कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात आज शुक्रवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची महाविद्या श्री भुवनेश्वरी माता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली. आज शुक्रवार देवीचा वार असल्याने पावसाची तमा न बाळगता राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आल्याने गर्दी झाली होती. शनिवारी त्र्यंबोली यात्रा असून टेंबलाई टेकडीवर कोहळा पूजन होणार आहे. अंबाबाईची पालखी शनिवारी टेंबलाई टेकडीवर त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाणार आहे. (Bhuvaneshwari)
देवी अंबाबाईची आज पाचव्या दिवशी श्री भुवनेश्वरी रुपातील पूजा बांधण्यात आली. अरुणोदया प्रमाणे भुवनेश्वरी देवीच्या शरीर वर्ण असून, मुकुटावर तिने चंद्र धारण केला आहे. देवी त्रिनेत्रयुक्त असून, प्रसन्नमुखी आहे, तिच्या वरील दोन हातात, वरदहस्त व अंकुश तर खालील दोन हातात अभय व पाशयुक्त आहेत. (Bhuvaneshwari)
प्राचीन ग्रंथात देवीचे वर्णन केले आहे. सृष्टि उत्पतीकाळी जेव्हा ब्रह्मदेवाने सोमाहुती द्वारा यज्ञ संपन्न केला, तेव्हा जी शक्ती षोडशीरुपात विद्यमान होती, तीच त्रिभुवनाचे रक्षण करू लागली आणि तीच ‘भुवनेश्वरी’ नावाने विख्यात झाली. तिलाच ‘राजराजेश्वरी’ देखील म्हणतात. ही चौथी महाविद्या असून, हिचा महादेव भैरव आहे, हिची भाद्रपद शु. १२ ला उत्पत्ती झाली, काली कुलातील ही देवता, पूर्वाम्नायपीठस्था आहे. आदिशक्ती, भुवनेश्वरी, ज्येष्ठा, रौद्री, शताक्षी, स्मेरमुखी आदि हिचे प्रकार व उपासनाभेद आहेत. वाचासिद्धि, सौभाग्यवृद्धी, शत्रपराजय, विजयप्राप्ती, षट्कर्मसिद्धि , सकल मनोरथासिद्धि आदि फले हिच्या उपासनेने मिळतात. आजची पूजा श्रीपूजक लाभेश मुनिश्वर, मनोज मुनिश्वर, अविनाश मुनिश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली. (Bhuvaneshwari)