कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

Land handed over for the Kolhapur International Cricket Stadium

मुंबई  : प्रतिनिधी :  कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) ला अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या मैदानासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वर्गीय अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या जयंतीच्या पर्वसंध्येलाच क्रिकेट स्टेडियमसाठी जागा उपलब्ध झाली आहे. (Land handed over for the Kolhapur International Cricket Stadium)

आज मंगळवारी  मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष शासकीय समारंभात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून ही जागा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ,  आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके उपस्थित होते. (Land handed over for the Kolhapur International Cricket Stadium)

अजित पवारांचा जागा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय


कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाळ पाटणकर व ऋतुराज इंगळे हे मागील अनेक वर्षे प्रयत्नशील होते. तीन वर्षांपूर्वी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हा विषय शासन दरबारी मांडत स्टेडियमसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या अनुषंगाने ३ सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विकासवाडी येथील एमआयडीसी च्या जमिनीपैकी १२.७६ हेक्टर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.

क्रिकेटपटूंसाठी नवीन संधी निर्माण होणार

  
या करारामुळे कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. आधुनिक सुविधा, आंतरराष्ट्रीय निकष आणि भविष्यातील क्रीडा विकास लक्षात घेऊन उभारले जाणारे हे स्टेडियम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हजारो होतकरू क्रिकेटपटूंसाठी नवी संधी निर्माण करणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, दर्जेदार प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.
 
स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक जमीन शासनाने उपलब्ध करून दिली असली तरी या प्रकल्पासाठी कोणताही आर्थिक निधी शासनाकडून दिला जाणार नसल्याचे करारात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारण्याची व त्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनलाच पार पाडावी लागणार आहे.
 
याबाबत प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले,“आजचा दिवस कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. कोल्हापूरकरांनी अनेक वर्षे पाहिलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शासनाने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत हे शिवधनुष्य समर्थपणे पेलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आवश्यक निधी उभारून सर्व प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करत कोल्हापूरला जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा आमचा निर्धार आहे. विकासवाडीचे ग्रामस्थ तसेच या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.” (Land handed over for the Kolhapur International Cricket Stadium)

Related posts

‘लेम डक प्रेसिडेंट’सारखी मोदींची अवस्था ; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात

पंतप्रधान निवास्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; राहूल, प्रियांकांचा ठिय्या