कोल्हापूर : प्रतिनिधी : लग्नासाठी नकार दिल्यानंतर युवतीचा तिच्या सहकाऱ्याने चाकून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मयत तरुणी आणि हल्लेखोर दोघेही लिव्ह-इन रिलेशीनशिपमध्ये रहात होती. सानिका उर्फ समिक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. सतीश यादव (रा.सध्या रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ, मुळ गाव उंड्री, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे ही घटना घडली. गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Murder young woman)
मिळालेल्या माहितीनुसार समीक्षा नरसिंगे, तिची एक मैत्रीण आणि सतीश यादव हे तिघे सरनोबत वाडी येथे रहात होते. तिघेही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होते. समिक्षाचा विवाहित असून ती पतीपासून विभक्त रहात होती. घटस्फोटासंदर्भात न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. आई आणि बहिण असे तिचे नातेवाईक आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामात कमाई कमी झाल्याने तिघांनी सरनोबतवाडी येथील घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. सतीश यादव समिक्षाला विवाहासाठी सातत्याने विचारणा करत होता पण समिक्षा नकार देत होती. सरनोबतवाडी येथील घर सोडण्याऐवजी आपण एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा त्याने समिक्षाला प्रस्तावही दिला होता पण तिने नकार दिला होता. (Murder young woman)
गेले चार दिवस समिक्षा कसबा बावड्यातील आईकडे रहात होती. घरमालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले होते. आज मंगळवारी दुपारी खोलीवरील साहित्य आणण्यासाठी समिक्षा आणि तिची मैत्री सरनोबतवाडी येथील रुममध्ये गेले होते. तिथे सतीश यादव आला. त्याने समिक्षाला विवाह करण्याची मागणी केली. पण समिक्षाने नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या सतीशने तिच्यावर चाकूने वार केला. छातीवर केलेला वार वर्मी बसल्यावर समिक्षा जमिनीवर कोसळली. त्यानंतर सतीश घटनास्थळावरुन पळून गेला. जाताना त्याने खोलीची बाहेर लावून घेतली. समिक्षाच्या मैत्रीणीने आरडोओरड केली. तसेच तिने एका मित्राला बोलावून घेतले. खोलीत समिक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला एका मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारास नेण्यात आले. पण त्यांनी सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. गंभीर जखमी असलेल्या समिक्षाला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून समिक्षाच्या मैत्रीणीने फिर्याद दिली आहे. संशयित सतीश यादव पळून गेला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे. (Murder young woman)