महाडिक,मुश्रीफ, क्षीरसागर मला टारगेट का करतात? : सतेज पाटील  

Panchnama - Kolhapur Files

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महानगरपालिकेत २००५ ते २०१० या काळात मी आणि महाडिक सत्तेत होते. २०१० ते २०१५ २०१५ मध्ये हसन मुश्रीफ आमच्याबरोबर सत्तेत होते. २०१५ ते २०२० या काळात मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर सत्तेत होते. राष्ट्रवादीचे महापौर होते तर शिवसेनेचा परिवहन सभापती होता.  तरीही ते मला का टारगेट करतात. असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विरोधकांना लगावला. गेली पाच वर्षे महानगरपालिकेवर प्रशासकराज असलेल्या महायुतीची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात पायाभूत सुविधांची धुळदाण झाली असून भ्रष्टाचाराचा कहर झाला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेची निवडणूक ही कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती अशी असणार आहे, असा दावाही सतेज पाटील यांनी केला.

‘प्रशासकामार्फत महायुतीने केलेल्या बोगस कामगिरीची पंचनामा-कोल्हापूर फाईल्स’  काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे प्रशासकांच्यामार्फंत महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता होती. महायुतीने चांगल्या कामाची जबाबदारी घेतली असताना १०० कोटींचे रस्ते, धूळ आणि वायू प्रदूषण, पाणीप्रश्न, विकास कामातील टक्केवारी आणि भ्रष्टाचार, ड्रेनजमधील भ्रष्टाचार, झूम प्रकल्प, पार्किंग, ट्रॅफिकच्या समस्यांनी कोल्हापूरकर बेजार झाले आहेत. युवा पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुर्नबांधणी रखडली आहे. या संदर्भात माध्यमात बातम्या आला असून त्याद्वारे महायुतीच्या प्रशासन काळातील कामांचा आम्ही पंचनामा शहरवासियासमोर मांडला असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. (Panchnama – Kolhapur Files)

महायुतीने सरकारने कोल्हापूर शहरासाठी मोठ्या घोषणा केल्या पण निधी कुठे गेला असा सवाल करत १०० कोटींच्या रस्त्याबाबत कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर प्रशासन आणि सरकार जागे झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर वंदना बुचडे,जयश्री सोनवणे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, भारती पोवार, सरला पाटील, सूर्यकांत बुद्धिहाळकर, दौलत देसाई, आनंद माने आदी उपस्थित होते.  

राहूल आवाडे अभी बच्चा है .. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारात आमदार राहूल आवाडे यांनी पाणीप्रश्नांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना सतेज पाटील यांनी राहूल आवाडे अभी बच्चा है.. अशा शब्दात खिल्ली उडवली. महायुतीची सत्ता असताना गेल्या वर्षभरत राहूल आवाडेंनी इचलकरंजीचा पाणीप्रश्न का सोडवला नाही. थेट पाइपलाइन चा प्रश्न सोडवला नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी मी घोषणा केली होती. माझ्याप्रमाणेच राहूल आवाडे यांनी पाणी प्रश्न सुटला नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होता असा टोलाही सतेज पाटील यांनी मारला. (Panchnama – Kolhapur Files)

खासदार महाडिकांना सतेज पाटील यांचा टोला… काँग्रेसचे दोन ते तीन नगरसेवक निवडून येणार अशी टीका खासदार महाडिक यांनी केली होती यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, काँग्रेसचे उमेदवार किती निवडून येणार हे कोल्हापूरची जनता ठरवणार आहे, महाडिक नाही. राज्यसभेच्या खासदारांना बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवे होते. त्यांचे ऐकून जर कोल्हापूरकर मतदान करणार असतील तर त्यांचा दोन लाख ७० हजारांनी कार्यक्रम झाला नसता असा पलटवार सतेज पाटील यांनी केला. (Panchnama – Kolhapur Files)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर