कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून मुश्रीफांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. मुश्रीफ घाटगे दोन्ही गट एकत्र आल्याने ईडीचा संभ्रम दूर झाल्याची भावना व्यक्त केली आहे. (Mushrif apologizes)
पत्रकात मुश्रीफ यांनी असे म्हणले आहे की, राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी-कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आज आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो. (Mushrif apologizes)
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त करताना मुश्रीफांनी पत्रकात असे म्हटले आहे की, माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे. सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरुन कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही असेही मुश्रीफांनी स्पष्ट केले. (Mushrif apologizes)
मंगळवारी १८ रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत, असेही मश्रीफांनी स्पष्ट केले. कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. शामराव भिवाजी पाटील व. सदाशिवराव मंडलिक,. सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरुन कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु यामध्ये “ईडी” ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. “देर आये… दुरुस्त आये….” असे ईडीबाबत मुश्रीफांनी पत्रकात भाष्य केले आहे. (Mushrif apologizes)
राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करूया असे आवाहनही मुश्रीफांनी केले आहे.