कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्घाटन प्रसंगी आवाहन केले.
भारत सरकार, सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य प्रमुख महोत्सव शाही दसरा कोल्हापूरचा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथे पहिल्या मजल्यावरील सभागृहात हे प्रदर्शन आयोजित केले आहे. शुभारंभ प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपस्थित होते. (Kolhapur Dussera Festival)
शिवकालीन इतिहास हा श्रध्देसमवेत प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणातील ही महत्वाचे टप्पे असून एक प्रकारे ही आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक शक्तीस्थळ आहेत. या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाला सातत्याने समाजापर्यंत पोहचविण्याची नितांत गरज असून यातून सामाजिक शांतता व स्वास्थ्य अधिक दृढ होते. याच हेतूने शिवशस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती लोकांच्यापर्यंत जाईल यासाठी शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आयोजन केले आहे.
शिवकालीन शस्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. तलवारीचे विविध प्रकार, ब्रिटिश तलवारी, दांड पट्टा, बाणा, भाला, पगड्या, कोयता, शिरस्त्राण, ढाल, तोफ गोळे, अश्मयुगीन दगडी हत्तार, दस्तान, कासवाच्या पाठीची ढाल, चामडी ढाल, चिलखत, वाघ नखे, कट्यार, गुप्ती, कुकरी, खंजीर, हंटर बंदूक, त्रिशूल, कोयता, खंजराली आणि कुऱ्हाडीचे विविध प्रकार या ठिकाणी त्यांच्या माहितीसह पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन शिवकालीन शस्त्र वस्तू संग्राहक संदीप ऊर्फ नाना सावंत यांच्या शिवगर्जना, प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे.
नाट्यमय प्रसंग-नृत्यातून ‘गाथा शिवशभुंची’ कार्यक्रम संपन्न
कोल्हापूरमधील दसरा महोत्सवाचा राज्य शासनाने नुकताच राज्याच्या प्रमुख महोत्सवात सभावेश केला आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असून दसरा महोत्सव अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक जनोत्सव बनवण्याच्या दृष्टीने विचार करूया, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. त्यांच्या हस्ते दसरा चौक येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, तेजस्विनी पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kolhapur Dussera Festival)
यावेळी शाहू महाराज म्हणाले, याच पद्धतीने राज्यात सर्वत्र दसरा महोत्सव साजरा व्हावा. आताच्या काळात दसरा महोत्सवाचे रूप बदललेले असले तरी स्वरूप तेच आहे. कोल्हापूरमध्ये पर्यटक वाढीसाठी विमान, रेल्वे, तसेच इतर दळणवळणाच्या माध्यमातून वाढ होत आहे. अशा स्थितीत हा आपला दसरा महोत्सव अधिक जनताभिमुख करूया. खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील महत्त्वाच्या दोन दसरा महोत्सवांचा उल्लेख करून म्हैसूर नंतर कोल्हापूर येथील दसरा महोत्सवाचे महत्व तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले. यामुळे आता शाही दसरा महोत्सवात अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचाही समावेश करू असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केले. (Kolhapur Dussera Festival)
नाट्यमय प्रसंग-नृत्यातून ‘गाथा शिवशभुंची’ कार्यक्रम संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गाथा शिवशभुंची हा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी संपन्न झाला. काही चित्रपट, मालिका त्यातील प्रचलित गाणी, नाट्यमय प्रसंग, त्यातील नृत्ये असा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमामध्ये स्थानिक १०० कलाकारांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका विनायक चौगुले या कलाकारांने उत्तम प्रकारे साकारली. गोंधळ, दिंडी, मर्दानी खेळ सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग देखील पाहायला मिळाले. वासुदेव आला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, अंबाबाई गोंधळाला ये, आई तुळजाभवानी गोंधळाला ये अशा अनेक गीतातून तसेच लढाईंच्या प्रसंगातून उपस्थित भारावले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन कोल्हापूर येथील स्वप्नील यादव यांनी केले आहे.