Marathwada Rainfall: लुटलेला पैसा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोकळा करा : संजय राऊत

Marathwada Rainfall

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा, ठेकेदारांकडून कमावलेला पैसा नगरविकास खात्याने शेतकऱ्यांसाठी वापरावा. अबालवृद्ध, तरुण, महिलांना तत्काळ मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असा हल्ला ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी बुधवारी (२४ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना केला.(Marathwada Rainfall)

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिकं, जमीन, पशुधन आणि घरे उद्ध्वस्त झाली असून, केंद्र सरकारनं तत्काळ १० हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला करावी, या मागणीचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, “ “मराठवाड्यात ७० लाख एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. साधारण ३६ लाख शेतकऱ्यांची पिके, पशुधन आणि घरं वाहून गेली आहेत. गावच्या गावे नष्ट झाली आहेत. सरकारने कागदोपत्री २ हजार २१५ कोटींची मदत मंजूर केली. पण ही रक्कम पुरेशी नाही. उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून १० हजार कोटींची मागणी केली आहे. ही मदत मिळाली नाही, तर मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही.” (Marathwada Rainfall)

राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या प्रचारतंत्रावरही टीका केली. ते म्हणाले, “लोक पुरात मरत आहेत, गावं वाहून जात आहेत. सरकार भगव्या पिशव्यांवर पक्षाचे चिन्ह आणि फोटो छापून मदत वाटत आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. ही वेळ प्रचाराची नाही, तर शेतकऱ्यांना आधार देण्याची आहे. भाजपा, मिंधे गट आणि अजित पवार यांच्यात सत्तेची स्पर्धा सुरू आहे का? सरकार निष्क्रियपणे काम करत आहे.” (Marathwada Rainfall)  
उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पूरग्रस्त भागांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. ते म्हणाले, “ओला दुष्काळ वगैरे शब्द बाजूला ठेवा. फक्त पिकेच नव्हे, तर शेतजमीन आणि मातीही वाहून गेली आहे. यामुळे अनेक पिढ्यांचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. महाराष्ट्रावरील राज्य सरकारवर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे. याआधी दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या वेळी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. आता शेतकऱ्यांना मदत कशी करणार? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा हजार कोटींच्या तत्काळ मदतीची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार