Shinde slams Uddhav: मरे हुए को क्या मारना?: शिंदेंची ठाकरेंवर टीका

Shinde slams Uddhav

मुंबई : विशेष प्रतिनिधी : ‘‘गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेत असताना तुम्ही मुंबई महापालिकेकडे तुम्ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिले. आता तुम्हाला मुंबई खतऱ्यात आहे, असे वाटते. सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर घराबाहेर पडा, असा प्रकार सध्या सुरू आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात, तसा यांचा जीव बीएसीच्या तिजोरीत आहे. कम ऑन कील मी असे आव्हान तुम्ही देताय, मरे हुए को क्या मारना?’’ अशी  बोचरी टीका शिवसेनेचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Shinde slams Uddhav)

मुंबईवर आता भगव्याचे राज्य आणायचे आहे, कामाला लागा, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना केले.

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, मुंबईतील ठाकरे गटाचे ५० नगरसेवक आतापर्यंत आमच्याकडे आलेले आहेत. आणखी बरेच येतील. येत्या स्थानिक स्वराज  निवडणुकाही आपल्याला महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. निवडणुका जिंकण्याच्या कामाला जोमाने लागा, सदस्य नोंदणी करा, पक्ष मजबूत झाला तर तुम्ही मोठे व्हाल, भगव्याचा विचार घराघरांत पेटवा, हिंदुत्वाचा जयजयकार करा आणि पुढे चला, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना केले.

ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. (Shinde slams Uddhav)

विधानसभेलाच तुमचा मुडदा पाडला

‘कम ऑन कील मी,’ असे आव्हान तुम्ही देता. मरे हुए को क्या मारना है? असा सवाल करून शिंदे यांनी विधानसभेला तुमचा मुडदा पाडलेलाच आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचंच काळीज लागतं, मनगटात दम, जोर लागतो. आमच्या मनगटात जोर होता म्हणून आम्ही ते करून दाखवले आहे.

पहेलगामध्ये आमच्या भगिनींचे सिंदूर हिसकावलेल्या भगिनींचे सांत्वन करायला गेला तुम्ही? तेव्हा तुमचे मराठी प्रेम कुठे गेले होते? तेव्हा तुमचे भगिनींचे प्रेम कुठे गेले होते?, असा प्रश्नही शिंदे यांनी केले. (Shinde slams Uddhav)

मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवतो, इतकी वर्षे का आठवला नाही? सत्तेत असताना तिजोरी फोडा, सत्ता गेल्यावर घराबाहेर पडा, असा प्रकार सुरू आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील, कुणाच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या चौफेर विकासासाठी मुक्तहस्ते निधी दिलेला आहे, अजूनही निधी मिळणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी बोलून दाखवला.

त्यांचा मेळावा लाचाऱ्यांचा

हा मेळावा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. हिंदुत्त्वाचा भगवा आणि जनतेचा आशीर्वादही आमच्याकडे आहे. शिवसेनेपुढे अनेक आव्हाने निर्माण झाले, पण बाळासाहेबांचे तेजस्वी विचार, बाळासाहेबांचे तेजस्वी नेतृत्व आणि सच्चा शिवसैनिकांमुळे शिवसेनेचा वटवृक्ष झाला, असे शिंदे यांनी सांगितले. (Shinde slams Uddhav)

आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे. अहंकार त्यांना विनाशाकडे नेतो आहे, या अहंकारानेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. हिंदुत्त्वाचा विश्वासघात केला. असा विश्वासघाती माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी ते लाचार झाले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मताचा अधिकारही गमावला, तुम्ही मात्र सत्तेसाठी लाचारी पत्करली. किती ही अगतिकता? सत्तेत असताना सर्वांना कस्पटासमान समजणाऱ्यांची अवस्था आज काय झाली आहे? आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, सत्तेसाठी तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले. (Shinde slams Uddhav)

तुमच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर

ज्या मतदारांशी तुम्ही प्रतारणा केली ते तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मराठी माणसासाठी तुम्ही काय केले याचा हिशेब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. हिंदुत्व सोडले नाही, असे सांगता मग शिवसेनाप्रमुखांना हिंदूहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? प्रचारसभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता?

याकुब मेमनची कबर तुम्ही का सजवली. पीएफआय सारख्या देशद्रोही संघटनेबरोबर आरएसएसची तुलना करता?, त्यांना टोमणे मारता, हे कसलं हिंदुत्व? तुमच्या धरसोडवृत्तीमुळे मतदारांनी तुम्हाला सोडले. अयोध्येत राम मंदिर, ३७० कलम हटवण्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारणाऱ्या तुम्ही शिव्या देता आणि काँग्रेसच्या नावाने ओव्या हे काय चाललंय? काहीही झाले तरी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, मराठीला अंतर देणार नाही, असे ते म्हणाले. (Shinde slams Uddhav)

राहुल गांधी आणि तुम्हीही भारतीय लष्कराच्या पराक्रमावर अविश्वास दाखवता? हा देशद्रोहापेक्षाही मोठा गुन्हा आहे. आज बाळासाहेब असते तर तुमचे कोर्ट मार्शलच केले असते, असा संतापही शिंदे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात हुंडाबंदी विरोधी अभियानाच्या लोगोचे अनावरणही शिंदे यांच्याहस्ते झाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर