पुणे : विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीचा विचार समोर आणला आणि विजय मिळवला असल्याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (१० जून) दिली. तसेच २०२९च्या निवडणुकीत महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचेही ते म्हणाले. (NCP Ajit Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, पक्षाला लोकसभा निवडणुकीत मागच्या वेळीपेक्षा केवळ ४ जागा मिळाल्या. लोकसभेला आपला पराभव झाला. या परिस्थितीत लोकांची नाराजी दूर करणे गरजेचे होते. त्यावेळी लाडक्या बहिणीचा विचार समोर आला. त्यावेळी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिला वर्गाला संधी देण्याचे, मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम करण्यात आले आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात महिला भगिनींना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ४१ टक्के जास्त निधी अनुसूचित जमाती, मागासवर्गीयांसाठी विकास विभागाला उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक न्याय विभागाला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ३८ टक्के निधी जास्त आम्ही दिला, असे पवार म्हणाले. (NCP Ajit Pawar)
महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली वाटचाल पुढे सुरू केली. पक्षाच्या उभारणीत प्रत्येक जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, माझ्या माय-माऊलींनी, भगिनींनी, युवक-युवतींनी असं सर्वांनीच मोलाची साथ दिली. अशा पद्धतीने प्रगती करत आज आपण पक्षाचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, याचा आनेद आहे, असे पवार यांनी सांगितले.
कट्टर धर्मवाद मान्य नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही आणि भविष्यातही मान्य असणार नाही.आमचा पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे.सत्ता येईल आणि जाईल, पण पुरोगामी विचार जिवंत राहिले पाहिजेत.विचारांशी कधीही तडजोड करणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी आश्वस्त केले.
सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी कॉग्रेस संधी देणार आहे.शोषित, वंचित, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे, असे ते म्हणाले.
नुसती आंदोलने, मोर्चे काढून चालत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने चालणारा, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं बेरजेचे राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जनतेशी वागले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे, याचा भान ठेवणारा पक्ष आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, विरोधी बाकावर बसून नुसत्या घोषणाबाजी करून, आंदोलने करून, मोर्चे काढून चालत नाही. लोकांना दिशा दाखवणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, बेरजेचे राजकारण करणारे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यानुसार महायुतीसोबत जाण्याचे आम्ही ठरवले. कारण, देशासह राज्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सर्वसामान्यांचे राहणीमान सुधारायला पाहिजे. घराघरात आर्थिक सुबत्ता यायला पाहिजे. आपला विचार केला जात नाही, असं कोणत्याही समाज घटकाला वाटता कामा नये. (NCP Ajit Pawar)
बहुजनांच्या अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी
आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत आणतो. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचे काम तुमच्या आमच्या हक्काच्या सरकारने केले आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेले आहे. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून तो महाराष्ट्र हिताचा विचार करणारा पक्ष आहे. देश पातळीवर देशाच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे. लोककल्याणाचा ध्यास आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे. समाजसुधारकांच्या, संत-महात्म्यांच्या, महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून आपण सगळे काम करत आहोत.
राज्यातले प्रगत, पुरोगामी आणि सुधारणावादी विचार हे जिवंत राहायला हवेत. मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे, बहुजनांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे, त्याची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, ही बाब प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. (NCP Ajit Pawar)
राज्य सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणार
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी विकासाचा पाया रचला. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या, महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या सुसंस्कृत विचारांचा, विकासाचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांना येत्या काळात अधिक जोमाने करायचे आहे.
राज्याचा विकास हा एकमेव अजेंडा
राज्याच्या सत्ताकारणात, समाजकारणात कोणत्याही भूमिकेत आपण असताना ‘महाराष्ट्राचा विकास’ हा एकच अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील. त्याचप्रमाणे देशपातळीवर देशाचा विकास, शेतकरी-कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी तळमळीने काम करत राहणं, हीच आपली सर्वांची प्रमुख भूमिका राहील. आपल्या कामातून राज्याचे भले झाले पाहिजे, राज्याचा विकास झाला पाहिजे. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असायला हवा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा :
आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल : पवार
मोदी अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात अपयशी : काँग्रेस