गोकुळच्या दूध उत्पादकांना ११७ कोटींची दिवाळी भेट

Diwali gift of Rs 117 crore to Gokul milk producers

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दर फरक सणासुदीच्या काळात देण्याची गोकुळची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत संघाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील म्हैस व गाय दुधाच्या अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपयाची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. (Diwali gift of Rs 117 crore to Gokul milk producers)

म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर सव्वा दोन रुपये फरक

          आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे (३.८१%) व गाय दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे (३.५१%) याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. दूध संस्थांसाठी प्रतिलिटर सरासरी २० पैसे याप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स खाती जमा करण्यात आले आहेत. गोकुळची सन २०२५-२६ मध्ये ४,१८५ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली आहे.

दूध संस्थांच्या बँक खात्यात रक्कम जमा

          गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ६३ कोटी १२ लाख ११ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता ३९ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये व डिबेंचर व्याज ६.५० टक्के प्रमाणे ११ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये, असे एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे. तसेच लाभांश (डिव्हीडंड) ११ टक्के प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अदा केले जाईल. 

पाच लाख दूध उत्पादकांना लाभ

         या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील गोकुळ संलग्न ८ हजार दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे.  गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा ओलांडला असून, दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात सणानिमित्त २५ लाख ४५ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ६१ रुपये ९८ पैसे, तर गाय दूध उत्पादकास ३७ रुपये ५३ पैसे इतका उच्चांकी सरासरी दूध दर अंतिम दर फरकासह मिळाला आहे. (Diwali gift of Rs 117 crore to Gokul milk producers)

          गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दीपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदांना अदा करून त्यांच्या दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले. दूध उत्पादक सभासदांच्या आनंदात भर घालण्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच प्राधिकृत अधिकारी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Diwali gift of Rs 117 crore to Gokul milk producers)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक