कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार यांनी दिला. आगामी गळीत हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्यांनी इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. (Farmers express anger at a meeting held by Guardian Minister Abitkar)
ऊस दराबाबत सकारात्मक तोडगा काढणार
शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य दर देण्याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
बैठकीत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा दर आणि साखर कारखानदारांकडून देण्यात येणाऱ्या दरामध्ये तफावत आहे. या दोहोंमध्ये समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कारखानदार, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करुन योग्य तो तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. (Farmers express anger at a meeting held by Guardian Minister Abitkar)
शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा
राजू शेट्टी म्हणाले, ऊस दर निश्चित करण्याबाबतची चर्चा यापूर्वीच व्हायला हवी होती. १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने बंद राहिले असते, तरी उसाची रिकव्हरी वाढून शेतकऱ्यांचाच फायदा झाला असता. कारखानदारांनी घाईघाईने ऊसतोड मजूर आणून ठेवल्यामुळे त्यांच्यामध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
जिल्ह्यात सुरू असलेला एक कारखाना बंद करा
जिल्ह्यातील एकच साखर कारखाना सध्या सुरू आहे. तो कारखाना कायद्यापेक्षा आणि जिल्ह्यापेक्षा मोठा आहे का, असा सवाल सर्व शेतकरी संघटनांनी उपस्थित केला. ‘आम्ही कोणालाही जुमानत नाही आणि बैठकीला येणार नाही,’ अशी भूमिका घेणाऱ्या कारखानदारांवर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित कारखाना बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
आमदार चंद्रदीप नरके यांनीही साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊस दराबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आवाहन केले. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सह संचालक (साखर) उज्वला पळसकर, सहकार व साखर आयुक्तालयाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, वजन मापे विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आंदोलनामुळे केंद्राला समिती नेमावी लागली
बैठकीनंतर बोलताना पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन त्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला पुरवणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. कारखानदार बैठकीला कोणतीही पूर्वतयारी करून आले नव्हते. त्यामुळेच बैठकीत गोंधळ निर्माण झाला.कर्नाटकातील साखर कारखानेही सध्या बंद आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या सात वर्षांत कारखानदारांना साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवून घेता आलेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आणि चळवळीच्या दबावामुळेच केंद्र सरकारला तज्ज्ञांची समिती नेमावी लागली. ही तज्ज्ञ समिती ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार असून, दिवाळीपूर्वी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरच्या आत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला निर्णय घेण्याच्या दिशेने पावले उचलावी लागली. यामध्ये कारखानदारांचे योगदान शून्य आहे.अशा परिस्थितीत ‘आम्ही शेतकऱ्यांना जुमानत नाही,’ अशी भूमिका घेणे कारखानदारांचे अतिशहाणपण असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. (Farmers express anger at a meeting held by Guardian Minister Abitkar)