नवी दिल्ली : वीर सावरकर यांच्याबद्दलच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासंदर्भातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींवरील समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२५ एप्रिल) स्थगिती दिली. (SC pulls up Rahul)
महाराष्ट्रात सावरकरांना आदर आहे, याची आठवण करून देत त्यांच्याबद्दल अवमानास्पद टिप्पणी केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांना दिला.
विशेषतः यावेळी न्यायालयाने ऐतिहासिक संदर्भाचा दाखला देत, राहुल गांधी यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते हे निदर्शनास आणून दिले. (SC pulls up Rahul)
तुमच्या अशिलाला माहिती आहे का की, त्यांच्या आजीने पंतप्रधान असताना सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना विचारला. यापुढे स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नका, असेही कोर्टाने सुनावले.
‘‘देशाच्या इतिहास आणि भूगोलाबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अशी वक्तव्ये कशी करता?’’ असा संतापही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला. (SC pulls up Rahul)
ब्रिटिश काळात महात्मा गांधींच्या पत्रव्यवहाराशी न्यायालयाने समांतरता दर्शविली. यावेळी त्यांनी ‘तुमचा विश्वासू सेवक’ हा शब्दप्रयोग वापरला होता.
प्रकरण काय?
१७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेच्या रॅलीत गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांवरून हे प्रकरण उद्भवले आहे. भारत जोडो यात्रा सुरू असताना अकोला जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सावरकरांनी ब्रिटिशांना पाठिंबा देण्याचे वचन दिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ‘‘महाराज, मी तुमचा सर्वांत आज्ञाधारक सेवक राहण्याची विनंती करतो,’’ असे सावरकर म्हणाले होते आणि त्याखाली सही केली होती, असे राहुल गांधी म्हणाले होते.
त्यानंतर वकील नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये जाणूबुजून वीर सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा :
सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली
दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त