नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १११ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, उपहारगृह, लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. तेल विपणन कंपन्याकडून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केल्याची माहिती दिली आहे. (Commercial cylinder prices increased)
१९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर याआधी १५८०.५० रुपये होता. आता या सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपये इतकी झाली आहे. ही वाढ देशातील प्रमुख शहरांमध्ये लागू करण्यात आली असून मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये दर वाढलेले दिसत आहेत. (Commercial cylinder prices increased)
मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १५३१.५० रुपयांवरून थेट १६४३.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. चेन्नईमध्ये हीच किंमत १७३९.५० रुपयांवरून १८४९.५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इतर शहरांमध्येही याच धर्तीवर दरवाढ करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात थोडी घट करण्यात आली होती. त्या वेळी दिल्ली आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये सिलेंडर स्वस्त झाले होते. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या दरवाढीचा परिणाम केवळ व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता, त्याचा अप्रत्यक्ष भार सर्वसामान्य ग्राहकांवरही पडण्याची शक्यता आहे. कारण हॉटेल, खानावळी आणि सेवा क्षेत्रातील खर्च वाढल्यास त्याचे दरही वाढू शकतात. (Commercial cylinder prices increased)