कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक बहुमताने झाली असून त्याला मान्यता द्यावी, अशी याचिका समविचारी आघाडीच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी विरोधी आघाडीच्या १२ संचालकांनी आपले म्हणणे सोमवारी सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले. या याचिकेवर सोमवारी २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालय कोणता निर्णय देते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Gokul chairman election in court)
गोकुळ अध्यक्षपदासाठी गुरुवारी (दि.२९) निवड सभा आयोजित केली होती. या बैठकीला सत्ताधारी समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित होते. पण विरोधी आघाडीचे १२ संचालक गैरहजर होते. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालक उपस्थित असणे बंधनकारक असल्याने निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी अध्यक्ष निवडीची सभा तहकूब केली. त्यानंतर सत्ताधारी १३ संचालकांनी समांतर सभा घेऊन गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड केली.
गोकुळ अध्यक्षपद निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम पूर्णकरण्याची गरज नाही अशा आशयाची याचिका समविचारी आघाडीच्या संचालकांनी कोल्हापूर सर्किटबेंच याचिका दाखल केली. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या तहकूब प्रोसिडिंगवर शंका उपस्थित केली. न्यायाधीश अभय आहुजा आणि नीरज धोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. तसेच गोकुळची निवडणूक झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत अध्यक्ष निवड होणे बंधनकारक असून तीन नोव्हेंबरला ही मुदत संपत आहे याकडे लक्ष वेधले. (Gokul chairman election in court)
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बहुमत मिळवण्यासाठी सरकारकडून नियमात काही बदल होण्याची भिती वकील अभिजीत कुंभकोणी यांनी व्यक्त केली. ही भिती अवास्तव असून या याचिकेवरील निकालाच्या अधीन राहून गोकुळ अध्यक्षपदाची निवड होईल, असे कोर्टाने आश्वस्त केले.
दरम्यान महायुतीच्या १२ संचालकांचे म्हणणेही न्यायालयाने ऐकूण घ्यावे अशी विनंती त्यांचे वकील अनिल साखरे यांनी केली. न्यायालयाने त्यांची विनंती करत सोमवारी म्हणणे मांडण्यास सांगितले. तसेच राज्य सरकारने याबाबत आपले म्हणणे मांडावे असा आदेशही न्यायालयाने दिला. गोकुळ अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात गेल्याने सोमवारी काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Gokul chairman election in court)