कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुतीच्या बारा संचालकांनी गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या सभेवर बहिष्कार घातल्याने कोरमअभावी निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. महायुतीकडून रडीचा डाव खेळला जात असल्याची भावना दूध उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. आजची सभा तहकूब झाल्याने अध्यक्षपद निवडीसाठी नवीन सभा बोलावली जाणार आहे. (Meeting for the election of the Gokul chairman adjourned)
महायुतीचा निवड सभेवर बहिष्कार
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचा पराभव करत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत सत्ता काबीज केली. निवडणुकीच्या प्रचारात गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा सतेज पाटील यांनी केली होती. आज गुरुवारी (दि.२९) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशिकांत पाटील चुयेकर अर्ज भरणार होते. पण महायुतीच्या संचालकांनी या सभेवर बहिष्कार घातला. (Meeting for the election of the Gokul chairman adjourned)
शशिकांत पाटील चुयेकरांची दुसऱ्यांदा संधी हुकली
अध्यक्षपदाच्या निवड सभेसाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती लागते. या नियमाचा आधार घेत महायुतीच्या नेत्यांनी विरोधी संचालकांना सभेला गैरहजर राहण्यास सांगितले. त्यामुळे शशिकांत पाटील यांची अध्यक्षपदाची संधी दुसऱ्यांदा हुकली आहे. सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची सत्ता असताना शेवटच्या वर्षी शशिकांत पाटील चुयेकर यांना संधी देण्याचे निश्चित केले होते. पण काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये असे राजकारण केल्याने शशिकांत पाटील यांची संधी हुकली आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. गमावलेली संधी पुन्हा शशिकांत पाटील यांना मिळणार होती. पण महायुतीच्या संचालकांनी बहिष्कार घातल्याने शशिकांत पाटील यांची संधी हुकली.
अध्यक्षपदाचा निर्णय मुंबईत की कोल्हापुरात?
शासनियुक्त चार संचालकांची नियुक्ती करुन गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारण्याची खेळी महायुतीकडून खेळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शासननियुक्त सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो का याबाबत कायदेशीर आधार तपासला जात आहे. आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा सभा बोलावली जाणार आहे. या सभेला महायुतीचे सदस्य उपस्थित राहतील का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सलग तीन सभा कोरमअभावी तहकूब झाल्या तर चौथ्या सभेला कोरम नसला तरी अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते असा नियम आहे. या नियमाचा अवलंब झाला तर आणखी एक महिना गोकुळच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी राहणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी आपला निर्णय बदलला तर पुढच्या बैठकीत अध्यक्षपदाचा निर्णय होऊ शकतो. पण हा निर्णय कोल्हापुरात होणार की मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार हे पहावे लागणार आहे. (Meeting for the election of the Gokul chairman adjourned)