पुणे : पक्षात फूट पडेल किंवा पडावी असे वाटत नव्हते, पण काही मूलभूत विचारांत फरक झाला आणि फूट पडली. आमच्यासोबत जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (१० जून) बोलून दाखवला. (pawar assures activists)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनिदनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, फुटीची चिंता करु नका. एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असे पवार म्हणाले.
जयंत पाटलांनी १० वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केले. सत्ता येते जाते, पण पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धारही पवार यांनी बोलून दाखवला. (pawar assures activists)
तालुक्या-तालुक्यांत नव्या चेहऱ्यांना संधी
शरद पवार म्हणाले, “जयंत पाटील यांनी सांगितले की आता नवीन पिढीला संधी द्या. तुम्ही-आम्ही सगळे मिळून त्यांच्या मागे उभे राहूया. त्यांनी जो विषय मांडला आहे त्यावर विचार करण्याची तयारी असली पाहिजे. तुमची (कार्यकर्त्यांची) मागणी वेगळी आहे असे येथे दिसले. परंतु, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्व प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र करून यावर चर्चा करू. प्रमुख सहकाऱ्यांशी यावर सुसंवाद साधून सामूहिकपणे यावर निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात नवी पिढी दिसली पाहिजे, नवे चेहरे दिसलेच पाहिजेत. आपण ठिकठिकाणी नवे चेहरे उभे केले आहेत, त्यांना संधी देऊया.
५० टक्के महिलांना संधी
महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिले पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पक्ष पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम पक्षाने केले. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांमुळेच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार आहे. संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. आगामी निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्यावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. (pawar assures activists)
२६ वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. २६ वर्षे लोकांनी सेवेची संधी दिली, अनेकांना पक्षाने संधी दिली. कार्यकर्त्यांमुळे हा दिवस साजरा करण्याची संधी मिळत आहे, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रहितात राजकारण नाही ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. राष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाही. देशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी नमूद केले.
हेही वाचा :
प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसः २६ वर्षांची वाटचाल दहा मुद्यांद्वारे जाणून घेऊया