BJP-BADGUJAR: सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले, पवित्र झाले!

BJP-BADGUJAR)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. म्हणजे भाजपने त्यांना प्रवेश दिला. आठ माजी नगरसेवक, माजी आमदार बबनराव घोलप, त्यांची मुलगी आणि माजी नगरसेविका नयना घोलप यांनीही बडगुजर यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. दाऊदचा साथीदार सलीम कुत्तासोबत एका पार्टीत नाचतानाचे सुधाकर बडगुजरचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केले होते. अशा अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तिला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे चहुबाजूंनी टीका होत आहे. (BJP-BADGUJAR)
-प्रतिनिधी


सुधाकर बडगुजर हे नाशिकमधले बडे प्रस्थ आहे. त्यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या. २००४, २००९ आणि २०२४. अलीकडच्या निवडणुकीत त्यांना २६ टक्के म्हणजे ७३ हजार मते मिळाली होती. भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांच्याहून जवळपास दुप्पट मते मिळवून निवडणूक जिंकली. असा पराभूत उमेदवारही भाजपला हवाहवासा वाटतो, त्याचे कारण महापालिकेची सत्ता. दोन दशकांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या बडगुजर यांच्यावर गेल्या २२ वर्षांत २९ गुन्हे दाखल आहेत. आणखी एक गोष्ट इथे नोंदवायला हवी. बडगुजर आधी शिवसेनेत होते. फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात त्यांचा उल्लेख आहे. सगळे गुन्हे त्यांच्यावर शिवसेनेत असताना दाखल होते. म्हणजे भाजपचा त्यांच्याशी संबंध नाही. भूतकाळ मागे पडला आहे. भाजपमध्ये आले आहेत ते मागचे मागे टाकून स्वच्छ चारित्र्याचे बडगुजर, असा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा अर्थ निघतो.(BJP-BADGUJAR)

बडगुजर वादग्रस्त ठरले, ते सलीम कुत्ता याच्यामुळे. तर हा कुत्ता कोण, तर…..

सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. दाऊदचा भाऊ इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी गँगच्या शैलेश हळदकरची जेजे रुग्णालयात हत्या झाली होती. त्या हत्येमध्ये सलीम कुत्ताचा सहभाग होता.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग सिद्ध झाला होता. सलीम कुत्ताचं खरं नाव मोहम्मद सलीम शेख आहे. उत्तर प्रदेशातील नजीबाबाद तालुक्यातलं कल्हेडी हे सलीम कुत्ताचं मूळ गाव. राग आला की, कुत्र्यासारख्या गुरगुरण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला सलीम कुत्ता हे नाव पडलं होतं.

सलीम कुत्ताला शिक्षा झाल्यापासून तो महाराष्ट्रातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आधी तो नाशिक, औरंगाबादच्या तुरुंगात होता. सध्या तो पुण्यातील येरवडा तुरुंगात आहे. सलीम कुत्ता मधल्या काळात पॅरोलवर बाहेर आला होता, त्या काळात त्याचा सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जाते. (BJP-BADGUJAR)

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील अनेकजण नाराज झाले आहेत. बडगुजर यांच्यावर भाजप नेत्यांनीच दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याचा आरोप केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील कॅसिनोमधील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोच्या आधारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांनी कॅसिनोमध्ये कोट्यवधी रुपये उधळल्याचा आरोप केला होता. सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना हा फोटो उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. आपल्याला आठवत असेल की, राऊत यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये सोशल मीडियावर बावनकुळे यांचा मकाऊच्या कॅसिनोमधील फोटो शेअर केला होता. बावनकुळे यांनी यावेळी साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा आरोप राऊत यांन केला होता. आता बडगुजर यांना हा फोटो कुठून आणि कसा मिळाला, याचा उलगडा झाला नव्हता. भाजपवाले आरोप करायचे त्यानुसार बडगुजर यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे त्यांना मकाऊच्या कॅसिनोमधील बावनकुळे यांचे फोटो उपलब्ध झाले असावेत. आता सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आल्यामुळे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा बाळगूया.

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशापूर्वी नाशिकच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी त्याला विरोध केला होता. पण पक्षाच्या निर्णयापुढे त्यांचे काही चालले नाही. पक्षाच्या म्हणजे कुणाच्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या. अमित शाह यांच्या सूचनेनुसार गिरीश महाजन यांचे मंत्रिमंडळातील महत्त्व कमी केले असले तरी भाजपच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचे वजन टिकून आहे. त्याचमुळे महाजन जे म्हणतील ते फडणवीस मान्य करतात. गिरीश महाजनही बावनकुळेंना जुमानत नाहीत, असेच यातून दिसून येते.(BJP-BADGUJAR)

बडगुजर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नाशिक शहर प्रमुख असताना भाजपने त्यांच्यावर गुन्हेगारी संबंधांसाठी हल्ला चढवला होता. नितेश राणे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी त्यांनी बडगुजर यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या मेजवानीत १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य सलीम कुत्ता याच्यासोबत नाचतानाचे फोटो दाखवले होते. त्यावेळी झालेल्या मागणीनुसार तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. फडणवीसांच्या म्हणण्यानुसार त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नाशिक हा मुंबई, ठाण्यानंतरचा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज ठाकरे यांचीही नाशिकमध्ये लक्षणीय ताकद आहे. नाशिकमध्ये आपल्याला पाठबळ मिळू शकते, असा उद्धव ठाकरे यांचा विश्वास आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी भाजपने सुधाकर बडगुजर यांना आपल्याकडे घेतल्याचे मानले जाते. निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांनी या कृतीतून दाखवून दिले आहे.

बडगुजर यांनी एका आठवडाभरापूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बडगुजर यांना पक्षात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. बडगुजर यांच्या या हालचालींची चाहूल लागताच ठाकरे यांनी बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांना पक्षातून तडकाफडकी काढून टाकले.

सोमवारी बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असलेले बावनकुळे अवाक् झाले. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय आपल्याला माहित नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यानंतर काही तासांनंतर, मंगळवारी बावनकुळे यांना नम्रपणे बडगुजर यांचे पक्ष कार्यालयात स्वागत करावे लागले. “ बडगुजर यांचापक्षप्रवेश हा भव्य कार्यक्रमाने होईल असे मला वाटत होते, पण गिरीश महाजन यांनी तो आजच आयोजित केला,” अशी सारवासारव करून बावनकुळे यांनी आपली नामुष्की लपवण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रवेशाची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी कम्युनिकेशन गॅपचे कारण सांगून सारवासारव केली.

बडगुजर यांच्यावह हल्ला करणारे नितेश राणे यांनीही आपली भूमिका बदलली. “बडगुजर आता हिंदुत्वाच्या मार्गावर चालत आहेत. जर ते हिंदुत्व बळकट करण्यासाठी काम करत असतील, तर त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचे कारण नाही,” असे सांगून त्यांनीही शरणागती पत्करली. अर्थात पुढेमागे सलीम कुत्ताला भाजपमध्ये प्रवेश द्यायचे ठरवले तर नितेश राणे त्याला कडाडून विरोध करतील, असे सांगितले जाते.(BJP-BADGUJAR)

नाशिक महानगरपालिकेत शंभर जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे त्या जिंकता येतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नाशिक महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने हे धाडसी पाऊल उचलले आहे. परंतु नाशिकची जनता भाजपच्या या शुचिर्भूत राजकारणाला किती आणि कसा पाठिंबा देते, हे पाहावे लागणार आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर