Tejpratap: लालूपुत्राचे प्रताप ‘आरजेडी’च्या मुळावर

Tejpratap

तेजप्रताप यादव यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादाने लालू कुटुंब आणि RJD पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेजप्रताप यादव हा सुरुवातीपासूनच आरजेडी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी उपद्रव होता. (Tejpratap)

-विजय चोरमारे

तेजप्रताप यादव यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात आणि राष्ट्रीय जनता दलात मोठे वादंग उठले आहे. या वादामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. हा वाद तेजप्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि त्यांच्या राजकीय वर्तनाशी संबंधित आहे, ज्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी त्यांना पक्ष आणि कुटुंबातून सहा वर्षांसाठी काढून टाकले आहे. पत्नी निघून गेल्यानंतर दुसऱ्या महिलेसंदर्भातील पोस्ट केल्यामुळे चर्चा सुरू असताना आणखी एक तिसरी महिला चर्चेत आल्यामुळे या प्रकरणाने बिहारचे राजकारणात तापले आहे.

२४ मे २०२५ रोजी तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली. त्यात त्यांनी म्हटले होते की, अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबत गेल्या बारा वर्षांपासून माझे प्रेमसंबंध आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित तरुणीसोबतचा फोटोही दिला होता. (Tejpratap)

या पोस्टमुळे मोठा गदारोळ उठला.

तेजप्रताप यांनी नंतर खुलासा केला की, त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. आणि ही पोस्ट त्यांनी केली नव्हती. त्यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केली आणि ‘एक्स’वर याबाबत स्पष्टीकरण दिले की, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे.

मात्र, या स्पष्टीकरणाने वाद शमला नाही, कारण यापूर्वीही तेजप्रताप यांच्या अशा वर्तनामुळे पक्ष आणि कुटुंबाची प्रतिमा मलिन झाली होती. (Tejpratap)

२५ मे २०२५ रोजी लालूप्रसाद यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक निवेदन जारी केले. तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून सहा वर्षांसाठी काढून टाकल्याची घोषणा त्यांनी केली. तेजप्रताप यांचे बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्यांशी विसंगत असलेल्या कृतीमुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले.

लालूप्रसाद यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, “वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. माझ्या मोठ्या मुलाचे सार्वजनिक वर्तन आणि कार्यपद्धती आमच्या कौटुंबिक मूल्यांशी जुळत नाही. त्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” (Tejpratap)

यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की तेजप्रताप यांची पक्षात आणि कुटुंबात आता कोणतीही भूमिका राहणार नाही आणि त्यांच्याशी संबंध ठेवण्याचा निर्णय इतरांनी स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार घ्यावा.

तेजप्रताप यांचे २०१८ मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आणि चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच त्यांचे नाते बिघडले. ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आणि त्या माहेरी निघून गेल्या. सध्या त्यांचा घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर अनुष्का यादव यांच्यासोबतच्या कथित संबंधांमुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाची आणि पक्षाची प्रतिमा आणखी खराब झाली. यामुळे लालूप्रसाद यादव यांनी कठोर पाऊल उचलले. (Tejpratap)

लालूप्रसाद यांचे छोटे पुत्र तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे RJD चे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. २०१५ पासून तेजस्वी यांनी पक्षात आपले स्थान मजबूत केले आहे. तेजप्रताप यांच्या छपरी स्वभावामुळे पक्षात आणि राजकारणात तितकी महत्त्वाची भूमिका मिळाली नाही. यामुळे तेजप्रताप यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजप्रताप यांनी ‘लालू-राबडी मोर्चा’ स्थापन करून RJD पासून वेगळे उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे पक्षात अंतर्गत तणाव वाढला होता.

तेजप्रताप यांच्या ताज्या वादामुळे पक्षाच्या निवडणूक तयारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लालूप्रसाद यांनी कठोर कारवाई केल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तेजस्वी यांनी आग्रह धरल्याचीही चर्चा आहे.

तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया देताना म्हटले की, तेजप्रताप हे प्रौढ असून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या अशा कृतींना पक्ष आणि कुटुंबात सहन केले जाणार नाही.

तेजप्रताप यांची बहीण रोहिणी यादव यांनीही त्यांच्यावर टीका केली आणि लालूप्रसाद यांच्या कारवाईचे समर्थन केले.

लालूप्रसाद यांच्या कन्या मीसा भारती यांनी या प्रकरणावर थेट भाष्य टाळले. (Tejpratap)

तसे हे व्यक्तिगत प्रकरण गंभीर का बनले आहे, तर याच वर्षात बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी RJD सध्या तयारी करत आहे. तेजस्वी यादव यांना पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे आणले जात आहे. अशा वेळी तेजप्रताप यांच्या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे लालूप्रसाद यांनी तेजप्रताप यांना निलंबित करून पक्षाची आणि कुटुंबाची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष (BJP) आणि जनता दल युनायटेड (JDU), या प्रकरणाचा फायदा घेण्याची शक्यता होती. आणि दोन्ही पक्षांचे नेते यासंदर्भात टीका करताना दिसत आहेत. JDU प्रवक्ता नीरज कुमार यांनी याला “चूहा-बिल्ली का खेल” असे संबोधून लालू यांच्या कारवाईला दिखावा ठरवले. तर माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनीही लालूप्रसाद यांच्या “संस्कार” संबंधी विधानावर टीका केली.

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी तेजप्रताप यांच्या समर्थनार्थ विधान केले आहे. त्यांनी म्हटले की तेजप्रताप यांनी आपल्या प्रेमसंबंधांचा खुलासा करून प्रामाणिकपणा दाखवला आणि लालूप्रसाद यांच्या कुटुंबाने हे “सत्य” स्वीकारले पाहिजे.

पप्पू यादव हे बिहारच्या राजकारणातील एक प्रभावशाली नेते आहेत आणि त्यांचा तेजप्रताप यांना पाठिंबा RJD च्या अंतर्गत गटबाजीला चालना देऊ शकतो.

काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार तेजप्रताप यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे RJD च्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम पक्षाच्या निवडणूक यशावर होऊ शकतो.

बिहारच्या राजकारणात घराणेशाही हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तेजप्रताप यांचे प्रकरण विरोधकांना लालूप्रसाद यांच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे आरोप करण्याची संधी देऊ शकते. तेजप्रताप नवीन पक्ष स्थापन करू शकतात त्याचा थेट फटका RJD ला बसू शकतो.

दरम्यान तेजप्रताप यादव मालदीवला गेले होते. तिथे त्यांच्यासोबत अनुष्का यादव नव्हे, तर निशू शर्मा नावाची तिसरीच युवती होती. त्यावरूनही चर्चांना उधाण आले आहे. (Tejpratap) एकूणच तेजप्रताप यादव यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादाने लालू कुटुंब आणि RJD पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेजप्रताप यादव हा सुरुवातीपासूनच आरजेडी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी उपद्रव होता. त्याच्या नव्या उपद्व्यापांमुळे कुटुंबातील अंतर्गत तणाव आणि राजकीय गटबाजी उघड झाली आहे. नजिकच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलासाठी ही नवी डोकेदुखी ठरली आहे.

हेही वाचा :
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर
मंत्र्यांच्या मुलांकडून ६४ कोटीचे हॉटेल खरेदी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर