जमीर काझी : मुंबई : बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व कायदा हतबल झाल्याचे दिसत आहेत. राज्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची धमकच राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केली. (Fadnavis is an irresponsible Chief Minister)
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते. दीड वर्षापूर्वी बदलापुरात लहान शाळकरी मुलींवर अशीच घटना घडली होती पण सरकारने या प्रकरणातील महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. जनतेने रस्तावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली होती पण पुढे या प्रकरणाचे काय झाले, हे राज्याने पाहिले आहे. भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या या घटनेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई केली नाही. या गुन्ह्यात शाळेचा सचिव तुषार आपटेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असताना भाजपाने त्याला स्विकृत नगरसेवक केले होते. प्रशासन कामच करत नाही त्यामुळे गुन्हेगारांचे मनौधैर्य वाढले आहे. काल बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. (Fadnavis is an irresponsible Chief Minister)
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडलेला आहे. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा एका प्रकरणात फरार होतो, तो वडिल मंत्र्यांच्या संपर्कात असतो पण पोलीस मात्र त्याच्यापर्यंत पोहचत नाहीत. असे मंत्री मंत्रीमंडळात आहेत, मुख्यमंत्री एवढे हतबल का आहेत? असा प्रश्न उच्च न्यायालयाला विचारावा लागतो. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांना भाजपाच्या माजी खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करावी लागली पण या प्रकरणातही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर कसलीच चौकशी न करता क्लिनचिट देऊन टाकली. अंकिता भंडारी, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाशी संबंधित लोक असल्याचे स्पष्ट झालेले आहे पण कारवाई मात्र केली जात नाही. भाजपा महायुती सरकारमध्ये आका, खोके, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान आहे. महिला व मुलींची सुरक्षा तर रामभरोसे आहे, असल्याची टीकाही त्यांनी केली. (Fadnavis is an irresponsible Chief Minister)