जमीर काझी : मुंबई : आयएएस अधिकारी असल्याचे भासवून हेरगिरी करीत अनेकांना गंडा घालणाऱ्या कल्पना भागवतची अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तिच्या कारनाम्यांची स्थानिक पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस) आणि आयबी या तपास संस्थांकडून चौकशी सुरू आहे. कल्पना भागवतने एका खासदारासह एका विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंलाही मोठा गंडा घातला आहे. (Bhagwat’s deception)
कल्पना भागवतने अनेक राजकीय नेत्यांना राज्यसभेचे तर काहींना पद्मश्री मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छ. संभाजीनगर पोलिसांनी कल्पना भागवत हिला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. ही तोतया महिला आयएएस अधिकारी भागवत सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती. तिच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी उघडकीस आल्या आहेत. तिचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. तिच्या बँक खात्याचा तपशिलातून वेगवगेळी माहिती समोर येत आहे. कल्पना भागवतची एटीएस, आयबीसारख्या तपास यंत्रणा चौकशी करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. (Bhagwat’s deception)
कल्पना भागवतने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शहाबुद्दीन पठाण यांची फसवणूक केली आहे. या चौकशीमधील माहितीनुसार तिनं आयएएस अधिकारी म्हणून शहाबुद्दीन पठाण यांची भेट घेतली. या भेटीत तिनं अनेक जणांच्या ओळखी सांगितल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर विश्वास बसल्याचं डॉ. पठाण यांनी सांगितले. तिनं काही पैसे घेतल्याचा जबाब डॉ पठाण यांनी मंगळवारी रात्री दिला.
भागवत हिने अनेक राजकीय मंडळींना फसवलं असल्याचं तपासात उघड झालं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टेकर यांच्याकडूनही एक लाखांची गंडा घातला आहे. याप्रकरणी खा. अष्टीकर यांनी सांगितले की, आपण राजकीय नेते असून एका मंदिरासाठी एक लाख रुपयांची मदत मागितली. (Bhagwat’s deception)
स्थानिक पोलिसांनी तिच्या संपर्कात असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई आणि तिचा अफगाणी मित्र अशरफची कसून चौकशीला सुरुवात केली आहे. तिघे संपर्कात कसे राहायचे? किती वेळा भेटले? अशरफनं त्याचा भाऊ गिल याला कल्पनाच्या संपर्कात का आणले? त्यामागे त्याचा उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तर तपास यंत्रणा शोधत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.