Balasaheb thackeray death controversy बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू कधी, कसा झाला ?

दस-याला दोन्ही शिवसेनांचे मेळावे झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुखांची भाषणे झाली. त्यांची चर्चाही झाली. परंतु दुस-या दिवशी चर्चा उरली आहे, ती फक्त रामदास कदम यांच्या भाषणाची. (Balasaheb thackeray death controversy)

रामदास कदम हे कट्टर शिवसैनिक होते. शिवसेनेने त्यांना भरपूर लाभही दिले. २०१४ साली भाजपसोबतच्या सरकारमध्ये शिवसेनेचे जे पाच मंत्री होते, त्यातही रामदास कदम होते. शिवसेनेत फूट पडली तेव्हा रामदास कदम टीव्हीच्या कॅमे-यासमोर ढसढसा रडलेले सगळ्यांनी पाहिले. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक टीका करीत असतात. त्याअर्थानं सध्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना त्यांचा चांगला उपयोग होत असतो. (Balasaheb thackeray death controversy)

रामदास कदम का बोलले ?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात रामदास कदम यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला. त्याद्वारे उद्धव ठाकरे यांच्याभोवती एक संशयाचं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजकारण कुठल्या पातळीपर्यंत गेलं आहे, हे यावरून दिसून येतं. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू २०१२ साली झाला. त्या घटनेला आता तेरा वर्षे होतील. दरम्यानच्या काळात रामदास कदम यानी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षे काम केलं. शिवसेनेकडून मंत्री म्हणूनही काम केलं. म्हणजे सत्तेचे लाभ मिळत असताना बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल त्यांची काही तक्रार नव्हती. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलल्यावर अधिक लाभ मिळणार आहेत, त्यामुळे ते अधिक बोलत असावेत. (Balasaheb thackeray death controversy)

रामदास कदम यांनी या पातळीवर जाऊन बोलण्याचं कारण काय, तर त्यांच्या पत्नीच्या नावावरील डान्स बारचा विषय. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित केला. एरव्ही हा विषय तेवढा चर्चेचा ठरला नसता. परंतु रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. आणि गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्स बार ही मोठी बातमी ठरते.

त्या विषयाची विधिमंडळात चर्चा झाली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा अनिल परब यांनी विधान परिषदेत  केला होता.

डान्स बार हे वादाचे मूळ

रामदास कदम यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले होते की,  १९९० पासून सावली बार सुरू आहे. माझ्या पत्नीच्या नावावर आहे. व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण नाही. शेट्टी नावाच्या व्यक्तीला ३० वर्षांपासून आम्ही हॉटेल चालवायला दिले आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये आम्ही तिथे पायही ठेवला नाही. तिथे १४ महिलांचे वेटरसाठी परमिशन आहे. तो डान्सबार नाही. अनिल परब यांनी डान्सबार आहे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तो चुकीचा आहे. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एका गिऱ्हाईकाने लेडीज वेटरवर पैशाची उधळण केल्याचं कळलं. म्हणून आम्ही ताबडतोब शेट्टीला बाहेर काढलं. त्याच्यावर कारवाई केली. मुलींचं वेटरचं लायसन्स रद्द केलं. आम्ही आर्केस्ट्राचं लायसन्स होतं तेही रद्द केलं. आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते हॉटेलही बंद केलं. अशा पद्धतीने घाणेरड्या डान्सबारचे पैसे आम्ही घेत नाही, असा खुलासा रामदास कदम यांनी केला होता. (Balasaheb thackeray death controversy)

तुम्ही बोलाल, तर मी बोलणार…

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या नेत्यांकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही या विषयावरून कदम यांना टार्गेट केले जात आहे, त्यावरून रामदास कदम यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले दिसते. जेवढं माझ्या मुलाच्या मागे लागणार ना, तेवढं मी अजून बोलणार. माझ्या मुलाच्या मुळावर उठताय, राजीनामा मागताय, फक्त एकटयाला टार्गेट करताय. मी मातोश्रीत ५५ वर्ष काढली आहेत. तुम्ही किती वेळा बॅगा भरून जात होतात, हे सर्व माहित आहे. सूड भावनेने तुम्ही वागत आहात, असे कदम यांनी म्हटले आहे. म्हणजे योगेश कदम यांना ठाकरे टार्गेट करीत आहेत म्हणून रामदास कदम यांनी तेरा वर्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात गंभीर आरोप केला आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह

शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठं विधान करतोय याची जाणीव मला आहे. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पारकर यांना विचारा. त्यांनीच मला हे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचं काय चाललं होतं?

आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो. मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? कोणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? त्यावेळी मातोश्रीवर या सगळ्याची चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, काढा सगळी माहिती, असे रामदास कदम यांनी म्हटले. (Balasaheb thackeray death controversy)

कदमांचे डॉक्टरांकडे बोट

सभेनंतर ही माहिती तुम्हाला कोणी दिली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर रामदास कदम यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मी जे वक्तव्य केलं, ती माहिती मला डॉक्टरांनी दिली. ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांनीच मला हे सांगितलं. मातोश्रीवरही तशी चर्चा होती. ‘ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है’. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणार. अजून खूप काही आहे, आम्ही हळूहळू सगळं बोलणार.

इतकं गंभीर विधान केल्यानंतर त्याची चर्चा तर होणारच. तशी ती सुरू झाली आहे.

संजय राऊत यांचा पलटवार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यासंदर्भात सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, तेव्हा हे लोक नव्हते तिथे, मी होतो तिकडे. आम्ही तेव्हा मातोश्रीवर होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात, आम्ही शेवटपर्यंत तिथे होतो. आम्हाला माहीत आहे. आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते जर आता उगाळत असतील तर तुम्ही काय करणार ? शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं, त्यांचं आता जन्मशताब्दी वर्ष येईल. आणि आता अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे बाळासाहेबांशी बेईमानी आहे. (Balasaheb thackeray death controversy)

राज-उद्धव कलगी तुरा

शिवसेनाप्रमुख हयात असताना मातोश्रीवर त्यांच्या प्रकृतीची हेळसांड होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये एका जाहीर सभेत केला होता. एकदा मी त्यांना भेटायला गेलो असता त्यांच्यासमोर दोन तेलकट वडे आले. त्यांना विचारलं असता, काय करणार, हेच येतं समोर माझ्या असं ते म्हणाले होते, असा राज यांनी आरोप केला होता. त्यानंतर आपण त्यांना चिकन सूप पाठवत होतो, असं ते म्हणाले.

खरंतर राज ठाकरे यांनी कितीही टीका केली तरी आपण त्यांना उत्तर देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी आधी जाहीर केलं होतं. परंतु राज ठाकरे यांच्या या टीकेनंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी राज यांचा समाचार घेतला होता. ज्यांची लायकी नसताना बाळासाहेबांनी त्यांना ‘सुपा’ एवढं दिलं ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय? असा प्रश्न उद्धव यांनी विचारला होता.

तर मूळ विषय आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचा

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास करण्यात आली होती.

ते दिवस दिवाळीचे होते. १५ नोव्हेंबरला भाऊबीज होती. त्यादिवशी चर्चा अशी होती, की बाळासाहेबांचा मृत्यू झाला आहे, परंतु भाऊबीज असल्यामुळे लोकांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून त्याची घोषणा केली जात नाही. अर्थात मोठी माणसे व्हेंटिलेटरवर असली तरी अशा प्रकारच्या चर्चा असतात.

कुजबूज चव्हाट्यावर

रामदास कदम यांनी जो आरोप केला आहे, तशा प्रकारची कुजबूज बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुरू झाली होती. परदेशी बँकेत पैसे ठेवले आहेत आणि बाळासाहेबांच्या हाताच्या ठशाशिवाय ते मिळू शकत नाहीत, त्यामुळे मृत्यू होऊनही तो जाहीर करण्यात आला नव्हता, अशी कुजबूज होती. अशा कुजबुजीला तसा काही अर्थ नसतो. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात सात ते आठ प्रकारचे दावे केले जातात. मुंबईच्या राजकारणात, दिल्लीच्या राजकारणात त्याची चर्चा, कुजबूज होत असते. बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भातल्या या चर्चेलाही कुजबुजीपलीकडे फारसा अर्थ आहे, असे वाटत नाही. (Balasaheb thackeray death controversy)

परंतु त्यावेळची प्रसारमाध्यमे काय म्हणतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

डॉ. जलील पारकर यांचे स्पष्टीकरण

बाळासाहेबांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांचा मृत्यू साडेतीन वाजता झाल्याचे सांगितले होते. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास माध्यमांसमोर येऊन त्यांनी सांगितले होते की, “मोठ्या दुःखाने कळवावे लागते आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे दुपारी ३:३० वाजता हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने निधन झाले. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही.”

प्रसारमाध्यमे काय म्हणतात?

एनडीटीव्हीने बाळासाहेबांच्या मृत्यूची जी बातमी दिली आहे, त्यात म्हटलं आहे की,

शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांचे आज दुपारी ३:३३ वाजता मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

जुलै महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास व बद्धकोष्ठतेमुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आणि त्यानंतर ते बांद्र्यातील ‘मातोश्री’ निवासस्थानीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते.

सोमवारी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती, पण नंतर थोडी सुधारणा दिसून आली. त्या वेळी हजारो शिवसैनिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मातोश्रीबाहेर जमले होते. बुधवारी पहाटे दोन वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले – “सर्व प्रयत्न सुरू आहेत, कृपया प्रार्थना करा.”

बुधवारी रात्री परिसरात शेकडो पोलीस आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. ठाकरे यांची तब्येत खालावल्याची बातमी समजताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते मातोश्रीकडे जमा होऊ लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वजनिक घोषणा करण्यापूर्वीच मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती, जेणेकरून सुरक्षा व्यवस्था वेळेत करता येईल.(Balasaheb thackeray death controversy)

हिंदू, इंडिया टुडे काय म्हणतात?

हिंदू या प्रतिष्ठित दैनिकाने म्हटले होते की, महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला. शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांचे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या बांद्र्यातील ‘मातोश्री’ निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. निधनाच्या वेळी ते ८६ वर्षांचे होते.

संध्याकाळी पाच वाजता त्यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. जलील पार्कर यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत.

इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे की, यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेले बाळ ठाकरे यांचे शनिवारी दुपारी ३:३३ वाजता निधन झाले.

टाइम्स ऑफ इंडियाची बातमी

टाइम्स ऑफ इंडियाने थोडे सविस्तर लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, १४ नोव्हेंबरला एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली होती. ‘मातोश्री’मधील त्यांची खोलीच आयसीयूमध्ये (ICU) रूपांतरित करण्यात आली होती आणि डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. पुढील २४ तासांत त्यांच्या रक्तदाब आणि हृदयाचे ठोके काही प्रमाणात स्थिर झाले होते. मात्र प्रकृतीतील चढ-उतार सुरूच राहिले आणि अखेरीस शनिवारी दुपारी ३:३३ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बाळ ठाकरे यांचे वैयक्तिक डॉक्टर डॉ. जलील पार्कर, जे २००९ पासून त्यांच्यावर उपचार करत होते, यांनी शनिवारी दुपारी मातोश्रीबाहेर त्यांच्या निधनाची घोषणा केली.

जुलै महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यावेळी त्यांना श्वसन व स्वादुपिंडाच्या आजारामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १० नोव्हेंबरला त्यांची तब्येत अधिकच बिघडली. गेल्या आठवडाभर ते अतिगंभीर अवस्थेत होते, ज्यात अनेक अवयव निकामी झाले होते.

एकूण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर