कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेतील तक्रारी आणि शंका निरसन करण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील “१८१” या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, त्याद्वारे या योजनेबाबतीतील समस्या व अडचणींचे निराकरण करण्यात येत आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी “ई – केवायसी” अनिवार्य केली. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ स्वरूपाची असून, ऑनलाईन अर्जात प्रश्नांची उत्तरे अज्ञानामुळे अथवा तांत्रिक कारणांमुळे चुकीची भरल्याने लाखो महिला या योजनेपासून अपात्र ठरल्या आहेत. या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची संधी देण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या? असा तारांकित प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी, या योजनेतील लाभार्ती महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील “१८१” या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, त्याद्वारे या योजनेबाबतीतील समस्या व अडचणींचे निराकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. (“181” women’s helpline for the “Ladki Bahin” scheme)
तारांकित प्रश्न उपस्थित करताना आमदार क्षीरसागर यांनी, या योजनेतंर्गत लाभ घेण्याऱ्या महिलांसाठी “ई केवायसी” अनिवार्य केली असून पती किंवा वडिलांच्या उत्पन्नाची “ई केवायसी” करण्यात येणार असल्यामुळे तसेच मुदतीत “ई केवायसी” केल्यामुळे लाखो लाडक्या बहीणी अपात्र होणार असल्याचे ऑक्टोबर, २०२५ मध्ये निदर्शनास आले आहे. तसेच, “ई केवायसी” करण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट स्वरूपाची असल्याने अनेक पात्र महिलांनी चुकीचे पर्याय निवडले तर काही महिलांना अर्ज परीक्षणादरम्यान अपात्र ठरविण्यात आल्यामुळे पात्र महिला या योजनेच्या लाभापासुन वंचित राहिल्या असल्याचे निदर्शनास आले विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी ऑनलाईन अर्जात प्रश्नांची उत्तरे अज्ञानामुळे अथवा तांत्रिक कारणांमुळे चुकीची भरल्याने त्याना अपात्र ठरविण्यात आले आहे. भविष्यात ग्रामीण व अल्पशिक्षित महिलांकडून अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुविधा सहाय्य केंद्रे किंवा मार्गदर्शन शिबिरे राबविणे, जाचक अटी शिथिल करणे तसेच विशेष अर्ज नोंदणी मोहिम राबविणे व या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्यासाठी मुदत वाढवून देणे व हेल्पलाईन वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण इ. बाबत शासनाद्वारे कोणती कार्यवाही करण्यात आली? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला. (“181” women’s helpline for the “Ladki Bahin” scheme)
लाडक्या बहिणींनी “१८१” हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करावा : आमदार राजेश क्षीरसागर
ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ थांबला असल्यास, बँकेत पैसे जमा न होणे किंवा तांत्रिक कारणामुळे हप्ता रखडणे, अर्जात माहिती भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याबाबत मार्गदर्शन आणि योजनेच्या अटी, पात्रता आणि इतर कोणत्याही शंकांचे निरसन होण्यासाठी लाडक्या बहिणींनी “१८१” या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा. हेल्पलाईन नंबर २४ तास उपलब्ध असून महिला कधीही संपर्क साधू शकतील, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. (“181” women’s helpline for the “Ladki Bahin” scheme)