जमीर काझी : मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार राज्यात घडला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असून सुरुवातीला या प्रकरणाला हिंदू आणि मुस्लिम असाही रंग देण्याचा भरपूर प्रयत्न झाला होता. यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात तरुणींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून कारवाई सुरू केली आहे. “पीडित सर्व मुली या मुस्लिम समाजातील आहेत. प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पीडित 8 तरुणींची ओळख पटली असून सर्वजण मुस्लिम समाजातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे एकूण 18 व्हिडिओसह 39 फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद आयान मोहम्मद तनवीर याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार उजैन खान इक्बाल खान यालाही अचलपूर येथून अटक करण्यात आली आहे.
या घटनेसंदर्भात अल्पसंख्याक आयोगाकडं तक्रार दाखल झाली आहे. उद्या अल्पसंख्याक आयोगाची टीम या प्रकरणाच्या तपासाची पूर्ण माहिती जाणून घेणार आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच अल्पसंख्याक आयोगाची भूमिका आहे,” असे प्यारे खान यांनी सांगितले .