कोल्हापूर : प्रतिनिधी : मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं, तेच मी लोकांना सांगत असते, असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्याचे इंगित उलगडले. शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी माती, निसर्ग, जंगल आणि रानभाज्या जपण्याचे महत्त्व अधोरेखित करतानाच मानवी जीवन, शेती आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नात्याची प्रेरक आणि हृदयस्पर्शी मांडणी केली.
शिवाजी विद्यापीठाचे कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि समाजशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती पोपेरे यांचे ‘देशी बियांचे संवर्धन आणि स्त्रियांची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यान आज झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. व्याख्यानाला कोल्हापूरसह जिल्ह्यातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (Lecture by Rahibai Popere)
ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या राहीबाई पोपेरे यांनी आपल्या सुमारे तासभराच्या अतिशय ओघवत्या भाषणामध्ये स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि अनुभव यांमधून घेतलेले धडे सांगितले आणि विचार करायला प्रवृत्त केले. त्या म्हणाल्या, निसर्गच आपला खरा गुरु आहे. माती चांगली असेल तर अन्न चांगले येते, अन्न चांगले असेल तर माणूस निरोगी राहतो आणि पुढची पिढी सुदृढ घडते. रासायनिक शेतीमुळे वाढणारे आजार, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक अन्नधान्यापासून दूर जाण्याचे दुष्परिणाम स्वतःच्या आयुष्यात भोगले. त्यामुळेच देशी वाणांकडे वळले. पूर्वीच्या काळात रानभाज्या, कंदमुळे आणि स्थानिक धान्य खाल्ल्यामुळे लोक दीर्घायुषी आणि निरोगी होते. आज मात्र आपण पैशाने विष खरेदी करून खात आहोत.
राहीबाईंनी पारंपरिक बियाण्यांचे जतन, सेंद्रिय शेती आणि ‘किचन गार्डन’ या संकल्पनांवर विशेष भर दिला. प्रत्येक घरात, प्रत्येक शेतात आणि अगदी शाळांच्या परिसरातही भाजीपाला पिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. दिसायला सुंदर असलेले अन्न नेहमी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. कमी खा, पण शुद्ध, सात्विक खा, असा संदेश त्यांनी दिला. (Lecture by Rahibai Popere)
जंगल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत त्या म्हणाल्या, जंगल आपली माऊली आहे. जंगल जाळून आपण स्वतःचं नुकसान करतो. त्यात असंख्य जीवांचा जीव जातो. निसर्ग वाचवायचा असेल तर झाडे, रानभाज्या आणि जैवविविधता जपली पाहिजे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व आणि स्थानिक अन्नपद्धतीचे वैज्ञानिक मूल्य नव्या पिढीने जाणून ते आचरण्यात आणण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढदिवस, सण-उत्सव यावेळी झाडे लावणे आणि बियाणे भेटी देणे आदी माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचेही आवाहन केले. यावेळी त्यांनी जंगलातील वणवे रोखण्याचे आवाहन करणारी आणि रानमेव्याचे महत्त्व अधोरेखित करणारी दोन गाणीही म्हटली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे समाधानही केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. संकरित वाणांचे दुष्परिणाम ओळखणारी आणि त्याच वेळी शुद्ध देशी बीजाचं महत्त्व लक्षात आणून देणारी महिला म्हणजे राहीबाई असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी राहीबाईंच्या कार्याला अभिवादन करतानाच जे कार्य राहीबाई शेतावर करत आहेत, तेच कार्य आपण विद्यापीठातल्या प्रयोगशाळेत करत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या त्या भागामध्ये ज्या त्या देशी वाणाचे महत्त्व असते. जे आपल्या परिसरात पिकते, तेच खावे, असे म्हटले जाते. याला कारण तिथली माती असते. एका ठिकाणचे वाण दुसरीकडे नेऊन लावले, तर ते येते; मात्र त्यामध्ये ती चव उतरेलच असे नसते. याला कारण म्हणजे या वनस्पतींच्या मुळाशी विशिष्ट प्रकारचे जीवाणू वाढत असतात. हे जीवाणू त्या विशिष्ट पर्यावरणीय घटकांतच वाढतात. अशा वेळी संबंधित वनस्पती आणि जीवाणू यांचे सहजीवन फुलते. जीवाणू मातीतील आवश्यक घटक वनस्पतीला पुरवितात आणि तिला विशिष्ट चव आणि पोषणमूल्य प्राप्त होते. सर्वच प्रकारच्या रानभाज्यांना हे लागू पडते. दाहशमनार्थ त्या उपयुक्त ठरतात. या अभ्यास व संशोधनासाठीच अॅग्री बायोटेक्नॉलॉजी, मेटाजिनॉमिक्स, सॉईल मायक्रोबायोलॉजी इत्यादी आधुनिक विज्ञानशाखा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. आसावरी जाधव यांनी परिचय करून दिला. ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. (Lecture by Rahibai Popere)