Farmers’ Workers’ Party : जनसुरक्षा कायद्याविरोधात राज ठाकरेंचा एल्गार

Farmers' Workers' Party

पनवेल : प्रतिनिधी :  शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला आहे. शहरी नक्षलींच्याविरोधात हा कायदा असल्याचे सांगितले गेले. शहरी नक्षलवाद म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करा अशी मागणी ठाकरे यांनी केली. (Farmers’ Workers’ Party)

शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या मंचावर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आले होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट हे एकाच मंचावर तसा हा दुर्मिळ योग होता. मात्र जेव्हा ते एका मंचावर आले तेव्हा जणू काही भगव्या मंचावर लाल ध्वज आल्यासारखे ते दृश्य होते. तेव्हाच्या राजकारणात आणि राजकारण्यांमध्ये संमजसपणा होता. आता जेव्हा शेकापच्या वर्धापनदिनानिमित्त मी येथे आलो आहे. तेव्हा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत देखील आहेत. त्यामुळे लाल मंचावर दोन भगवे ध्वज एकत्र आले आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी नाही, मी गुजराती आहे. मात्र जेव्हा आम्ही मराठीचा आग्रह धरला, मराठी बोललो की संकुचित कसे होतो? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये सर्वाधिक डान्सबार कसे? असा कळीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. (Farmers’ Workers’ Party)

राज ठाकरे म्हणाले, “आज रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रदेशात रस्ते आल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर तो प्रदेश बरबाद होतो. त्यामुळे रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही घेतली पाहिजे,” असा सल्ला शेकापचे जयंत पाटील यांना  दिला.

महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, रायगडमध्ये, महाराष्ट्रात जेवढी विकासाची कामं होत आहेत, त्यासाठी आमची शेती घेतली जात आहे. त्या ठिकाणी मराठी मुलं कामाला लागली पाहिजे. बाहेरुन उद्योगपती  येणार, तुमच्या जमिनी घेणार, धंदे घेणार आणि कसेही वागणार, वाटेल तो थैमान घालणार. आम्ही आमच्या जमिनीसाठी लढलो तर आता तुरुंगात टाकणारा कायदा आणला आहे. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात, असा तो कायदा आहे. अर्बन नक्षल शहरामध्ये राहाणारा, तुम्ही कोणत्या प्रकल्पाला विरोध केला, उद्योगाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करणार. एकदा अटक करुच देत. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान राखून आणावे लागतील,” असा इशारा राज ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

राज्यात कुठून कुठे रस्ते जाणार हे मंत्र्यांना बरोबर माहित असते. कारण तेच रस्ता ठरवणार आणि रस्ता होण्याआधी तेच जमिनी घेणार. मग उद्योगपतींशी तेच तडजोड करुन गब्बर होणार. निवडणूक आली की विचार, विषय बाजूला फेकून तुमच्या तोंडावर पैसे फेकून मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे. याच्या खोलात जाऊन विचार करण्यास कोणीही तयार नाही, अशी मंत्री, आमदार आणि उद्योगपती, ठेकेदार यांच्या साखळीवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. (Farmers’ Workers’ Party)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर