नवी दिल्लीः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीसंदर्भात गेले दोन दिवस असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली असून, नऊपैकी सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील ही दुसरी मोठी फूट असून त्यामुळे केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे राजकारण ढवळून निघणार आहे. कालपासून सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा असली तरी सहा जणांच्या फुटीची पुष्टी होत नव्हती, मात्र आज सकाळी पक्षाच्या संसदीय बैठकीच्या निमित्ताने या फुटीवर शिक्कामोर्तब झाले असून यापुढील कायदेशीर लढाईकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. (Shivsena operation Tiger success)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दिल्ली येथे संसदीय पक्षाची बैठक गुरुवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीकडे सहाखासदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या `ऑपरेशन टायगर`ला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या १९ जूनला होणा-या वर्धापनदिन समारंभात या सहा जणांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेच्या पातळीवर नेमक्या काय काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील-आष्टीकर हे सहा खासदार संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. दिल्ली येथे आयोजित ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीला राज्यसभा खासदार संजय राऊत, यांच्यासह लोकसभा सदस्य अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे उपस्थित राहिले. तर जे या बैठकीत येणार ते आमचे आणि जे बैठकीत येणार नाही ते बेइमान आणि गद्दार, असे संजय राऊत बैठकीसाठी येताना म्हणाले.
महाराष्ट्राचा गोलपीठा बनवला (Shivsena operation Tiger success)
तर संजय राऊत यांनी एका एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे-
`आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होतेःपैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते!
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते: सध्याचे राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते! त्या अधिक प्रामाणिक असतात!
( महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही.)`
फुटिर खासदारांना तुडवा
दरम्यान गुरुवारी सकाळी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. यापुढे एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण यावेळी अरविंद सावंत यांनी सांगितली. (Shivsena operation Tiger success)
राऊत म्हणाले, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल.
धडा शिकवून तुरुंगात जाऊ
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी व्हीप काढून गुरुवारची खासदारांची बैठक बोलावली होती. व्हीप काढला जातो तेव्हा त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. हा व्हीप प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, घरी गेलेला आहे, व्हाटसअपवर पाठवला आणि ईमेलवरही पाठवला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं. आता सांगतो तोडून दाखवा, तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
फुटिरांवर कारवाईला सुरुवात (Shivsena operation Tiger success)
आमच्या पार्टीकडून लोक निवडून आले, आम्ही मेहनत करतो, उद्धव ठाकरे मेहनत करतात, तुम्ही त्यांना किडनॅप करता ही कोणती लोकशाही आहे? नरेंद्र मोदी विदेशात जाऊन मोठ्या बाता करतात त्यांनी देशात काय सुरु आहे ते पाहावे. आज अरविंद सावंत यांनी सर्वांना व्हीप बजावला आहे, लगचेच कारवाई सुरु होणार, असे संजय राऊत यांनी सांगितले. (Shivsena operation Tiger success)
आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात, पैशांची प्रलोभन दाखवल्यावर ताबडतोब जो शेजेला जाईल त्याच्या शेजेला जातात, ही प्रवृत्ती वाढत राहिली तर महाराष्ट्राच्या परंपरेचा गोलपीठा होईल. शिंदे गटाचे लोक गोलपिठ्यातील दलाल आहेत. दलाल निर्माण करण्याचे काम भाजपने करुन देशाच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. (Shivsena operation Tiger success)
बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषद संपवली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेले खासदारः (Shivsena operation Tiger success)
१)संजय जाधव, २)संजय देशमुख, ३)नागेश पाटील आष्टीकर, ४)ओमराजे निंबाळकर, ५)भाऊसाहेब वाकचौरे आणि ६)संजय दिना पाटील
ठाकरेंसोबत असलेले खासदारः
१)अरविंद सावंत, २)अनिल देसाई आणि ३)राजाभाऊ वाझे
…….
शिवसेना (ठाकरे) फुटीचा ताजा घटनाक्रम
१० जून- एनडीच्या दिल्लीतील बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांची अमित शाह यांच्याशी चर्चा
१० जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट
१४ जून- उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उपस्थित. नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांची ऑनलाईन उपस्थिती. ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव गैरहजर
१५ जून- खासदार संजय देशमुख यांची दिल्लीत शिदेसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी भेट
१६ जून- फुटीच्या चर्चेला उधाण. रात्री सहा संशयित खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या.
१६ जून- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावत यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
१७ जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे यांची पत्रकार परिषद.
१७ जून- उद्धव ठाकरेंकडून सर्व खासदारांना १८ जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप जारी.
१८ जून- सहा खासदारांची संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती. फुटीवर शिक्कामोर्तब