गोकुळ दूध संघः सरकारी डेअरीपासून सहकारी मलईपर्यंत

  • विजय चोरमारे

आमदारकी आणि गोकुळ दूध संघाचे संचालकपद असे दोन पर्याय समोर ठेवले, तर कुठलाही नेता आमदारकीकडं गोकुळच्या संचालकपदाला पसंती देईल, असं म्हटलं जातं. गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून दोन पॅनल समोरासमोर उभी ठाकली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची असलेली आणि संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणा-या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाची वाटचाल समजून घेऊया.

शासकीय दूध डेअरीचा निर्णय

शेतक-यांना शेतीबरोबरच जोडधंदे सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली होती. त्यात प्रामुख्याने दूध उत्पादन आणि कोंबडीपालन हे दोन व्यवसाय सहज जमणारे होते. परंतु च दूध संकलन कुणी करायचे, ते टिकवून कुणी ठेवायचे, शहरांत कुणी पाठवायचे असे प्रश्न पुढे आले. त्यातूनच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार कोल्हापूरमध्ये १९६२ साली शासकीय डेअरी सुरू झाली.

हेही वाचाः गोकुळ निवडणूक चिन्ह वाटपात मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप

कोल्हापूरच्या ताराबाई पार्क येथे एक प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याद्वारे जिल्ह्यातील दूध संकलित करून ते मुंबईला पाठवले जाऊ लागले. त्याचवेळी करवीर तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन एन. टी. सरनाईक यांच्या डोक्यात एक कल्पना आली. ती कल्पना होती मिल्क फेडरेशनची.

अर्थात करवीर तालुका शेतकरी संघाचा दूध वितरण विभाग कार्यरत होता. त्यातून त्यांना ती कल्पना सुचली असावी. त्यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या सहका-यांसमोत तसा प्रस्ताव ठेवला. आपण दूध संकलन करू आणि ते सरकारला घालू. त्यातून शेतक-यांचे दूध विकले जाईल आणि त्यांना चांगला दर मिळेल, असे त्यांना वाटत होते. आनंदराव पाटील चुयेकर यांच्यासह सहका-यांना ही कल्पना पसंत पडली. त्यातून जिल्ह्यात मिल्क फेडरेशनची स्थापना झाली.

एन. टी. सरनाईक हे फेडरेशनचे पहिले अध्यक्ष झाले. एस. वाय. पाटील हे उपाध्यक्ष बनले. एन. टी. सरनाईक हे सहकार क्षेत्रातले जाणकार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. जिल्हा बँक, शेतकरी संघ यांच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता, आणि मिल्क फेडरेशनच्याही.

सहाशे लिटर दूध संकलन

ग्रामीण भागातल्या १५ ते १६ सोसायट्या या फेडरेशनला दूध घालत होत्या. रोज अंदाजे सहाशे लिटर दूध संकलित केले जात होते. त्याचवेळी हातकणंगले, कागल, करवीर या तालुक्यात तसेच वारणानगरला दूध संकलनाचे असेच प्रयोग होत होते. हे सगळेच दूध शासकीय डेअरीला घातले जात होते.

हेही वाचाः गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

दूध तापवणे, ते बर्फाच्या सहाय्याने थंड करणे, नंतर ते मुंबईला पाठवणे हे सगळे खर्चिक काम होते. त्यातून शासकीय डेअऱीला खूप तोटा होत होता.सरकारी डेअरीतल्या सरकारी कामकाजाचा कुठल्याच घटकाला फायदा होत नव्हता. पुढे पुढे तर शासकीय डेअरीला फेडरेशनची बिले वेळेत देणे जमेना झाले. त्यामुळे सगळी यंत्रणाच कोलमडल्यासारखी झाली. फेडरेशनला बिले मिळेनात म्हणजे शेतक-यांना बिले मिळणेही अवघड बनले. या सगळ्यातून शेवटी फेडरेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिल्क फेडरेशनचं पुनरुज्जीवन

एक-दोन वर्षांचा कालावधी असाच गेला. सरकार ढिम्म होते. फेडरेशनची मंडळी भेटत होती, परंतु त्यांनाही मार्ग सापडत नव्हता. दरम्यानच्या काळात एनटी सरनाईक आणि अन्य मंडळींच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले. त्यानंतर एस. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला आणि मिल्क फेडरेशनचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं.

हेही वाचाः ‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

तरुण कार्यकर्ते असलेल्या आनंदराव पाटील-चुयेकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. १९७१ मध्ये चुयेकर हे फेडरेशनचे अध्यक्ष झाले. एस. वाय. पाटील कार्यकारी संचालक झाले. सगळ्यांनी पुन्हा नव्या उत्साहाने फेडरेशनचे काम सुरू केले. मात्र दूध डेअरीचा कारभार आधीसारखाच सरकारी होता. तिथे फेडरेशनची दखल घेणारे कुणी नव्हते.

वर्गीस कुरिअन यांचे आगमन

दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये दुधाच्या क्षेत्रात बरंच काही घडत होतं. तिथं १९४६ सालीच कैरा जिल्हा दूध संघाची स्थापना झाली होती. त्रिभुवनदास पटेल त्याचे अध्यक्ष होते. अमेरिकेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या वर्गीस कुरियन यांना त्यांनी सोबत घेतले. १९५० मध्ये कुरियन कैरा जिल्हा दूध संघाचे जनरल मॅनेजर बनले. त्यांनीच अमूल ब्रँड बाजारात आणला.

अमूल बटर देशभरात जाऊ लागले. १९६५ मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची म्हणजे एनडीडीबीची स्थापना झाली. त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुरियन यांच्याकडे दिली आणि देशभरातील धवलक्रांतीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांना देशभरात आणंद पॅटर्न राबवायचा होता. शेजारच्या महाराष्ट्रात कोठे काय करता येईल, याची चाचपणी सुरू होतीच.

कोल्हापूर दूध संघाचा जन्म

एन. टी. सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील करवीर तालुका शेतकरी संघाचा दूध वितरण विभाग होता. १९६३ साली याच विभागाची नोंदणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन या नावाने नोंदणी करण्यात आली. याच सुमारास सरकारनं सहकारी तत्त्वावर दूध संघ स्थापन करण्यास परवानगी द्यायला सुरुवात केली होती.

फेडरेशनच्या बैठकीत आनंदराव पाटील चुयेकर यांनी सहकारी तत्त्वावर दूध संघ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. सर्वांनी त्याला अनुमती दिली. सरकारचीही परवानगी मिळाली. त्यातूनच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ ही संस्था जन्माला आली. आनंदराव पाटील चुयेकर हे संस्थेचे पहिले अध्यक्ष बनले. चुयेकर यांचे योगदान महत्त्वाचे असले तरी हे रोपटे एन. टी. सरनाईक यांनी लावले होते, हे विसरता कामा नये.

आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या सौम्य प्रकृतीच्या नेतृत्वामुळे दूध संघाचा कारभार ख-या अर्थानं सहकारी तत्त्वावर सुरू झाला होता. जिल्ह्यातील सामान्य दूध उत्पादक शेतक-यांना संघ आपला वाटू लागला होता. त्यातूनच जिल्ह्यात सव्वाबाराशे गावांमधून सुमारे पाच हजार दूध संस्था निर्माण झाल्या. सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातला मानाचा तुरा म्हणून जिल्हा दूध संघ मिरवू लागला.

पंधरा दिवसांनी बिले

शासकीय डेअरी दूध उत्पादकांना महिन्याला बिल देत होती, तो पायंडा मोडून दूध संघाने दर पंधरा दिवसांनी बिले देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरीही खूश झाले. पंधरा दिवसाला मिळणा-या पैशामुळे शेतक-यांच्या प्रपंचातली महिना अखेरची ओढाताण कमी झाली.

अशा रितीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाने शेतक-यांचा विश्वास संपादन केला. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली संघाची स्थापना आणि भरभराटही झाली. पुढे कोल्हापूरहून बेळगावला जाण्याच्या रस्त्यावर गोकुळ शिरगाव येथे संघाचे कार्यालय सुरू झाले. त्या गोकुळ शिरगाव गावाच्या नावावरून गोकुळ हे ब्रँडनेम निश्चित करण्यात आले.

दूध संस्थेसाठी अत्यंत समर्पक असे ते नाव होते. राज्यभर नव्हे तर देशभर त्या ब्रँडनेमचा डंका वाजला. कधी चांगल्या कारभारासाठी. कधी तिथल्या बहुचर्चित व्यवहारासाठी. शेतक-यांच्या आयुष्यात आर्थिक स्वावलंबन आणणा-या या संघाची सार्वजनिक व्यवहारांची चर्चा मात्र तिथल्या मलईच्या संदर्भानेच अधिक होऊ लागली. इतकी की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद हवे, असे म्हणण्याजोगती परिस्थिती आली.

गोकुळ दूध संघातलं राजकारण आणि सत्तासंघर्ष पुढच्या लेखात.

(क्रमशः)

Related posts

शिवसेना आणि धनुष्यबाण इतिहासजमा होण्याच्या दिशेने

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कितपत संबंध?

सांगलीच्या पटवर्धन घराण्यांतील वादाला सव्वादोनशे वर्षांची परंपरा