मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी पुन्हा एकदा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. (Complaints against Ajit Pawar)
सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांची स्वतंत्रपणे बैठक झाली. यावेळी शिंदे यांनी प्रत्येकाशी ‘वन टू वन’ चर्चा करून प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. यावेळी सर्वच मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडून निधी वाटप करण्यात हात आखडता घेण्यात येत असल्याची नाराजी बोलून दाखवली आहे.
शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा प्रश्न सोडवला जाईल, असे त्यांना सांगितले आहे. (Complaints against Ajit Pawar)
लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेवू नका, अशा सूचना त्यांनी मंत्र्यांना केल्या.
अनेक मंत्र्यांनी अजित पवार आमच्या विकासकामांत खोडा घालत असल्याचे सांगत अर्थमंत्री आम्हाला निधी देणार नसतील तर आम्ही काम कसे करणार? अशी चिंता व्यक्त केली आहे. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राज्यमंत्र्यांना हवेत अधिकार
मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्याकडून खात्याचे सर्व काम पाहिले जाते. राज्यमंत्री केवळ नावापुरतेच आहेत. आम्हालाही अधिकार दिले जावेत, अशी मागणी महायुती सरकारमधील सर्व राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचे पत्रच त्यांनी फडणवीस यांच्याकडे दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :
कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई
विशाळगडावर कुर्बानीस परवानगी
राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना