एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात काय चित्र आहे?

Shinde faces a test in the Thane Municipal Corporation

ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष  झाला होता. एक जानेवारी १९६७ ला ठाण्यातील पहिल्या शिवसेना शाखेची स्थापना झाली. आणि ऑगस्ट १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सत्ता मिळवली. वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची घटना घडली होती. शिवसेना निवडून आल्यावर नाट्यगृह आदी सुविधा देणार का?, अशा प्रश्नाची चिट्ठी सभापीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली. त्यांनी त्याचवेळी ठाण्यात नाट्यगृह आणि अन्य सुविधा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार गडकरी रंगायतनदादोजी कोंडदेव स्टेडियम आदींची निर्मिती झाली. १९८२ मध्ये ठाणे नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले.

विजय चोरमारे

मात्र महापालिकेची निवडणूक १९८६ मध्ये झाली. त्यात शिवसेनेला ३०, काँग्रेसला २५, भाजपला पाच अशा जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या मदतीने शिवसेनेचे सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले. काँग्रेसचे वसंत डावखरे विरोधी पक्षनेते झाले. शिवसेनेची ही सत्ता फक्त एकच वर्ष राहिली. कारण काँग्रेसच्या वसंत डावखरे यांनी भाजपचे, शिवसेनेचे तसेच काही अपक्ष नगरसेवक फोडले आणि काँग्रेसचे मनोहर साळवी महापौर झाले. त्यावेळी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेऊन ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवले. त्यांनी ते संबंधित यंत्रणेकडे पाठवून मंजूर करून घेतले.नंतरच्या काळात महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले म्हणून झालेली श्रीधर खोपकर यांची हत्या राज्यभर गाजली होती.ठाणे महापालिकेच्या इतिहासात अशा अनेक रोमहर्षक घटनांची नोंद आहे. एडी आणि व्हीडी यांचे ठाण्याच्या राजकारणावरील वर्चस्व चर्चेत होते. एडी म्हणजे आनंद दिघे आणि व्हीडी म्हणजे वसंत डावखरे.

नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर दोनदा काँग्रेसचे महापौर झाले. त्यानंतर शिवसेनेकडे ठाणे पालिका आली ती आजअखेर. आनंद दिघे यांच्या निधनानंतर राजकारण बदलले. अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे यांची ठाणे शिवसेनेवर आणि ठाण्यातल्या राजकारणावर पकड आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाल्यानंतरही शिंदे यांनी ही पकड ढिली होऊ दिलेली नाही.

ठाणे महापालिकेत १३१ प्रभाग आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. भाजपा ४० तर शिवसेना ८७ जागा लढवत आहे. महायुतीच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडी केली आहे. शिवसेना (UBT) ६२, मनसे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) ४१ जागा लढवत आहे. काँग्रेस स्वबळावर लढत असून ९५ जागांवर त्यांचे उमेदवार आहेत. वंचित ६० तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ७५ जागा लढवत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी लढत असले तरी ठाण्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती आहे. ही युती होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी इतर पक्षांचे नगरसेवक फोडले. त्यामुळे आधीच्या सभागृहात असलेले ८५ नगरसेवक त्यांच्या बाजूला आहेत. या जोरावर त्यांनी शेवटपर्यंत भाजपशी जागावाटपात बार्गेनिंग केले आणि जादा जागा पदरात पाडून घेतल्या. कोरोना काळात सरकारी मदतीतून शिंदे यांनी रॉबिनहूड प्रतिमा निर्माण केली. तो टेम्पो त्यांनी आपल्या प्रचार यंत्रणेमार्फत टिकवून ठेवला आहे. नगरविकास खाते, मुख्यमंत्रिपद असल्याने ठाण्यासाठी मोठा निधी आणला. पण या निधीतून शहराचा किती विकास झाला, हा प्रश्न भाजपच्याच नेत्यांनी विचारला होता. ७ हजार कोटींचा हिशेब लागत नसल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केला होता.

खरेतर ठाणे हा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्याची चर्चा व्हायला हवी होती. परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, त्याची चर्चा खूप दिवस चालली. त्यानंतर अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष चर्चेत राहिला. त्यामुळे तुलनेने ठाणे महापालिका निवडणुकीची कमी चर्चा आहे. याठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहे. परंतु ठाणे शहरासह जिल्ह्यात भाजपने शिंदेंचे पंख छाटण्याचे धोरणच अवलंबले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद, वितंडवाद वाढलेत. परस्परांवर शाब्दिक आणि शारीरिक हल्ले सुरू आहेत. पैसे वाटताना एकमेकांचे लोक पकडले जात आहेत. त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचे पंख छाटायचे तर त्यांच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांना रोखायला हवे, अशी भाजपची रणनीती आहे. जेणेकरून भविष्यात भाजपच्या राजकारणापुढे फार मोठा अडथळा राहणार नाही. कारण ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून हिसकावून घेतला. तो भाजपकडे परत मिळवण्याची रणनीती आहे. आता त्या मतदारसंघाचे ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ झाले आहेत. हे दोन्ही मतदारसंघ नजिकच्या भविष्यात भाजपच्या ताब्यात येतील, यादृष्टिने भाजपची रणनीती सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून काही जागांवर शिंदेंना दगाफटका केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु स्वतः शिंदे खमके असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

ठाणे महापालिकेमध्ये तुलनेत विरोधकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. निवडणुकीच्या आधी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. पण महापालिका निवडणुकीत ते एकत्र येतील का याबाबत संभ्रम होता. ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर मनसे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आघाडी आहे. तरी त्यांच्याकडे तुलनेने मनी, मसल पॉवर कमी आहे. प्रचार नियोजनात सुसूत्रता नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. त्यासाठी कोट्यवधी रुपये आधीच खर्च केले. याची माहिती विरोधकांना नव्हती. निवडणूक अधिका-यांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे घोषित केल्यावर विरोधक जागे झाले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संघर्ष केला आहे. परंतु कळवा मुंब्रा शिवाय अन्य मतदार संघात ते प्रचारात दिसत नाही. आव्हाड यांच्या पक्षातून डझनभर माजी नगरसेवक शिंदे यांनी फोडले. त्यामुळे ही निवडणूक आपल्या मतदार संघातील प्रभागांसाठी आव्हाड यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

यंदाची निवडणूक नवखे विरुद्ध प्रस्थापित अशीच होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ७० टक्के उमेदवार प्रस्थापित आहेत. विरोधकांकडे ९० टक्के नवीन उमेदवार आहेत. त्यामुळे मतदार नव्यांना संधी देतात, की जुन्या मंडळींना ही पहावे लागेल. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात सत्तेत असला तरी जागा वाटपात एकनाथ शिंदे यांनी त्यांची गणती केली नाही. त्यामुळे हा पक्ष अनेक नाराज उमेदवारांना घाऊकपणे तिकिट देऊन निवडणूक लढवत आहे. तूर्तास शिंदे यांचे पारडे ठाण्यात जड दिसत आहे. भाजपने दगाफटका केल्यास त्यांचे काही उमेदवार पडतील. पण ते प्रमाण कमी असेल. ठाण्यात मराठी कार्ड चालल्यास किमान विरोधी बाकावर शिवसेना,मनसे आणि राष्ट्रवादी बसू शकते. आता मनी, मसल पॉवर ठाण्यात चालते की मराठी कार्ड हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या