माझे ज्ञान-दर्शक

माझी मैत्रीण डॉ. हेमा दांडेकर हिच्या आमंत्रणावरून १९९२ साली ‘स्त्रिया, घरे आणि विकास’ आणि नंतर १९९८ साली ‘जागतिकीककरण आणि नगरविकास’ अशा दोन कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध वाचले होते. मिशिगन विद्यापीठाचा सुंदर, हरित परिसर बघून तेथे राहून शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या वर्षाची तिसरी टर्म सुरू झाली. पाठोपाठ दहशतवाद्यांनी ९/११च्या न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या इमारती पाडल्या आणि अमेरिकेतील उदार वातावरण बदलून गेले. राष्ट्राध्यक्ष बुश ह्यांची युद्धखोरीची भाषा सुरू झाली. अभ्यासावरून माझे मन उडाले आणि मी भारतामध्ये परत आले. मात्र तेथील वास्तव्यात तिथली शिक्षणाची मोकळीढाकळी पद्धत मला फारच भावली. ज्ञानवंत मार्गदर्शकांकडून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

  • सुलक्षणा महाजन

सन २००० मध्ये अॅन आर्बर ह्या शहरातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’ येथे अर्बन प्लानिंग विषयात डॉक्टरेट करण्यासाठी मी प्रवेश घेतला. त्याआधी तेथे प्रोफेसर असलेली माझी मैत्रीण डॉ. हेमा दांडेकर हिच्या आमंत्रणावरून १९९२ साली ‘स्त्रिया, घरे आणि विकास’ आणि नंतर १९९८ साली ‘जागतिकीककरण आणि नगरविकास’ अशा दोन कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध वाचले होते. विद्यापीठाचा सुंदर, हरित परिसर बघून तेथे राहून शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या वर्षाची तिसरी टर्म सुरू झाली.

पाठोपाठ दहशतवाद्यांनी ९/११च्या न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या इमारती पाडल्या आणि अमेरिकेतील उदार वातावरण बदलून गेले. राष्ट्राध्यक्ष बुश ह्यांची युद्धखोरीची भाषा सुरू झाली. अभ्यासावरून माझे मन उडाले आणि मी भारतामध्ये परत आले. तेथील वास्तव्यात तिथली शिक्षणाची मोकळीढाकळी पद्धत मला फारच भावली. ज्ञानवंत मार्गदर्शकांकडून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. नवीन दृष्टी मिळाली. मनसोक्त वाचन केले. पन्नासाव्या वर्षी तरुण मुलामुलींच्या बरोबरीने अभ्यास करता आला.

पंचवीस वर्षांचा मागोवा

ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणी जागवत मी पंचवीस वर्षे मागे गेले. गेल्या पंचवीस वर्षांतील माझ्या आवडत्या शिक्षकांच्या ज्ञानसाधनेचा शोध घेतला. त्यांनी लिहिलेली पुस्तके, शोधनिबंध आणि त्यांच्या सुरू असलेल्या अध्यापनाच्या, संशोधनाच्या कामाचा धांडोळा घेतला तेव्हा ज्ञानयज्ञाचा आवाका बघून थक्क व्हायला झाले. ह्या लेखाच्या निमित्ताने त्या प्रत्येकाचे विषय, त्यांची व्यक्तिमत्त्वे आठवली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या ज्ञानाने मला किती समृद्ध केले आहे, हे जाणवले. त्यांनी दिलेल्या दृष्टिकोणाचा लाभ घेत मुंबई आणि महाराष्ट्रातील शहरांचा अभ्यास मला करता आला, ह्याचे समाधान वाटले. त्यांच्यामुळेच अध्यापन, संशोधन, लेखन करायला ऊर्जा मिळाली होती हेदेखील जाणवले. ज्ञानमार्गावरील वाटचाल कष्टाची असते; परीक्षा बघणारी असते; तशीच ती एक आनंदयात्रा असते याची जाणीव झाली. अर्थातच ह्या आनंदयात्रेची सुरुवात डॉ. हेमलता दांडेकरमुळे झाली होती.

डॉ. हेमलता दांडेकर

डॉ. हेमलता दांडेकर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून गोल्ड मेडल घेऊन पदवी घेणारी माझी ज्येष्ठ मैत्रीण आधी नावाने माहीत होती. १९७० च्या दशकात मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यावर ती अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठात डॉक्टरेट करण्यासाठी दाखल झाली होती. त्या वेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात मोठी चळवळ सुरू होती. स्त्रीवादी चळवळीचा मोठा प्रभाव होता. त्या प्रभावाखालीच हेमाने शहरांच्या अभ्यासासाठी समाजशास्त्र हा विषय निवडला. प्रबंधासाठी तिने मुंबईतील सातारा जिल्ह्यातील सुगावमधील गिरणी कामगार कुटुंबांचा तेथे राहून अभ्यास केला. तिच्या संशोधनावर आधारित ‘मेन इन बॉम्बे, वुमन अॅट होम’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.

१९७५ सालच्या जागतिक महिला वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या चळवळीला चालना मिळाली होती. ‘मुलगी झाली हो’ ह्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तिची मुंबईतच गाठ पडली. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये तिच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख मी लिहिला. आमची मैत्री दृढ होत गेली. आर्किटेक्चर, शहरे ह्या बरोबरच स्त्री मुक्तीचा विषय आम्हा दोघींना जवळचा होता. १९९२ साली तिने मला मिशिगन विद्यापीठामध्ये शोधनिबंध वाचण्याचे आमंत्रण दिले होते. तेव्हापासून मलाही संशोधन, लिखाण करण्यातला आनंद समजू लागला. आव्हाने लक्षात आली.

मुंबई-पुणे महामार्ग

विद्यापीठात दाखल झाल्यावर पहिल्या सत्रामध्ये मला डॉ. हेमाच्या मार्गदर्शनाखाली अॅकॅडेमिक पद्धतीने शोधनिबंध लिहिण्याचा मोलाचा अनुभव मिळाला. १९९८ साली पूर्ण झालेला ‘मुंबई-पुणे महामार्ग’ हा आमच्या शोधनिबंधाचा विषय होता. त्यासंबंधीच्या माध्यमातील चर्चा, तांत्रिक माहिती, अडचणी, नावीन्यपूर्ण साहित्य, वित्त व्यवस्था, व्यवस्थापन, नियोजन तसेच त्या विरोधी झालेल्या चळवळी ह्याबद्दल मी माहिती जमा केली.

प्रकल्पात सहभागी असलेल्या इंजिनिअर्सच्या मुलाखती घेतल्या. त्या माहितीचे विश्लेषण कसे करायचे, त्याचबरोबर खाजगीकरण म्हणजे काय, त्याचे विविध आयाम, सिद्धान्त आणि प्रत्यक्ष निबंधाचे लिखाण ह्याबद्दल मार्गदर्शन डॉ. हेमाने केले. दोन सत्रांच्या मधल्या सुट्टीच्या काळात निबंध पूर्ण झाला. २००१ साली ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली’च्या अंकात ‘MSRDC and Mumbai-Pune Expressway: A Sustainable Model for Privatising Construction of Physical Infrastructure’ या शीर्षकासह तो प्रकाशित झाला.

अमेरिकेतील मुक्त शिक्षण पद्धतीची ओळख

गेली तीन दशके डॉ. हेमाने लिहिलेले ‘The Planners Use of Information’ हे पुस्तक अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे अनेक शोधनिबंध विविध ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. तिने ‘Michigan Family Farms and Farm Buildings’ आणि ‘A house with a Garden’ ही पुस्तके लिहिली आहेत.

पहिल्या सत्रामध्ये ती शिकवत असलेला अभ्यासक्रम मी निवडला नव्हता, तरी एक दिवस तिच्या वर्गामध्ये मला भारतामधील स्त्री चळवळीसंबंधात चर्चा करायला बोलावले होते. सुरुवातीला पंधरा मिनिटे मी मुंबईमधील कचरावेचक स्त्रियांबद्दल बोलले आणि नंतर ४५ मिनिटे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, चर्चा केली. त्यातून अमेरिकेतील मुक्त शिक्षण पद्धतीची ओळख झाली.

डॉ. जोनाथन लेव्हिन

डॉक्टरल प्रोग्रॅमचे प्रमुख डॉ. जोनाथन लेव्हिन होते. त्या वर्षी चार जणींनी प्रवेश घेतला होता. दोघी जणी कोरियामधील तर एक अमेरिकेतील होती. तिने अमेरिकेत पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास केला होता आणि तिला प्राचीन शहरांच्या उत्खनात भाग घेण्यासाठी नगररचना विषयाचा अभ्यास करायचा होता. दर आठवड्यात सलग तीन तास नगर नियोजनाच्या सैद्धान्तिक अभ्यासाला दिलेले होते.

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये टाऊन प्लानिंग ह्या विषयाची तोंडओळख मला झालेली होती. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या विषयावर झालेल्या संशोधनामुळे जुने नियोजन सिद्धान्त, उदा. चंडिगढ शहराच्या नियोजनामागील सिद्धान्त पूर्णपणे बाद झाले होते. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. ह्या मूलभूत विषयामध्ये झालेले संशोधन, बदल हे माझ्यासाठी सर्वस्वी नवीन दृष्टी देणारे ठरले. जोनाथन ह्याच्या वर्गात मोकळेपणाने शंका विचारता येत. देशोदेशींच्या शहरांची माहिती, अनुभव वाचायला मिळाले. जगाचे वेगवान नागरीकरण आणि त्यामागील कारणांचा शोध घेता आला.

हसत-खेळत शिक्षण

हे तीन तास म्हणजे हसत-खेळत शिक्षण म्हणजे काय ह्याचा वस्तुपाठ होता. वर्गामध्ये दरवेळी एकीने जेवण तयार करून आणायचे असे. एकदा जोनाथन ह्यानेही घरून आमच्यासाठी जेवण आणले होते. तर एकदा त्याच्या घरी डॉक्टरेटसाठी अभ्यास करणाऱ्या वीस-पंचवीस मुलामुलींना जेवायला आणि गप्पा मारायला बोलावले होते. असे प्रसंग म्हणजे शिक्षक-विद्यार्थी ह्यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न होता. त्यातून अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यांच्या संशोधनाचे विषय समजून घेता आले.

अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी ऐकतात असे चित्र काही विषयांच्या संदर्भात उदाहरणार्थ गणित, सायन्स अशा विषयांच्या संदर्भात दिसते. नगरनियोजन हा विषय मुळातच अनेक ज्ञानशाखांशी निगडित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिवशीच्या विषयासंबंधी चर्चा करण्याची अपेक्षा असते. विषय अगोदरच दिलेला असतो. वाचनासाठी संदर्भ साहित्य, पुस्तकातील एखादे प्रकरण, संशोधन निबंध दिलेले असतात. दररोज किमान ४० ते १०० पानांचे वाचन करणे; त्यातील मुद्दे समजून घेणे; आपल्याला पडलेले प्रश्न विचारणे हे काम विद्यार्थ्यांचे. वर्गातील चर्चेमधील सहभागाला मार्काच्या किंवा ग्रेडच्या दृष्टीने महत्त्व असते.

संशोधन निबंधाची तयारी

वर्गात एका टेबलाच्या भोवती आम्ही चौघी आणि जोनाथन अशी योजना असे. दरवेळी वाचलेल्या साहित्यावर आधारित एकीचे प्रेझेंटेशन असे. नंतर त्यावर टीकाटिप्पणी, आक्षेप आणि जोनाथनचे भाष्य असे. प्रत्येकीने संशोधन निबंध लिहिण्यासाठी तीन प्रश्न तयार करायचे होते. त्यातील एक प्रश्न जोनाथन निवडत असे. आपल्याला पडलेले प्रश्न नेमकेपणाने लिहून विचारता येणे, हे काम किती कठीण असते, याचा तेव्हा अनुभव आला.

वाचनालयातून मागील वर्षात अर्बन प्लानिंगसंबंधित विषयावर प्रकाशित झालेली तीन पुस्तके प्रत्येकीने निवडली होती. त्यातील एका पुस्तकाची निवड Journal of American Planners Association (JAPA) कडून होत असे. पुस्तकाची ७५० आणि ३५० शब्दांमध्ये दोन परीक्षणे लिहिणे ही दुसरी परीक्षा होती. आम्ही लिहिलेली परीक्षणे तपासून जोनाथन मार्गदर्शन करीत असे. दोन्ही परीक्षणे JAPAकडे पाठवली गेली. दोनपैकी एक परीक्षण छापले जाणे म्हणजे परीक्षेत उत्तीर्ण होणे! हा अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला.

वाहतूक नियोजन हा जोनाथन ह्यांचा अध्यापनाचा मुख्य विषय होता. त्यांच्या वर्गामध्ये लेक्चर ऐकायला मी जात असे. त्याची परीक्षा देणार नसले तरी विषयाचे वाचन मी करीत असे. चर्चेमध्ये भाग घेत असे. अमेरिकेत हा विषय खूप महत्त्वाचा होता. त्यासंबंधात शिष्यवृत्त्या आणि नोकऱ्या जास्त संख्येने उपलब्ध असत. जोनाथनच्या हाताखाली अनेक विद्यार्थी सहायक, संशोधक म्हणून काम करीत होते.

जोनाथन यांचे पर्यावरण स्नेही वाहतूक धोरण

अॅन आर्बरच्या वाहतूक नियोजनासाठी जोनाथन महत्त्वाचे धोरणात्मक सल्लागार होते. कालांतराने जोनाथन ह्यांचे पर्यावरण स्नेही वाहतूक धोरण पालिकेने स्वीकारले. विद्यापीठातील आणि शहरातील वाहनतळ कमी करण्यात आले. Ann Arbor Transport Authority (AATA) बससेवा मजबूत करण्यासाठी विद्यापीठाची फी वाढवून ती AATA कंपनीकडे दिली जाऊ लागली. विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षक यांच्यासाठी बस वाहतूक मोफत झाली. शिवाय शहरातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांकडून आगाऊ पैसे घेऊन कर्मचाऱ्यांना मोफत सेवा मिळू लागली. बससेवा कंपनी आणि नागरिकांचा आर्थिक फायदा वाढला.

वाहनतळाच्या जागी वृक्ष लागवड करण्यात येऊन पर्यावरणाला हातभार लागला. जोनाथनचे ‘Zoned Out: Regulation, Markets and Choices in Transfortation and land use planning’ हे पुस्तक गाजले आहे. ‘From Mobility to Accessibility: Transforming Urban Transportation and Land-Use Planning’ हे दुसऱ्या विद्यापीठातील दोन प्राध्यापकांसह लिहिलेले जोनाथन ह्यांचे पुस्तक अलीकडे प्रसिद्ध झाले आहे.


डॉ. स्कॉट कॅम्पबेल

शहरांचा आर्थिक विकास (Economic Development of Cities) हा डॉ. स्कॉट कॅम्पबेल शिकवीत असलेला विषय मी अभ्यासासाठी निवडला होता. काही शहरे काहीकाळ आर्थिक दृष्टीने भरभराटीला का, कशामुळे येतात, नंतर त्यांचा ऱ्हास का होतो, तर काही शहरे मात्र सातत्याने आपल्या अर्थव्यवस्था बदलतात आणि यशस्वी कशा राहतात, हा नियोजनकारांसाठी महत्त्वाचा कूट प्रश्न असतो. विद्यापीठाजवळचे डेट्रॉइट हे शहर एकेकाळी फोर्ड आणि इतर मोटारींच्या कारखानदारीमुळे मोटार सिटी म्हणून भरभराटीला आले होते. पुढे जपानमधील मोटारींच्या स्पर्धेमुळे हे उद्योग आणि त्यातील रोजगार कमी झाले. शहराची अर्थव्यवस्था आणि पाठोपाठ लोकवस्ती आक्रसली.

लहान लहान उद्योग, दुकाने, निवासी विभाग उजाड होत गेले. ह्या वर्गात पंचवीस-तीस विद्यार्थी होते. एकदा एक मुलगी वर्गात उशिरा आली, येताना हातात सॅन्विच, कॉफी घेऊन आली आणि धडपडली. वर्गात कॉफी सांडली. वर्ग काही क्षण स्तब्ध झाला. झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चर्चा सुरळीतपणे सुरू राहिली. डॉ. स्कॉट हसत हसत शांतपणे हे सर्व बघत होते.

एक दिवस डेट्रॉइट शहराची वाताहत बघायला आम्ही सर्व विद्यार्थी गेलो होतो. पुढे महानगराची अर्थव्यवस्था वाचविण्याचे प्रयत्न का फसले, ह्याबदल वाचायला मिळाले. अमेरिकेतील उत्तरेकडील मॅसॅच्युसेट्स, डेट्राइट, ओहायो, न्यूयॉर्क अशा राज्यांमधील शहरे, तेथील उद्योग, रहिवासी मोठ्या संख्येने दक्षिणेकडील कॅलिफोर्निया, अॅरिझोना, फ्लोरिडा राज्यांकडे स्थलांतर करीत होते. त्याची कारणे समजून घेतली.

आपल्या शहरांशी तुलना

आपल्या शहरांशी माझ्या मनात आपोआप तुलना सुरू झाली. इजिप्तमधील मैत्रिणीबरोबर कैरो-मुंबई शहरांचा तुलनात्मक अभ्यास आम्ही वर्गात सादर केला. दोन विद्यार्थ्यांनी डेट्रॉइट आणि क्युबामधील हवाना ह्या दोन शहरांचा तुलनात्मक अभ्यास मांडला. आधुनिक काळातील गेल्या पाचशे वर्षांतील औद्योगिकीकरण, शहरीकरणीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांमुळे उदयाला आलेली सिलिकॉन व्हॅली अशा अनेक विषयांच्या पुस्तकांचे वाचन, चर्चा, सादरीकरण असे भरगच्च ज्ञान असलेले हे सत्र मला खूपच आवडले.

एका उजाड झालेल्या काल्पनिक शहराच्या नगरपालिकेला आर्थिक विकासासाठी काय करता येईल, ह्याबद्दल आम्हाला निबंध लिहायचा होता. त्यासाठी मोठे विद्यापीठ, क्रीडा संकुल आणि स्टेडियम, पर्यटन, पर्यायी कारखाने, इतकेच नाही तर केंद्रशासित तुरुंग असे पर्याय दिले होते. मला तुरुंग ह्या पर्यायाबद्दल आश्चर्य वाटले होते. डॉ. स्कॉट ह्यांच्याशी ऑफिसच्या वेळेत भेट घेतली. केंद्र शासनाचे भरपूर पैसे गुंतवले गेले की तुरुंगाच्या भोवती उभ्या राहणाऱ्या उद्योगांमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम होऊ शकतात, हे समजावून सांगितले. अलीकडेच त्यांनी लिहिलेले काही शोधनिबंध मला वाचायला मिळाले.

डॉ. स्कॉट ह्यांचे ‘The Rise of the Gunbelt: The Military Remapping of Industrial America’ (Oxford University Press) and ‘Readings in Planning Theory’ / ‘Readings in Urban Theory’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या सस्टेनेबल विकासाच्या निबंधाला अमेरिकन प्लानिंग असोसिएशनचे बक्षीस मिळाले आहे.

डॉ. रेमंड डी. यंग

शहरनियोजनाशी संबंधित वरील काही विषयांच्या बरोबरच मी School of Natural Resources and Environment (SNRE) ह्या डिपार्टमेंटचे तीन अभ्यासक्रम निवडले होते. आमची इमारत विद्यापीठाच्या उत्तर संकुलात तर ही इमारत विद्यापीठाच्या मध्य संकुलात होती. जवळच आठ मजली मुख्य वाचनालय होते. त्यांचा ‘पर्यावरण आणि मानवी वर्तुणूक’ हा विषय मला अभिनव आणि नवीन वाटला म्हणून निवडला होता. प्राथमिक आणि प्रगत अशा दोन सत्रांमध्ये ते हा विषय शिकवीत. वर्गात वेगवेगळे विषय शिकणारे पन्नास-साठ पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी असत.

वर्गातील चर्चा सामाईक असली तरी परीक्षेचे पेपर वेगळे असत. डॉ. यंग हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. पुढे त्यांनी मानसशास्त्र विषयात अभ्यास करून डॉक्टरेट मिळविली होती. पहिल्या सत्रामध्ये वेगवेगळ्या पर्यावरणातून मानवजातीच्या झालेल्या प्रवासात कोणते महत्त्वाचे टप्पे होते; त्यात मानवाचे शरीर आणि मेंदू ह्यांचा परस्परपूरक विकास कसा होत गेला, हे शिकायला मिळाले.

आफ्रिकेच्या जंगलातील उंच झाडांवरच वास्तव्याला असणारा माकडसदृश आदिमानव, त्यासाठी विकसित झालेले शरीर, हाताचा अंगठा, दूरवर बघण्यासाठी आवश्यक असलेली त्रिमिती, रंगीत चित्र बघू शकणारे डोळे, स्वरयंत्र कसे विकसित झाले; पुढे जंगले नष्ट झाल्यावर गवताळ प्रदेशात त्याचे झालेले स्थलांतर, त्यानंतर दोन पायांवर उभे राहून धावणारा माणूस, त्याचा मेंदू आणि आकलनशक्ती, भाषेची कला कशी घडली; मेंदूची माहिती, संकलन आणि साठवणूक क्षमता आणि संवादक्षमता कशी विकसित झाली.

सार्वजनिक गैरवर्तणुकीवरील उपाय

भटक्या मानवाची, स्थिरावलेल्या शेतीक्रांतीपर्यंत आणि गेल्या पाचशे वर्षांमध्ये आधुनिक शहरी मानवापर्यंतचा दीर्घ प्रवास हा विषयाचा पसारा होता. त्यासाठी ‘ह्युमनस्केप’ हे पुस्तक अभ्यासाला होते, ज्यात अनेक संशोधन निबंधांचा समावेश होता. ह्याशिवाय इतर अनेक संदर्भ पुस्तके होती.
शिवाय रोज संगणकांवर आधारित प्रश्नावली सोडविण्याचा खेळ होता. त्यासाठी पाच दिवस केवळ निसर्गात, तर पाच दिवस शहरातील मुख्य दुकानांच्या रस्त्यावर तासभर चालून मग ती सोडवायची असे. त्याचे एकत्रित विश्लेषण डॉ. यंग ह्यांनी वर्गात सादर केले. ह्या दोन परिसरांतील भटकंतीमुळे मेंदूक्षमता कशी बदलते ह्याचे प्रत्यक्ष आकलन झाले.

वापरायला सोपी, श्रम कमी करून झटपट काम करणारी आधुनिक यंत्रे-तंत्रे आपण सहजपणे आत्मसात करतो. उदाहरणार्थ, इमारतीमध्ये जिन्याच्या ऐवजी लिफ्टचा वापर, वापरा आणि फेका वस्तू, गरज नसतानाही दिव्या पंख्यांची बटणे बंद न करणे, वाटेल तिथे कचरा टाकणे, थुंकणे असे आधुनिक काळातील गैरवर्तणूक प्रकार सर्वत्र दिसतात. त्याचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतात.

सार्वजनिक ठिकाणी आढळणारी अशी गैरवर्तणूक बदलण्यासाठी काय करता येईल, ह्याचे प्रयोग डॉ. यंग करीत असत. उदाहरणार्थ, ‘बटण बंद करा’ ऐवजी ‘बटण बंद केल्याबद्दल धन्यवाद’ अशा प्रकारच्या सूचनांना मिळणारा प्रतिसाद असे प्रयोग त्यांनी केले होते. साद आणि प्रतिसाद हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यासंबंधात अनेक गमतीजमती सांगून ते विद्यार्थ्यांना हसवत.

प्रत्येक पानावर दहा चित्रे असलेला दहा पानी चित्रांचा संच आम्हाला देण्यात आला होता. दहा लोकांना दाखवून त्यांनी सर्वात आकर्षक चित्राची निवड नोंद करायची हे काम होते. सर्व विद्यार्थ्यांनी जमवलेल्या शेकडो लोकांच्या माहितीचे विश्लेषण वर्गात सादर झाले.

डॉ यंग ह्यांनी लिहिलेले शोधनिबंध अनेक पुस्तकांत वाचायला मिळतात. विषय मला इतका आवडला होता की पुढे भारतात परत आल्यावर मी त्यावर मराठीत पुस्तक लिहायला घेतले होते. ५० पाने लिहून काढली पण नंतर ते मागे पडले. आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर अभयसक्रमात हा विषय मी समाविष्ट करून घेतला आणि शिकविलाही होता.

डॉ. डॉर्सेता टेलर

‘ Women and Environment’ हा डॉर्सेता टेलर यांचा विषय मी अभ्यासातही निवडला होता. उंच, धिप्पाड, आफ्रिकन अमेरिकन प्रोफेसरबाई, त्यांचा खोल, धीरगंभीर आवाज आणि शिकविण्याची पद्धत ह्यांच्या तर मी प्रेमातच पडले. समवयस्क असल्याने आमची ओळख वाढली, मैत्री झाली. शिकार करण्यासाठी, अन्नसंकलनासाठी रानोमाळ भटकणारे स्त्री-पुरुष तर लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी वस्तीमध्ये राहणाऱ्या स्त्रिया अशी आद्य मानवजातीची विभागणी सुरू झाली. ह्यामुळे स्त्री आणि पुरुषांचे पर्यावरणीय अनुभव वेगळे होत गेले. त्यांचे परिणाम वेगवेगळे होत गेले.

त्यांच्या वर्तणुकीमध्येही वेगळेपण आले. भावविश्व, स्वभावविश्व ह्यातही फरक पडला. त्यांची पर्यावरणीय निरीक्षणे, त्यांची जीवशास्त्रीय जडणघडण, अन्नप्रक्रियेशी, बालसंगोपनाशी असलेले जवळचे नाते आणि त्याबद्दलचे अनुभव वेगवगेळे असल्याने त्यांचे आकलन, ज्ञानग्रहण क्षमता ह्यांच्यातही वेगळेपण आलेले होते. त्यातूनच स्त्रियांना शेतीचा शोध लागला. अन्नसाठवणूक, त्यावरच्या प्रक्रिया ह्यांचा शोध लागला.

शब्द, भाषा घडविण्याची कला, संवादक्षमता पुरुषांपेक्षा अधिक वेगाने वाढली. सर्वसाधारणपणे स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बोलतात हा आपला अनुभव असतो. हे उत्क्रांतीतत्त्व आहे. वेगवेगळ्या पर्यावरणाच्या संदर्भात मानवी भाषा, खाद्यपदार्थ, निवारे, घरांच्या आणि वस्त्यांच्या रचनांमधील विविधता घडत गेल्या आहेत. हस्तकला, विकसित झाल्या आहेत. मानववंशशास्त्राशी संबंधित असे अनेक विषय ह्या सत्रामध्ये शिकायला मिळाले.

रुढी, समज-गैरसमज कसे घडतात ह्याचे आकलन

तसेच समाजात रूढी, समज-गैरसमज कसे घडतात ह्याचे आकलन होऊ लागले. सामाजिक भेदभाव, गुलामगिरी आणि स्त्रियांचे संघर्ष, लोकस्थलांतर, तसेच निसर्गसंवर्धनाच्या विविध चळवळी ह्यांचा पर्यावरणाच्या संदर्भात घेतलेला आढावा अशा अनेक विषयांवरील त्यांची व्याख्याने खूप प्रभावी होती.
स्त्रियांनी विविध काळांत पर्यावरणविषयात केलेल्या कामगिरींचा, डॉ. रेचेल कार्सन आणि त्यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘सायलेंट स्प्रिंग’ ह्यांची ओळख त्यांनी करून दिली. त्यांच्यावरची एक डॉक्युमेंट्री वर्गात दाखवून त्यावर चर्चा झाली. ह्याशिवाय अमेरिकेत नायगाराजवळ आलेल्या लव्ह कॅनॉल प्रकरणात स्त्रियांनी उभ्या केलेल्या चळवळीचा सिनेमाही बघितला. १९६०-७०च्या दशकात स्त्रियांनी पर्यावरणाचा प्रश्न कसा ऐरणीवर आणला, त्याबद्दलचे शोधनिबंध वाचायला मिळाले.

त्याआधीच्या काळात अमेरिकेत प्राणी-पक्ष्यांच्या बेलगाम शिकारीमुळे नष्ट झालेल्या परिसंस्थांचे शोधनिबंध वाचायला मिळाले. तसेच आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांनी त्यांच्या स्वातंत्र्यलढाईत केलेल्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख झाली. भारतामधील चिपको आंदोलनही त्यांनी विशेष आस्थेने शिकविले होते. त्यांच्यामुळेच डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. रामचंद्र गुहा ह्यांचे ‘इकॉलॉजी अँड इक्विटी’ हे पुस्तक मी वाचले. तेव्हा विद्यापीठामध्ये त्यांनी डॉ. गुहा ह्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

प्रश्नावली सोडविण्याचा खेळ

रोज संगणकांवर आधारित प्रश्नावली सोडविण्याचा खेळ होता. त्यासाठी पाच दिवस केवळ निसर्गात, तर पाच दिवस शहरातील मुख्य दुकानांच्या रस्त्यावर तासभर चालून मग ती सोडवायची असे. त्याचे एकत्रित विश्लेषण डॉ. यंग ह्यांनी वर्गात सादर केले. ह्या दोन परिसरांतील भटकंतीमुळे मेंदूक्षमता कशी बदलते ह्याचे प्रत्यक्ष आकलन झाले.

आमच्या वर्गात तर जवळ जवळ १०० विद्यार्थी असत. मिशिगन विद्यापीठ आणि SNRE विभाग खूप विद्यार्थिप्रिय होता. सत्राच्या शेवटी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संशोधन निबंध लिहायचा होता. त्यासाठी विषय निवडून मान्यता घ्यायची होती. ‘कोकणातील पर्यावरण आणि स्त्रिया’ ह्या माझ्या २५ पानी शोधनिबंधाचे डॉर्सेता ह्यांनी विशेष कौतुक केले.

The Environment and the People in American Cities’, ‘1600s-1900s: Disorder, Inequality, and Social Change’, “The Rise of the American Conservation Movement: Power, Privilege, and Environmental Protection, Toxic Communities’ and ‘Environmental Racism, Industrial Pollution, and Residential Mobility ही त्यांची पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत.

ज्ञानवंतांचा पोषणकर्ता देश

मशिगन विद्यापीठातल्या वास्तव्यादरम्यान संपर्कात आलेल्या ज्ञानवंतांच्या आठवणी मला या लेखाच्या निमित्ताने आल्या. गेल्या पंचवीस वर्षांतील त्यांच्या लिखाणाचा, कामाचा शोध घ्यायला निमित्त मिळाले. अमेरिकेतील नगरनियोजनाच्या अभ्यासाच्या काळात खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.

वेगवेगळे दृष्टिकोण, संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धती समजल्या. शोधनिबंध लिहिण्याचे काम किती कष्टाचे आणि जबाबदारीचे असते हे लक्षात आले. माहिती जमा करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून पुढे काही निष्कर्ष काढून शोधनिबंध लिहिणे, हा डॉक्टरेटसाठी अभ्यास करण्याचा मुख्य उद्देश असतो. हे काम विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्रितपणे करतात. विद्यापीठातील ज्ञानवंतांनी देशोदेशींचे नवीन ज्ञानवंत निर्माण करणे हा त्याचा उद्देश असतो.

त्याचबरोबर ते स्वतः ही सतत अभ्यास करीत असतात; विचार करीत असतात आणि ज्ञाननिर्मिती करून त्याबद्दल लिहीत असतात. त्यामुळेच अमेरिकेतील विद्यापीठांकडे जगभरातून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू असतो.

ज्ञाननिर्मिती, संवर्धन आणि देवाणघेवाण

ज्ञाननिर्मिती, संवर्धन आणि देवाणघेवाण ही सातत्याने चालत आलेली मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यातूनच संकर होत होत आधुनिक ज्ञानक्षेत्र विस्तारले आहे, तसेच ते खोल आणि बहुविध झाले आहे. कुतूहल ही ज्ञानप्रक्रियेची मानसिक ऊर्जा असल्यामुळे ज्ञाननिर्मिती अव्याहतपणे चालू आहे आणि चालूच राहणार आहे. ज्ञानप्रक्रियेत अनुभव, माहिती,

विविध विषयांची तसेच संकल्पनांची देवाणघेवाण होते. त्यासाठी संवादकला महत्त्वाची. त्या गरजेमधून बोलण्याच्या, लिहिण्याच्या, अनुवाद करण्याच्या कला विकसित झाल्या आहेत. आधुनिक काळात तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे ज्ञाननिर्मिती, देवाणघेवाण आणि संवर्धनप्रक्रिया वेगवान झाल्या आहेत.
दृक-श्राव्य कला विकसित झाल्या आहेत. ज्ञानयज्ञामध्ये अमेरिकेतील विद्यापीठे आघाडीवर आहेत.

गेली दोन दशके ज्ञानवंतांच्या निर्मितीला अमेरिकेतील विद्यापीठांनी पद्धतशीरपणे मदत केली आहे. त्यांचे अनुकरण करीत चीनने त्यात आघाडी घेतली आहे. दुर्दैवाने आज अमेरिकेतच नाही तर जगभरात आणि भारतामध्येही ज्ञानवंतांची पद्धतशीर उपेक्षा केली जात आहे. संकुचित राजकीय, धार्मिक, आर्थिक विद्वेषाच्या तापलेल्या वातावरणात ज्ञानवंतांची, ज्ञान-विज्ञानाची आणि मानवतावादाची होत असलेली गळचेपी हे मानवजातीवरचे मोठे संकट आहे, हे मात्र नक्की.


(सुलक्षणा महाजन ज्येष्ठ नगरनियोजनकार व पुरस्कारप्राप्त लेखिका तसेच मुक्त-संवादच्या संपादकीय सल्लागार मंडळाच्या सदस्य आहेत. ई मेल: sulakshana.mahajan@gmail.com)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका – दिवाळी विशेषांक २०२५ मधून साभार)

Related posts

सनातनींमध्ये स्त्रियांविषयीचा तिरस्कार कुठून आला?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : शतकभराच्या संघर्षाचा इतिहास

उपनिषदे आणि धर्मशास्त्रांतील ब्राह्मण