मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा व शिवेसेनेनेतील वाद पुन्हा विकोपास जात आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याबद्दल सेनेच्या कार्यकर्त्याने भाजपा उमेदवाराच्या भावाला ‘विरोधात प्रचार करू नको नाही तर ठार मारेल’, अशी धमकी देत धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Sena workers attack BJP)
अंबरनाथ पश्चिम भागातील कल्याण – बदलापूर मार्गावरील एम्पायर सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी ही घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात साहिल वडनेरे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे, या हल्यात सत्यम सुनील तेलंगे (२२) हे गंभीर जखमी झाले आहेत. सुनील यांचे भाऊ प्रजेश तेलंगे हे भाजपाच्या तिकिटावर अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढत आहेत. तर त्याच्या विरोधात शिवसेनेचे शैलेश भोईर उमेदवार आहेत, यांच्यासह विनोद भोईर, समीर मगर, जयेश मगर आणि अमन सोनकांबळे हेही शिवसेनेच्या तिकिटावर याच भागातून निवडणूक लढत आहेत. प्रचार शिगेला पोहोचला असताना हल्लेखोर साहिल वडनेरे याने बुधवारी सायंकाळी सत्यमला फोन करून बोलावले. त्यानंतर तो राहत असलेल्या कल्याण-बदलापूर मार्गावरील एम्पायर इमारतीच्या गेटजवळ दोघे भेटले. यावेळी दोघे गप्पा मारत असताना सत्यमला साहिल वडनेरे यानं “भाजपाचा प्रचार करायचा नाही, केल्यास तुला मारू,” अशी धमकी दिली. यानंतर अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्याला गंभीर जखमी केले,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबीर सौयद यांनी दिली. (Sena workers attack BJP)
“या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांच्या पथकानं गंभीर जखमी असलेल्या प्रजेशला रुग्णालयात दाखल केलं. हल्लेखोर साहिल वडनेरे आणि त्याच्या दोन साथीदारांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी साहिल वडनेरे याला अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबीर सौयद यांनी दिली. (Sena workers attack BJP)