Thackeray’s criticism of the CM : मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे : उद्धव ठाकरे

Thackeray's criticism of the CM

मुंबई :  प्रतिनिधी :  “आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण, कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे. हिंदी भाषेबाबत माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात  आला नव्हता तर  सादर करण्यात आला होता. सादर करणे आणि स्वीकारणे यात फरक आहे. हे चांगल्या शिक्षकाकडून मुख्यमंत्र्यांनी मराठीत समजून घ्यावे, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

माशेलकर समिती अहवाल सादर करण्यात आल्यावर कार्यगट स्थापन करण्यात आला.  कार्यगटाची एकही बैठक झाली नाही. नंतर माझे सरकार गद्दारी करून पाडलं. त्यानंतर आलेल्या सरकार तीन वर्षे काय झोपा काढत बसले होते काय? असा सवाल त्यांनी केला.  मी हिंदी सक्तीवर सही केली, असे मुख्यमंत्र्यांचं मत असेल तर मराठी रंगभूमीचे दालन पाडण्यासाठी तुम्ही का सही केली?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी फडणविसांना विचारला. विधासभेच्या आवारात पत्रकारांशी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात गुन्हेगारी, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. विधानभवनाच्या परिसरातच मारामारी झाली आहे. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती बसवली आहे. पण, गुन्हेगारी फोफावली कशी? गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करण्याएवढी हिंमत कशी झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत सत्तेच्या हव्यासापोटी लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.  प्रवेशापूर्वी ते अन्य पक्षात असताना भाजपने त्यांच्यावर मकोका, गुंड प्रवृत्तीचे, दाऊदचे साथीदार, इक्बाल मिर्चीसोबत संबंध असल्याचे आरोप केले होते. आमच्यातील काही माणसांचा सलीम कुत्तासोबत असल्याचा आरोप केला. एकतर भाजपत ये किंवा तुरूंगात जा, अशी यंत्रणा राबवण्यात येत आहे. साहजिक आहे लोक भाजपात जातात. भाजपत गेल्यावर वॉशिंग पावडर लावून धुतले जाते. त्यांना राजश्रय दिला जातो. त्याचा हा दुष्परिणाम आहे.

“विधिमंडळ परिसरात गुंडगिरी होत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतेही उत्तर फडणवीस यांच्या भाषणातून मिळालं नाही. त्यामुळे त्याचे वर्णन ‘स्वप्नरंजन बुटिका’ म्हणून करत आहे. बहुमत असताना तुम्ही विरोधी पक्षनेत्याला कशासाठी घाबरता? अजून विरोधी पक्षनेते जाहीर केला जात नाही,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

“शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली नाही. शेतकरी एवढ्या कर्जात बुडला आहे की शेतकऱ्याला नांगरण्यासाठी बैल नाही. नांगर खांद्यावर घेऊन स्वत: नांगरावे लागत आहे. त्याने पिकवलेले धान्य आपण बेशरमपणे खातोय, हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे,” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर