राज्यपालांच्या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्दही नाही ; जयंत पाटील यांचा घणाघात 

Jayant Patil's attack on the Governor's speeches

जमीर काझी : मुंबई : राज्यपालांचे भाषण म्हणजे मंत्रिमंडळाचे भाषण असते. पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की, या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्द सुद्धा काढलेला नाही. या अभिभाषणात सर्व महान व्यक्तिमत्त्वांची नावे घेतली. मात्र त्यांचे विचार आत्मसात झालेले दिसत नाही.असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला.

मनकर्णिका घाटाची भरपाई युपी सरकारने करावी

अभिभाषणाच्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी महायुती सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले,’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मनकर्णिका घाट शासनाकडून उध्वस्त करण्यात आला. तिथल्या मुर्त्या अस्ताव्यस्त पडलेल्या. अतिशय सुंदर घाट तोडला. त्याची भरपाई उत्तर प्रदेश सरकारने केली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा. (Jayant Patil’s attack on the Governor’s speeches)

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वाऱ्यावर?

आपण भगवान बिरसा मुंडांचे नाव घेता मात्र आदिवासी समाजासाठी सरकारने काय केले याचा उल्लेख अभिभाषणात कुठेच नाही.महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा उल्लेख करायचा आणि त्यानंतर त्या विषयाला वाऱ्यावर सोडायचे, हे योग्य नाही. मुख्यमंत्री महोदय स्वतः वकील आहेत. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी प्रयत्न करून ही केस पटलावर आणावी आणि सीमा भागातील लोकांना दिलासा द्यावा.

गुंतवणूक आणि रोजगाराचा डेटा सादर करावा

जयंत पाटील म्हणाले,अभिभाषणात राज्यपालांनी दाओस मध्ये १८ देशांतील विविध कंपन्यांनी सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यातून ४० लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. मग  २०२२ सालापासून पहिले तर ५३ लाख लोकांना रोजगार मिळेल असे आभासी चित्र निर्माण केले आहे. याचा प्रत्यक्ष डेटा सरकारने जाहीर करावा. (Jayant Patil’s attack on the Governor’s speeches)

युपी कुंभमेळ्यापेक्षा नाशिक कुंभमेळ्याचे बजेट पाच हजार कोटींनी जास्त.

कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून २५ हजार कोटींचं बजेट मंजूर केले आहे. उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या कुंभमेळापेक्षा ५ हजार कोटींनी हे बजेट जास्त आहेत. येथील कॉन्ट्रॅक्ट परराज्यात जाऊ नये, ते महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टर्सना मिळावे. एकीकडे कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे यात भ्रष्टाचार करत आहे अशी शंका लोकांना येत आहे. कुंभमेळ्यात सीसीटीव्हीचे काम दहा कोटी झाले होते. आता ते काम तीनशे कोटीवर गेले आहे. याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मला कविवर्य कुसुमाग्रजांची सिंहस्थ कविता आठवली

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वरा  संतांचे पुकार, वांझ झाले,असे सांगून ते म्हणाले की,’ आपल्या एका मंत्री महोदयांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावच घेतले नाही. त्यांचे नाव विसरणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान ३० जागा राखीव ठेवाव्यात ही माझी मागणी आहे. (Jayant Patil’s attack on the Governor’s speeches)

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरला

देशाच्या जीडीपी  मधील महाराष्ट्राचा वाटा १४ टक्क्यांवरून १३.५ टक्क्यांवर घसरला आहे, हे स्वतः राज्यपाल महोदयांनी कबूल केले. एक सर्व्हेनुसार शहरातील पुरुषांच्या बेरोजगारीत दुप्पट वाढ झाली आहे. गुंतवणूक झाली. मग बेरोजगारी का वाढते आहे? रस्ता बांधणे म्हणजे विकास; विकासाचा इतका मर्यादित अर्थ नाही. औद्योगिक प्रमोशनसाठी ५ हजार कोटी जाहीर केले होते. त्याचे नेमके काय झाले? याचा खुलासा द्यावा. महाराष्ट्रातील कंत्रातदारांचे ७७ हजार ५०० कोटी रुपये अद्याप रखडले आहेत. 

कांद्याचे दर कोसळले

कांद्याची निर्यात कमी झाली आहे. कांद्याचे दर ६०० – ७०० रुपयांवर खाली आले आहेत. उत्पादन खर्च १६०० असताना निदान २००० भाव मिळणे अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकरी उपोषणाला बसले आहेत. आता भारत अमेरिका शून्य टक्के आयात करारामुळे शेतकऱ्यांवर संकट येणार आहे. 

महायुतीच्या माध्यमातून निजामशाही अस्तित्वात

निजामशाहीच्या विरोधात लढणाऱ्या परभणी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून पुन्हा निजामशाही अस्तित्वात आली आहे असे लोकांना वाटू लागले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीच धरपकड सरकारने केली. आता या शक्तीपीठ मार्ग माझ्या मतदारसंघातूनही जाणार आहे. सांगली जिल्ह्यात स्थानिकांनी आंदोलने सुरू केली आहेत. आमच्याकडे मोठे तीर्थस्थान नाही. आमची शक्ती नाही वाढली तरी चालेल. आम्ही शरण येतो पण शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीवर मार्ग बांधू नका, स्वप्नरंजनापेक्षा मूलभूत प्रश्नांवर लक्ष देणे मला महत्त्वाचं वाटते.असा टोलाही त्यांनी लगावला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर