कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणातील कट्टर विरोधक आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे नेते एकत्र आले आहेत. चंदगड नगरपंचायतीनंतर दोन्ही राष्ट्रवादी कागल नगरपालिका निवडणुकीत एकत्र आले आहेत. गेल्या दहा वर्षे गल्लीपासून ईडीपर्यंत राजकारणाचे टोक गाठले असतानाही नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे गटाचे मनोमिलन झाले आहे. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट एकाकी पडले आहेत. दोन्ही गट एकत्र आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. (Both NCPs together in Kagal)
चोवीस तासात वारे फिरले
कागल तालुक्यात गटातटाचे राजकारण असल्याने कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे तर समरजीत घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण चोवीस तासात कागलमध्ये राजकारणाचे वारे फिरलेआहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याने कागलच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीला रंग भरला आहे.
मुश्रीफ गटाला नगराध्यक्ष, घाटगे गटाला उप नगराध्यक्षपद
चंदगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणुका लढवणार आहेत. चंदगड पाठोपाठ आता कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ यांनी थेट विरोधक घाटगे गटाबरोबर युती करुन विरोधकांना चकीत केले आहे. नगराध्यक्ष पद मुश्रीफ गटाला तर उप नगराध्यक्ष समरजीत घाटगे गटाला देण्यात आले आहे. उद्या मंगळवारी दोन्ही गटाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. मुश्रीफ आणि घाटगे हे दोघे मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान घाटगे मुश्रीफ गट एकत्र झाल्याने दोन्ही गटांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. (Both NCPs together in Kagal)
मुरगुडमध्ये भाजप शिवसेना युती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रवेश केलेल्या प्रविणसिंह घाटगे यांनी गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेसाठी शड्डू ठोकला होता. कागलमध्ये मुश्रीफ घाटगे गट एकत्र आल्यानंतर मुरगुडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आहेत. पण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रविणसिंह घाटगे यांच्या पत्नी सुहासिनी पाटील यांना शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारी घोषीत केली. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अमरिषसिंह घाटगे उपस्थित होते. भाजप शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादीचे दोन्ही गट अशी लढत होणार आहे. (Both NCPs together in Kagal)