मुंबई : प्रतिनिधी : ढोल ताशांचा दणदणाट, चिरमुऱ्यांची उधळण, मोरयाचा गजर अशा उत्साही वातावरणात विघ्नहर्ता गणरायाचे राज्यात सर्वत्र जल्लोषी स्वागत झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले असून सार्वजनिक मंडळांनी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली. (Welcome to Ganesha)
महाराष्ट्राचा लोकोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सोवाची तयारी गेली कित्येक महिने सुरू आहे. आज बुधवारी पहाटेपासून संपूर्ण राज्यभर गणरायाची मूर्ती आणण्याची लगबग सुरू होती. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांनी मुंबईतील चाकरमनी कोकणात परतले असून गाव, वाड्या, पाड्यात गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, संभाजीनगर, सातारा, सांगली, अहमदनगर या मोठ्या शहरांमध्ये गणरायांच्या स्वागतांसाठी भाविकांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाच वातावरण होते. काही ठिकाणी पावसाची सरी अंगावर झेलत भाविकांनी गणपती मूर्ती आणल्या. कुंभारवाडे, रंगशाळामध्ये मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाल्याने वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Welcome to Ganesha)
घरगुती गणपती आगमनासाठी पारंपरिक वाद्यांना भाविकांनी मोठी पसंती दिली होती. ढोल ताशा, हलगी, बॅन्ड, झांज पथक, बेंजोचा दणदणामुळे गल्लीबोळ दुमुदुमन गेले होते. गणेशोत्सवामुळे बाजारपेठ्यात मोठी उलाढाल सुरू आहे. उकडी मोदकांना मोठी मागणी आहे. मिठाईच्या दुकानात मोठी गर्दी असून विविध चवीच्या मोदकांना मागणी वाढली आहे. अंजीर फ्लेवरच्या मोदकांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. फुले, फळे, हार, मण्यांच्या हार खरेदीत भाविकांचा उत्साह दिसून आला. (Welcome to Ganesha)
सार्वजनिक मंडळांनी यापूर्वीच गणेश मूर्ती वाजत गाजत आणल्या असून भाविकांच्या दर्शनासाठी मूर्ती खुल्या करण्यात आल्या आहेत. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीचा महुर्त साधत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूका काढून मूर्ती आणल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे नेते आणि इच्छुक उमेदवारांचे फ्लेक्स सर्वत्र झळकले आहेत. घरगुती गणपतीचा मुक्काम सहा दिवस असल्याने पुढील आठवडाभर घरोघरी आरत्यांचे स्वर निनादत राहणार आहेत. सार्वजनिक मंडळांकडून देखावे लवकर खुले करण्यावर भर असून मंडळांचे कार्यकर्ते आणि कलाकारांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. (Welcome to Ganesha)