नदीच्या मृत्यूसोबत एक भाषाही मरणपंथाला

पश्चिम बंगालमधील लुप्त होत चाललेली एक नदी तिच्यासोबत एक वैशिष्ट्यपूर्ण नदीकाठची शब्दसंपदा, शतकानुशतकांचे पर्यावरणविषयक ज्ञान आणि प्रादेशिक ओळखही घेऊन जात आहे. तरुण पिढीकडे हा वारसा आता हस्तांतरित होत नसल्याचे दिसून येत आहे. (Death of river with a dialect)

  • मधुरिमा पट्टनायक

पश्चिम मेदिनीपूरमधील ३८ वर्षीय मृण्मय मंडल यांना तारुण्यात पदार्पण करताना आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही परिचित गोष्टी हळूहळू निसटून जात असल्याचे जाणवू लागले. हाला म्हणजे छोटी होडी, मोंग म्हणजे होडीचा पुढचा भाग, चुआ म्हणजे छोटे तळे, हादा म्हणजे जलकुंभ, चागदी म्हणजे जलकुंभाने व्यापलेला एखादा पट्टा, बासा म्हणजे मासे खेळत असलेले ठिकाण आणि जात म्हणजे गावातील जत्रा—असे अनेक शब्द आता हळूहळू अनोळखी होत चालले आहेत.

हेही वाचाः नदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकर

मंडल हे पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा जन्म आणि बालपण केलेघाई नदीच्या काठावर गेले. हे हरवत चाललेले शब्द त्यांच्या प्रादेशिक उपबोलीचा भाग आहेत. ही उपबोली बंगाली भाषेतील राढी बोलीची एक शाखा आहे. मंडल यांच्या पिढीने हे शब्द दैनंदिन वापरात ऐकत-वापरत बालपण घालवले. मात्र आता ते मुख्यतः मागील पिढीतील वृद्धांच्या बोलण्यातच ऐकू येतात. नव्या पिढीच्या स्मृतीत हे शब्द रुजलेच नाहीत आणि त्यामुळे ते त्यांच्यासाठी परके झाले आहेत.

नदीचे अस्तित्व लोप पावत गेल्याने केवळ भाषा आणि संस्कृतीचाच –हास झाला नाही, तर स्थानिक समाजाचे जीवन आणि उपजीविका एकमेकांशी जोडून ठेवणारे जाळेही तुटले. त्यातून या समाजाची ओळख, जीवनविषयक दृष्टी आणि आध्यात्मिक जाणिवाही आकार घेत होत्या. (Death of river with a dialect)

तंत्रज्ञानाचाही प्रभाव

मादागाडी आणि चौदा यांसारखे शब्दही आता हरवत चालले आहेत. मादागाडी म्हणजे नदीचे पाणी साठवण्यासाठी हाताने खोदलेली छोटी चरासारखी जागा. त्यातून नंतर हातातील धातूच्या भांड्याच्या साहाय्याने शेतीला पाणी दिले जात असे. पुढे तंत्रज्ञानाने हे कष्टाचे काम बदलून टाकले आणि मादागाडीची गरज उरली नाही. मंडल यांच्या पूर्वजांची उपजीविका प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून होती. स्थानिक मासेमारीच्या पद्धतीत चौदा नावाचे बांबूच्या बारीक काठ्यांपासून तयार केलेले हाताळण्याजोगे पारंपरिक मासेमारीचे साधन वापरले जात असे. मात्र मंडल यांच्या मते, या शब्दांच्या वापरातून बाहेर पडण्यामागे केवळ नदीचा हळूहळू आक्रसत जाणारा प्रवाह कारणीभूत नाही; या साधनांची जागा तंत्रज्ञानाने घेतल्यानेही ते शब्द अप्रचलित झाले.

बंगालच्या इतर भागांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे शब्द आता या स्थानिक शब्दांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, हादा हा शब्द मागे पडला आणि जलकुंभासाठी वापरला जाणारा अधिक प्रचलित बंगाली शब्द कोचुरिपाना त्याची जागा घेऊ लागला. होडीच्या वेगवेगळ्या भागांसाठी वापरले जाणारे हाला यांसारखे शब्दही दुर्मीळ झाले आहेत.

हेही वाचाः बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

“केलेघाईने केवळ आमच्या स्थानिक उपजीविकेला आणि वाहतूक व्यवस्थेला आकार दिला नाही, तर एक जिवंत प्रादेशिक संस्कृतीही निर्माण केली. नदी ही आमची जीवनपद्धती आहे,” असे मंडल सांगतात. (Death of river with a dialect)

नदीशी स्थानिक लोकांचे भावनिक नाते किती खोलवर रुजले आहे, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. नदी मृतप्राय होत असतानाही मंडल यांना तिचा अभिमान वाटतो.

केलेघाई नदीचा उगम झारग्रामजवळ होतो. ती पश्चिम मेदिनीपूरमधून वाहत जाऊन पूर्व मेदिनीपूरमध्ये हल्दी नदीला मिळते.

राढी बोलीचा लोप (Death of river with a dialect)

२०११च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये ७.८६ कोटी लोक बंगाली भाषा बोलतात. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ८६.२२ टक्के इतके हे प्रमाण आहे. मंडल आणि त्यांच्या गावातील लोक राढी ही बंगाली भाषेतील बोली बोलत मोठे झाले. या बोलीचे ते एकमेव भाषक नाहीत; मात्र तिच्या या विशिष्ट उपबोलीचा वापर करणाऱ्या मोजक्या समुदायांपैकी ते एक आहेत.

दिवंगत भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चॅटर्जी यांनी त्यांच्या ‘द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द बंगाली लँग्वेज’ या ग्रंथात बंगाली भाषेच्या बोलींचे चार प्राचीन प्रादेशिक विभागांशी नाते सांगितले आहे—राढ, पुंड्र किंवा वरेंद्र, वंग आणि कामरूप. मेदिनीपूरचे दोन्ही जिल्हे, झारग्राम, मुर्शिदाबाद, बीरभूम, बांकुरा, बर्धमान, हावडा, हुगळी, नदिया आणि कोलकाता हे राढी प्रदेशात येतात. राढी बोलीचेही अनेक उपप्रकार आहेत. दोन्ही मेदिनीपूर आणि झारग्राममध्ये बोलली जाणारी उपबोली इतर भागांतील राढीपेक्षा वेगळी आहे.

हेही वाचाः मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे…

“नदी आता मृतप्राय होत असल्याने तिच्याशी जोडलेला इतिहास, संस्कृती आणि स्मृतीही आपल्या सामूहिक स्मरणातून पुसल्या जात आहेत. नदी जिवंत ठेवली असती तर तिच्याशी जोडलेला इतिहास आणि संस्कृतीही लोकांच्या स्मरणात राहिली असती आणि उलटही तेच घडले असते,” असे मंडल म्हणतात.

झारग्राम राज कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक सुशीलकुमार बर्मन यांच्या एका लेखात नमूद केले आहे की चैतन्यदेव केलेघाईमार्गे ओडिशाकडे प्रवास करत असताना या नदीत टेटुलागड, बत्तीसागड आणि बुराबुरी दहा अशी धोकादायक भोवरे होती. कालांतराने केलेघाईची खोली कमी झाली आणि रुंदीही आक्रसली. त्यासोबत नदीतील प्रवाह आणि त्या प्रवाहांना दिलेली नावेही सामूहिक स्मृतीतून नाहीशी झाली.

ऱ्हासाच्या वाटेवरची नदी

केलेघाई ही पावसावर अवलंबून असलेली नदी आहे. पावसाचे वाढते अनियमित स्वरूप तिच्या प्रवाहावर परिणाम करत आहे. आता मान्सून अनेकदा उशिरा येतो, तर पावसाळ्यातही कोरडे दिवस वाढले आहेत. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वेगाने होते आणि नदीपात्राचे काही भाग कोरडे पडून त्यात भेगा पडतात. जिथे पाणी टिकून आहे, तिथे जलकुंभी आणि शेवाळाचे दाट थर पसरले आहेत. त्यातच बेकायदा अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह आणखी अरुंद झाला आहे.

काझी नजरूल विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुजय बंदोपाध्याय यांच्या मते, मान्सून वगळता इतर ऋतूंमध्ये भूजल नदीच्या प्रवाहाला आधार देते. मात्र शेती, सिंचन आणि घरगुती वापरासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने भूजलपातळी घटली आहे. केलेघाईसारख्या छोट्या नद्यांसाठी बेकायदा अतिक्रमण हेही मोठे संकट आहे.

मंडल सांगतात की मेदिनीपूरच्या या भागात नदीच्या शेजारी असलेल्या आणि पूर्वी नदीला पाणी पुरवणाऱ्या पाणथळ जागांपासून केलेघाईचा संपर्क तुटल्यानंतर नदी आटू लागली. या पाणथळ जागांचे नंतर व्यावसायिक मत्स्यपालनासाठीच्या तलावांमध्ये रूपांतर झाले. स्थानिक पातळीवर त्यांना ‘भेरी’ म्हटले जाते.

मात्र गेल्या शतकभरात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या हवामानातील बदलांची शक्यताही नाकारता येत नाही, असे बंदोपाध्याय म्हणतात.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या २०२०च्या ‘ऑब्झर्व्ह्ड रेनफॉल व्हेरिएबिलिटी अँड चेंजेस ओव्हर वेस्ट बंगाल स्टेट्स’ या अहवालानुसार, दोन्ही मेदिनीपूरमध्ये कोरडे दिवस वाढले आहेत. त्याच वेळी अतिवृष्टीचे दिवस ऐतिहासिक नोंदींपेक्षा अधिक झाले आहेत. एकूण पावसात मोठी घट झालेली नसली तरी तो कमी कालावधीत मुसळधार स्वरूपात पडत असून त्यानंतर दीर्घकाळ कोरडे वातावरण राहते.

भूजलपातळीतही घट

स्विचऑन फाउंडेशनच्या मार्च २०२१च्या अहवालानुसार, २०१३नंतर पश्चिम बंगालमध्ये मान्सूननंतरच्या भूजलपातळीत सर्वाधिक घट झाली. शेजारच्या बांकुरामध्ये ही घट ११ मीटरपर्यंत होती. २०१३ ते २०१९ या काळात पश्चिम मेदिनीपूर आणि झारग्राममध्ये भूजलपातळी ४.६९ मीटरने, तर पूर्व मेदिनीपूरमध्ये १.७२ मीटरने खाली गेली. २०१९पर्यंत काही भागांत भूजलपातळी जमिनीखाली १५ ते २१ मीटरपर्यंत गेली होती.

आयआयटी गांधीनगरचे जलतज्ज्ञ आणि प्राध्यापक विमल मिश्रा यांच्या मते, दीर्घकाळ कोरडे दिवस आणि त्यानंतर होणारा अल्पकाळातील मुसळधार पाऊस यामुळे भूजलाचा नैसर्गिक पुनर्भरण कमी होतो. त्याच वेळी भूजलाचा उपसा सुरूच राहतो. या दुहेरी आघातामुळे केलेघाईसारख्या नद्या आटण्याची शक्यता वाढते.

‘नदी वाचवा आंदोलना’शी संबंधित कार्यकर्ते तापस दास यांच्या मते, अनियमित पाऊस, प्रदूषण आणि बेकायदा अतिक्रमण या तिन्ही कारणांमुळे बंगालमधील नद्या, ओढे आणि जुन्या नदीप्रवाहांचे आरोग्य बिघडत आहे. (Death of river with a dialect)

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘असेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर द इंडियन रिजन’ या अहवालात १९८९ ते २०१८ या काळात नैऋत्य मान्सूनच्या पावसात लक्षणीय घट झालेल्या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगालचा समावेश आहे. जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडे दिवस वाढले असून जूनमधील पावसात लक्षणीय घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीतही झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूरमधील वार्षिक पावसात अशीच घट दिसते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या २०२४च्या वार्षिक हवामान अहवालानुसार, २०२३मध्ये पूर्व भारतातील तापमान १९९१-२०२०च्या सरासरीपेक्षा ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक होते; बंगालमध्ये ही वाढ विशेषत्वाने जाणवली.

नदीसोबत लोप पावणारी परिसंस्था

जैवविविधता आणि भाषिक विविधता यांचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ दीर्घकाळापासून मान्य करत आले आहेत. नद्या, हिमनद्या किंवा एखाद्या प्रजातीचे अस्तित्व संपत गेले की त्यांच्याशी जोडलेली भाषा आणि शब्दसंपदाही हळूहळू लोप पावते.

पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि एमेरिटस प्राध्यापक जॉन लिप्स्की यांच्या मते, बोली आणि भाषा झिजल्या की संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू गमावला जातो.

उपबोली लोप पावत गेल्या की पारंपरिक मासेमारी, माशांच्या प्रजननाची चक्रे, पुरांचे स्वरूप, होडी बांधणी आणि ऋतूंचे चक्र याबाबतचे पारंपरिक ज्ञानही नाहीसे होते. त्यामुळे सांस्कृतिक ओळख कमकुवत होते आणि पिढ्यांमधील संबंधही सैल होतात. (Death of river with a dialect)

लिप्स्की यांच्या मते, मानवाने हजारो वर्षे निसर्गासोबत उत्क्रांत होत असताना हजारो भाषा, बोली आणि उपबोली विकसित केल्या. त्या प्रत्येकातून पर्यावरणाकडे पाहण्याच्या आणि त्याच्याशी नाते जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रतिबिंबित होतात.

या शतकाच्या अखेरीस अंदाजे २,४०० ते ३,००० भाषा नामशेष होऊ शकतात. भारताने गेल्या ५० वर्षांतच २२०हून अधिक भाषा गमावल्या आहेत आणि जगभरात गेल्या शतकात जवळपास ४०० भाषा लोप पावल्या आहेत.

बर्फासाठी तीनशे शब्द

आर्क्टिक प्रदेश आणि स्वीडनमध्ये अजूनही वापरात असलेल्या नऊ सामी भाषांमध्ये बर्फासाठी ३००हून अधिक शब्द आहेत आणि आठ वेगवेगळे ऋतू ओळखले जातात. हिमनद्या वितळत असताना आणि बर्फावर अवलंबून असलेली जैवविविधता घटत असताना यापैकी अनेक शब्दही हळूहळू नाहीसे होत आहेत.

केलेघाईच्या बाबतीत संपूर्ण भाषा नाही, तर एका मोठ्या नदीसारख्या भाषेची एक उपबोली लोप पावत आहे—जणू एखादी उपनदीच आटून गेली आहे. तरीही या नुकसानीमुळे भाषिक विविधतेला धक्का बसतो आणि मानवी संस्कृतीची समृद्धी धोक्यात येते.

लिप्स्की म्हणतात, “लोक प्रादेशिक, सामाजिक आणि वांशिक बोलींकडे ओळखीचे प्रतीक म्हणून पाहतात. भाषा ही मानवी ओळख आणि संस्कृतीपासून वेगळी करता येत नाही.”

नदी आणि भाषा दोन्ही वाचवण्याचा प्रयत्न

मंडल यांचा विश्वास आहे की नदी आजही जिवंत असती, तर लोकांनी तिच्याशी जोडलेली नदीकाठची संस्कृती, भाषा आणि इतिहास जपण्यासाठी अधिक प्रयत्न केले असते. ते लेख, नियतकालिके आणि व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून केलेघाईच्या पुनरुज्जीवनासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लुप्त होत चाललेले शब्द तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते वर्गखोल्यांमध्ये आणि दैनंदिन वापरात हे शब्द पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

हवामानबदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हेच या भाषिक नुकसानीमागचे एकमेव कारण नाही. लिप्स्की यांच्यासह भाषाशास्त्रज्ञांच्या मते जागतिकीकरण आणि शहरीकरणामुळेही लहान बोली आणि उपबोलींचा ऱ्हास अधिक वेगाने झाला आहे, विशेषतः लहान समुदायांमध्ये. (Death of river with a dialect)

तापस दास आणि ‘नदी वाचवा आंदोलना’तील इतर कार्यकर्ते बंगालमधील नद्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या संस्कृतींच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रशासकीय अडथळे आणि सामाजिक विरोध असूनही केलेघाईसारखेच भवितव्य समोर असलेल्या नद्यांविषयी जनजागृती करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

(मधुरिमा पट्टनायक या मुक्त पत्रकार असून १०१ रिपोर्टर्स या राष्ट्रीय न्यूज नेटवर्कच्या सदस्य आहेत.)

Related posts

रांचीतील विद्यार्थी आंदोलनाची ढाल करण्याचा भाजपचा डाव

भविष्याची सुरुवात संसदेत होत नाही…

काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर कोण आहे?