डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध

  • हिमांशू नितनवरे

आसाममध्ये एका विहिरीतून वैज्ञानिकांनी डोळे नसलेला, कवटीचा वरचा भाग नसलेला आणि अत्यंत लहान आकाराचा गोड्या पाण्यातील एक दुर्मीळ मासा शोधून काढला आहे. या नव्या प्रजातीला ‘गिटचक नकाना’ (Githchak Nakana) असे नाव देण्यात आले असून, ती स्वतंत्र वंश (Genus) आणि स्वतंत्र प्रजाती (Species) म्हणून घोषित करण्यात आली आहे. ईशान्य भारतात भूजलस्तरातील (Aquifer) पाण्यात राहणारा आढळलेला हा पहिलाच मासा आहे. (New Fish Genus and Species)

नेचर सायंटिफिक रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

गारो भाषेतील नाव

या माशाचे नाव गारो भाषेतील ‘नाटोक’ (मासा) आणि ‘काना’ (आंधळा) या शब्दांवरून ठेवण्यात आले आहे. त्याच्या डोळ्यांच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे हे नाव देण्यात आले आहे. (New Fish Genus and Species)

भारतात यापूर्वी अशा प्रकारचे भूमिगत मासे केरळ आणि मेघालयमध्ये आढळले होते. मात्र आसाममधील हा शोध ईशान्य भारतातील पहिली भूजल-निवासी (Phreatobiotic) माशाची नोंद ठरली आहे.

एका विहिरीतच सापडली प्रजाती

संशोधकांनी आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील उघड्या विहिरीतून तीन वेगवेगळ्या वेळा एकूण १३ नमुने गोळा केले. (New Fish Genus and Species)

विशेष म्हणजे, आसपासच्या अनेक विहिरींची तपासणी करूनही ही प्रजाती इतरत्र आढळली नाही. त्यामुळे या माशाचे अधिवास अत्यंत मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंधारातील जीवनासाठीची रचना

या माशामध्ये भूमिगत अंधाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले आहेत.

कमाल लांबी केवळ २०.८ मिलीमीटर

शरीरावर रंगद्रव्य जवळजवळ नाही

पारदर्शक शरीरामुळे रक्ताचा लालसर रंग दिसून येतो

बाहेरून कोणतेही डोळे दिसत नाहीत

डोक्यावर डोळ्यांच्या जागी फक्त काळा ठिपका

कवटीचा वरचा हाडांचा भाग पूर्णपणे अनुपस्थित

कवटी नसणे अत्यंत दुर्मीळ

अस्थीयुक्त (बोनी) माशांमध्ये मेंदूचे संरक्षण करणारी कवटी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तिचा वरचा भाग नसणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

अशी रचना यापूर्वी अत्यंत लहान आकाराच्या काही माशांमध्येच आढळली होती. संशोधकांच्या मते, या माशामध्ये लार्वा अवस्थेतील काही वैशिष्ट्ये कायम राहूनही तो पूर्ण वाढ झालेला आणि प्रजननक्षम बनला असावा.

कोट्यवधी वर्षांपूर्वी वेगळा झालेला वंश (New Fish Genus and Species)

डीएनएच्या आण्विक विश्लेषणातून असे आढळले की ‘गिटचक’ हा अत्यंत प्राचीन वंश असून, तो आपल्या सर्वात जवळच्या नातेवाईकांपासून सुमारे २.१४ कोटी ते ४.५५ कोटी वर्षांपूर्वी वेगळा झाला.

मात्र हा मासा ज्या गाळयुक्त भूजलस्तरात सापडला, त्याचे वय दहा लाख वर्षांपेक्षाही कमी असल्याचा अंदाज आहे. (New Fish Genus and Species)

या प्रदेशात अशा प्रकारचे भूजल अधिवास यापूर्वीही अस्तित्वात असावेत, किंवा या माशाचे पूर्वज पूर्वी जमिनीवरील किंवा पृष्ठभागावरील जलस्रोतांमध्ये राहत होते आणि नंतर भूजलातील अधिवासात स्थलांतरित झाले असावेत, असे संशोधकांचे मत आहे.

अपघाताने लागलेला शोध

भूमिगत भूजलात राहणाऱ्या माशांच्या प्रजाती जगभरात अत्यंत दुर्मीळ आहेत. आतापर्यंत ज्ञात असलेल्या २७२ भूमिगत माशांच्या प्रजातींपैकी केवळ सुमारे २३ प्रजाती अशा जलभृतांमध्ये (Aquifers) राहतात.

बहुतेक वेळा अशा माशांचा शोध विहिरीतून पाणी उपसताना किंवा पंपाद्वारे पाणी काढताना योगायोगाने लागतो.

जैवविविधतेसाठी महत्त्वाची नोंद

वैज्ञानिकांच्या मते, हा शोध ईशान्य भारतातील भूमिगत जैवविविधतेबद्दल नवी माहिती देणारा असून, अशा अद्याप अज्ञात राहिलेल्या अनेक जीवसृष्टींच्या शोधाला नवी दिशा मिळू शकते. तसेच भूजल परिसंस्थांचे संरक्षण करण्याची गरजही या संशोधनामुळे अधिक अधोरेखित झाली आहे.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) डाऊन टू अर्थच्या सौजन्याने)

Related posts

राजस्थानात उंटपालन करणारा रबारी समाज अडचणीत

पन्नाशीपूर्वीच शरीर म्हातारे, कर्करोगाचा धोका वाढला?

भ्रष्टाचार कनेक्ट, सुरक्षितता मिसिंग आणि महाराष्ट्र खड्ड्यात