कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्याजवळ खासगी प्रवासी बसवर दरोडा टाकून सव्वा कोटी किंमतीची ६० किलो चांदी लुटल्याने खळबळ उडाली. पण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १२ तासात सात संशयितांना अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मास्टर माईंड बसचा क्लिनर सैफी बशीर अफगाणीला बेड्या ठोकल्या. अक्षय बाबासाहेब कदम (वय ३१.रा.विक्रमनगर), जैद बशीर अफगाणी (२१. दोघे रा.मदिना कॉलनी,उचगाव), सुजल प्रताप चौगूले (२०) आदेश अरविंद कांबळे (१८) आदिनाथ संतोष विपते (२५. तिघे रा.आकाशवाणी रोड,सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपासाची माहिती दिली. न्यु अंगडीया सर्व्हिस ही कंपनी दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीची आहे.त्यांच्याकडे मच्छिंद्र नामदेव बोबडे (वय ४७.रा.सावित्री प्लाझा,भेंडे गल्ली,शिवाजी चौक) हे नोकरीस आहेत. ते नेहमी कोल्हापूर ते मुंबई पार्सल ने-आण करण्याचे काम करीत असतात. सोमवारी २२ रोजी रात्री अकराच्या सुमारास अशोक ट्रॅव्हल बसमधून ६० किलो चांदी व १० ग्रॅम सोने आणि मशनीरीचे पार्ट असे तीन पार्सल घेऊन चालले होते. बसमध्ये तावडे हॉटेलजवळ तीन प्रवाशी चढ़ले. त्यानंतर वाठार येथे गाडी आल्यानंतर मागील सीट वरुन पुढ़े ड्रायव्हरच्या केबीन मध्ये येऊन बसले. केबीन मध्ये बसलेल्या एकाने बॅगेतील कोयता काढ़ून क्लिनरच्या मानेला लावला आणि चालकाला बस थांबवण्यास सांगितले. बस थांबल्यावर बोबडे व क्लिनरला मारहाण करून खाली उतरवले. यावेळी मोटारसायकल वरुन आलेल्या इतर साथीदारांनी मच्छिंद्र बोबडे कडे असलेला सोन्या चांदीचा ऐवज जबरदस्तीने कोयत्याचा धाक काढून घेतला आणि पळ काढला. याबाबत बोबडे यांनी तक्रार दिल्यानंतर वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Silver robbed on highway)
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण व वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटना स्थळी भेट दिली. .पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे ,जालिंदर जाधव यांची पथके तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता विक्रमनगर येथील अक्षय कदम याने आपल्या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच चोरीचा मुद्देमाल विक्रमनगर येथील घरात ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अक्षय कदम याला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात चोरीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून अक्षय कदमसह त्याच्या साथीदारांना अटक केली.त्याच्या साथीदारांनी सुध्दा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्या सर्वाना पुढ़ील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.(Silver robbed on highway)