जमीर काझी : मुंबई : निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभार आणि बोगस मतदाराबाबत आम्ही आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयोगाच्या बाजूने आमचा दावा खोडून काढीत होते. मात्र त्यांच्याच एका मंत्र्यांने दुबार मतदाराची आकडेवारी जाहीर करून ते पप्पू असल्याचे दाखवून दिले, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला. (Thackeray’s attack on Shelar)
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज ‘ मविआ ‘व मनसेच्या वतीने काढल्यात आलेल्या मोर्च्याच्या विरोधात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन विविध मतदार यादीतील मतदार यादीतील दुबार मुस्लिम नावांची आकडेवारी सांगत ‘वोट जिहाद’ सुरु असल्याचा आरोप केला. त्याबाबत उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत विचारणा केली असता ते म्हणाले, “मी शेलार यांच्यावर काही बोलत नाही. पण त्यांचे खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की, त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत बोगस मतदान झाले नाही, असं म्हणत आहेत त्यातील हवा गेली. एकप्रकारे शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवले आहे,” (Thackeray’s attack on Shelar)
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदा सर्व राजकीय पक्ष एकवटले आणि त्यानी विरोट मोर्चाद्वारे सरकार आणि निवडणूक आयोगाला जाब विचारला. मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की, मतदार यादीतील घोळ सुधारला पाहिजे. यासाठी आता आम्ही शाखा शाखांमध्ये मतदार ओळख केंद्र सुरू करत आहोत. याची यादी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याच्यावर हरकती आणि आक्षेप नोंदवले जातील. आवाज उठवण्याची आताच वेळ आहे. आता जो झोपला तो संपला,” असेही ठाकरे म्हणाले. (Thackeray’s attack on Shelar)
सरकार शेतकरी कर्जमाफी का करत नाही? पिक विम्यातून शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देऊ असं म्हटलं होते. पण ती मदत किती दिली आहे? याची आम्ही चौकशी करणार आहोत. आता खरिपाचा हंगाम तरी गेला आहे. मात्र, रब्बी हंगामासाठी जर जमीनच वाहून गेली आहे तर शेतकऱ्याला कर्ज कुठून मिळणार? तसंच नुकसानीचा राज्याकडून केंद्राला कोणताही प्रस्ताव गेला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. (Thackeray’s attack on Shelar)
केंद्रीय पथक पाहणीसाठी राज्यात येणार आहे. हे पथक दोन ते तीन दिवस पाहणी करणार आहे. संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. दोन-तीन दिवसात केंद्रीय पथक कसे काय पाहणी करणार? कोणती पाहणी करणार आहे?” असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले,’ “सरकार म्हणते की, ३० जून २०२६ मध्ये कर्जमाफी होणार, मग शेतकरी वर्गानं आता कर्जाचे हफ्ते भरायचे की नाही? तसेच आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल, हे गणित त्यांनी कसं काय लावलं? याचा त्यांनी खुलासा करावा. शेतकऱ्यांना मदतीचे जे पॅकेज जाहीर केलं होतं, ते शेतकऱ्यांना किती मिळालं? त्यांच्या खात्यात किती पैसे आलेत? हे विचारण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे. तिथे संवाद यात्रा करणार आहे. पण मी कोणतीही सभा घेणार नाही. तिथे जाऊन आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
सरकार तरुणांना घाबरते
“एक जुलैनंतर ज्या मुला-मुलींचे वय वर्ष १८ पेक्षा अधिक झाले आहे अशाना मतदान करता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मी म्हणतो आपण जगभर बघतोय की, अठरा वर्षानंतरचे तरुणच क्रांती करतात. मग त्या ‘जेन झी’ला निवडणूक आयोग मतदान का करू देत नाही?” सरकार या तरुणांना का घाबरत आहे हे पण कळले पाहिजे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील जोपर्यंत घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवणार आहे,” असेही ठाकरे यांनी सांगितले.