकीचे सगळे असा सामना होता. तिथे सतेज पाटील यांनी निकराची झुंज दिली. परंतु आघाडीअंतर्गत काहींचे हट्ट पुरवण्याच्या नादात त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या आणि सत्तेने त्यांना अगदी थोडक्यात हुलकावणी दिली होती. महापालिका निवडणुकीचीच पुनरावृत्ती गोकुळच्या निवडणुकीत होते की काय अशी शंका अनेकांना वाटत होती. कारण चित्र साधारण तसेच दिसत होते.

हेही वाचाः गोकुळची मलई कोण खातंय?

मतदानादिवशी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकुळच्या मतदारांचे गणित सांगितले होते. ५४०० सभासदांपैकी फक्त ९०० सभासद सतेज पाटील यांच्याकडे आहेत, त्यामुळं महायुती २५ पैकी २५ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. गोकुळच्या निवडणुकीत ५४१८ मतदार  होते, त्यापैकी ५४०४ म्हणजे ९९.७४ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावरून निवडणूक किती चुरशीची होती, याची कल्पना येऊ शकते.

तीन माजी अध्यक्षांचा पराभव

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील, अरुण डोंगळे आणि नाविद मुश्रीफ या तिघांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी माजी संचालक शौमिका महाडिक यांनाही पराभवाचा धक्का बसला. गतवेळी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता असताना शौमिका महाडिक यांनी एकटीने विरोधातला आवाज बुलंद ठेवला होता.

विश्वास आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे या दोन माजी अध्यक्षांच्याबाबत महायुतीतल्या नेत्यांसह अनेक सभासदांमध्येही नाराजी होती. त्यांनी दोन-दोन वर्षे अध्यक्षपद भोगले. आणि जेव्हा शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपद देण्याची वेळ आली तेव्हा अरुण डोंगळे यांनी पलटी मारली. विश्वास आबाजी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या दलबदलू राजकारणाला सभासदांनी तडाखा दिला. गोकुळमध्ये महायुतीचे राजकारण आणणा-यांनी शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदाची संधी घालवली. परंतु तोच गोकुळच्या निवडणुकीतील टर्निंग पॉइंट ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

एक वर्षासाठी अध्यक्ष होणारे शशिकांत पाटील आता बदलत्या परिस्थितीत अधिक काळासाठी अध्यक्ष होऊ शकतील. निवडणुकीआधीच सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली होती. शशिकांत पाटील यांचे वडिल आनंदराव पाटील चुयेकर हे गोकुळचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मुलाची संधी घाणेरड्या राजकारणाने डावलली गेली, त्याचाही सभासदांमध्ये राग होता, तो मतपेटीतून व्यक्त झाला.

सतेज पाटील विरोधात नेत्यांची फौज

सतेज पाटील यांच्याविरोधातली नेत्यांची फौज बघितली तरी लढत किती एकतर्फी दिसत होती, हे लक्षात येते. हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर हे तीन मंत्री, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने हे दोन खासदार आणि जिल्ह्यातले महायुतीचे सर्व आमदार विरोधात होते. अर्थात हे एकत्र असले तरी महायुती एकजीव नव्हती. भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीसांच्या कानाला लागून सतेज पाटील यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली नाइलाजाने अनेकांना एकत्र यावे लागले.

हेही वाचाः जिल्ह्यातील कुमकुवत नेतृत्वामुळे गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप

महायुतीच्या प्रचारातही एकजिनसीपणा नव्हता. तो एकजीव नव्हता. त्याचाही फटका बसला आहे. विशेषतः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. कारण जागावाटपात फडणवीसांनी हस्तक्षेप केला, परंतु मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असल्याचे फडणवीस यांनी सुरुवातीला जाहीर करून अंग काढून घेतले होते. हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांचा दारुण पराभव झाला, ही त्यांच्यासाठी मोठीच नामुष्की आहे.

देवी-देवतांच्या शपथांचा दबाव झुगारला

गोकुळच्या कारभाराबद्दल निवडणुकीत चर्चा झाली नाही कारण त्यावर टीका झाली तर दोन्हीकडचे नेते लक्ष्य होऊ शकतात. त्यामुळं महायुतीकडून आपल्या मतदारांना सुरक्षित ठेवणं, आर्थिक प्रलोभनं दाखवणं आणि देवी-देवतांच्या शपथा घालून ब्लॅकमेल करणं एवढंच करण्यात आलं. त्याचा उलटा परिणाम दिसून आला. मतदानाच्या आदल्या रात्री आणि मतदानादिवशी सकाळी महायुतीचे असे व्हिडिओ समोर आले.

हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक वगैरे मंडळी मतदारांना कर्नाटकातील सौंदत्तीला नेऊन यल्लम्मा देवीच्या परडीवर हात मारण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ आला. तर माजी आमदार के. पी. पाटील आदमापूरच्या बाळूमामाची शपथ घालताना दिसत होते. त्याचेही बूमरँग निवडणुकीत झाले. तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का, असा सवाल मतदारांनी मतपेटीत चिठ्ठ्या टाकून विचारला आहे.

गोकुळचे राजकारण लोकांना अमान्य

अशा मर्यादित मतदारसंख्येच्या निवडणुका असतात, तेव्हा फारशा उलथापालथींची शक्यता नसते. कारण मतदार थेट उमेदवारांशी बांधलेले असतात. गोकुळच्या माध्यमातून जे राजकारण चालले होते ते जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना पसंत नव्हते. परंतु मर्यादित संख्येने असलेले मतदार एवढी मोठी उलथापालथ घडवू शकतील का, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून क्रॉस व्होटिंग दिसत होते, परंतु ते सत्तापालटापर्यंत जाईल का, याबाबत साशंकता होतीच. परंतु जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसतशी सतेज पाटील यांच्या गटाची संख्या आणि मतांची आघाडीही वाढू लागली.

सतेज पाटील यांचे पाच-सात उमेदवार निवडून आले तरी तो त्यांचा मोठा विजय आणि महायुतीचा मोठा पराभव असेल असे मानले जात होते. परंतु अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी मोठा विजय साकारताना त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले. प्रस्थापितांविरोधातली मतदारांची नाराजी सतेज पाटील यांच्या पथ्यावर पडली. सुरुवातीपासून महायुतीकडील ठरावांची संख्या अधिक असल्याचे आणि दोघांच्यातील अंतरही मोठे असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु सतेज पाटील जराही विचलित झाले नाहीत.

गोकुळ हा कोल्हापूरचा संघ असून महायुती सरकार हा संघ गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या घशात घालण्याचा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रचारात केला होता. अमूलसाठी गोकुळचा बळी देण्याचे कारस्थान शिजत असल्याची टीकाही ते करीत होते. अत्यंत शांतपणे आणि धीरोदात्तपणे त्यांनी ही लढाई एकहाती पुढे नेली आणि ती जिंकलीही. सतेज पाटील यांच्याकडे गोकुळ दूध संघाची सूत्रे आली.

गोकुळच्या राजकारणात फडणवीस

गोकुळ दूध संघावर आमदार महादेवराव महाडिक यांचं सुमारे पंचवीस वर्षे वर्चस्व होतं. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी गोकुळवरचं महाडिक यांचं वर्चस्व संपवलं. गोकुळवर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता आली. आणि संचालक मंडळातही सर्वपक्षीय लोक होते. अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं गोकुळमध्ये पक्षीय राजकारण घुसडण्यात आलं. गोकुळचा आणि पक्षीय राजकारणाचा संबंध नसल्याचं हसन मुश्रीफ वारंवार सांगत होते. परंतु भाजपच्या नेत्यांनी ते मानले नाही. त्यांनी गोकुळच्या राजकारणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ओढून आणलं. अंतिम जागावाटपही मुख्यमंत्र्यांच्या हस्तेक्षेपाने झाले.

गोकुळचे स्वातंत्र्य धोक्यात आणले जात असल्याच्या सतेज पाटील यांच्या आरोपांना पूरक अशाच घडामोडी घडत होत्या. त्यामुळेही मतदार बिथरले. गोकुळ दूध संघाची सूत्रे कोल्हापूरच्या नेत्यांच्या हातातून निसटून तो देवेंद्र फडणवीसांच्या दावणीला बांधला जाणार असल्याचे स्पष्ट दिसत होते. भाजपच्या नेत्यांचा तो डावही मतदारांनी चाणाक्षपणे उधळून लावला.

शेतक-यांचा आर्थिक आधार

गोकुळ हा कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचा कणा आहे. सर्वसामान्य शेतक-यांचा प्रमुख आर्थिक आधार आहे. गोकुळ दूध संघाची २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक उलाढाल ४१८५ कोटी रुपये आहे. गोकुळची दूध हाताळणी क्षमता दररोज २५ लाख लिटर आहे. ८,४६१ गावपातळीवरील दूध संस्थांकडून दूध गोळा केले जाते. २०२५-२०२६ या वर्षात, सरासरी दूध खरेदी दररोज १६.२४ लाख लिटर आहे. म्हशीच्या आणि गायीच्या दुधाचा सरासरी दर विचारात घेतला तर गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील शेतक-यांना रोज आठ कोटी रुपये दुधाचे बिल देतो. महिन्याच्या बिलाची रक्कम होते २४० कोटी. म्हणजे शेतक-यांच्या जगण्याशी आर्थिक दृष्ट्या संघ किती जोडला आहे, याची कल्पना येऊ शकते.

गोकुळची लढाई जिंकल्यामुळे सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात हत्तीचे बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर महायुती सुसाट निघाली होती. कोल्हापूर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली. अशा परिस्थितीत गोकुळसारखे एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र सतेज पाटील यांच्याकडे आले आहे. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातले त्यांचे वजनही लक्षणीय वाढले आहे. गोकुळच्या कारभाराबाबत असलेले अनेक प्रवाद मोडून सर्वांना सोबत घेऊन एक नवे गोकुळ निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Related posts

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

दुष्काळातही भाजपा नेत्यांची गरब्यावर १०० कोटींची उधळपट्टी?