नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिसार येथील एका महिला ट्रॅव्हल ब्लॉगरला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हेरगिरी आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा असे तिचे नाव आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविल्यानंतर या आठवड्यात हरियाणामधून ही तिसरी अटक आहे. ज्योतीसह सहा जणांचे नेटवर्क या हेरगिरीत गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. (Youtuber Jyoti arrested)
ज्योतीने २०२३ मध्ये दोनदा पाकिस्तानला भेट दिली होती. तिचे ‘‘ट्रॅव्हल विथ जो’’ हे यु ट्युब चॅनेल आहे. ते हरियाणा आणि पंजाबमधील गुप्तहेर नेटवर्कशी जोडले गेले होते.
ज्योतीने पाकिस्तानी गुप्तहेरांना संवेदनशील माहिती शेअर केल्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिच्यावर अधिकृत गुपिते कायदा, १९२३ च्या कलम ३ आणि ५ आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तिच्या अटकेला दुजोरा देताना हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार म्हणाले की, ज्योती मल्होत्राला ताब्यात घेण्यात आले आहे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी तिची चौकशी सुरू आहे. (Youtuber Jyoti arrested)
उपनिरीक्षक संजय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हिसार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआरनुसार, ब्लॉगर २०२३ मध्ये दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे ती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालय (पीएचसी) येथील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली.
‘‘या महिलेने सांगितले की ती एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होती आणि २०२३ मध्ये तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान, ती अली एहवानला भेटली. त्याने तिला पाकिस्तानात राहण्याची आणि प्रवास करण्याची खात्री दिली. एहवानने तिची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. तिथे ती शाकीर आणि राणा शाहबाज यालाही भेटली,’’ असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. ‘‘ज्योतीने शाकीरचे नाव ‘जट्ट रंधावा’ असे ठेवले होते जेणेकरून कोणीही तिच्यावर संशय निर्माण करू नये. २०२३ मध्ये पाकिस्तानहून परतल्यानंतर, ती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर सर्व ऑपरेटिव्हशी संपर्कात होती,’’ असे पोलिस एफआयआरमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षण सुनावणी आता पूर्णपीठासमोर
सरकारची दडपशाही सुरूच