कोल्हापूर : प्रतिनिधी : जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे पुढारी जाऊन पोहचतो. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात दैनिक पुढारी अग्रेसर असतो. म्हणूनच सामान्य जनतेच्या मनात पुढारीने ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात पुढारीचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांच्या अंतकरणः पुढारीचे स्थान कोरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस व सहस्रचंद्रदर्शन सोहळा असा समारंभ बुधवारी पोलिस ग्राऊंडवर झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन शरद पवार बोलत होते.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेचा व्रतस्थ वसा जपला. त्यातून जनतेनेच त्यांना पुढारपण बहाल केले आहे. आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता, संघर्षातून उभे राहत, पत्रकारितेचा व्रतस्थ वारसा जपणार्या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला. जनतेनेच त्यांना पुढारीपण बहाल केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. (Pratapsinh Jadhav)
शरद पवार म्हणाले, यापूर्वी कोल्हापूरात मी एक सोहळा बघितला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा गौरव झाला होता. त्यावेळी चव्हाण यांनी कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती आणि वि. स. खांडेकर यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेली पाहून मी पंचगंगेला अनेकदा पूर येतो हे पाहिले आहे, पण आज सत्काराच्या निमित्ताने लोकगंगेचा महापूर आल्याचे उद्गार काढले होते. तेच चित्र डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या बाबतीत आज बघायला मिळत आहे, असे म्हणत पवार यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. (Pratapsinh Jadhav)
जनतेचं ऋण ही माझ्या मर्मबंधातली ठेव डॉ. प्रतापसिंह जाधव
जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावं असं आपल्याला वाटत नाही. कारण, हे ऋण म्हणजे आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. आज वयाच्या ८० व्या वर्षी माध्यमातील बदलांकडे पाहताना अनेक गोष्टी आठवतात. आज डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. डीपफेक न्यूजचं पेवच फुटलंय. मात्र, विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा आत्मा असून, हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचं भान ठेवा, अशा शब्दांत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या गौरवाला उत्तर दिले. (Pratapsinh Jadhav)
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे सामान्य जनतेसाठी योगदान अमूल्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूरच्या मातीचा सुवास, राजर्षी छत्रपती शाहूरायांचा विचार आणि पत्रकारितेचं अधिष्ठान प्रतापसिंह जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. पुढारी हे केवळ वृत्तपत्र नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे,फफ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. सत्तेला आरसा दाखवण्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढणारे डॉ. जाधव यांनी कोल्हापूर आणि सामान्य जनतेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. टोलनाके हटविण्यापासून सीमावादाच्या लढ्यापर्यंत, जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी कायम आवाज उठवला, असेही शिंदे म्हणाले. (Pratapsinh Jadhav)
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वामुळे पुढारी ताठ मानेने उभा : उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच तत्वनिष्ठ आणि निरपेक्ष भावनेने पत्रकारिता केली. स्वतःचे राजकीय विचार कधीही वृत्तांकनात न आणता त्यांनी सत्य आणि तत्त्वांवर आधारित पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढारी महाराष्ट्रात ताठ मानेने उभा आहे. या दैनिकाच्या वर्चस्वाला कोणीही धक्का देऊ शकत नाही, कारण पुढारी हे केवळ वृत्तपत्र नसून बहुजन विकासाचे माध्यम बनले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवोद्गार काढले.
‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात या सोहळ्याची भूमिका मांडली आणि साहेब हे पत्रकारितेचे विद्यापीठ असल्याच्या भावना व्यक्त केल्या. (Pratapsinh Jadhav)