कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेस पक्षात माणसं येतात आणि जातात. पण माणसं तयार करण्याची फॅक्टरी माझ्याकडे आहे. माझ्याविषयी अनेक अफवा पसरावल्या जातात. पण अफवेवर विश्वास ठेऊ नका. कारण काँग्रेस एक महासागर आहे. काँग्रेस हा एक विचार आहे. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची तयारी काँग्रेसमध्ये आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धमक फक्त काँग्रेस पक्षात असल्याने आयुष्यभर काँग्रेस म्हणून काम करत राहणार आहे, असा निर्धार विधान परिषदेला काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. (Satej Patil)
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत निर्धार मेळाव्यात सतेज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू खासदार होते. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधन करताना काँग्रेसचा विचार घरोघरी पोचवून महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले. (Satej Patil)
राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले, विधानसभेत महायुतीला पाशवी बहुमत मिळाले असल्याने राज्य सरकार रेटून कारभार करत आहे. असे सरकार गेल्या वीस वर्षात पाहिले नाही. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अंथरुन पसरुन पाय पसरायचे असतात. पण इथं अंथरुन दिसत नाही तर पायच दिसायला लागले आहेत. मुख्य अर्थसंकल्पापेक्षा पुरवण्या मागण्याच जास्त दिसत आहेत, असा टोला त्यांनी राज्यसरकारला मारला. (Satej Patil)
राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याने सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आपण पहात आलो आहोत. पण विकास कामाची बिले दीड दोन वर्षे मिळत नसल्याने एका तरुण कॉन्ट्रकरने आत्माहत्या केली आहे. सरकार या पापाचे धनी आहे असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.
सतेज पाटील म्हणाले, ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना तो बांधला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अंगणवाडी सेविका, संजय गांधी निराधार योजना, आशा आरोग्य सेविकांना मानधन वाढून दिले जात नाही. निवडणूका जिंकण्यासाठी लाडकी बहिण योजना राबवली. आता राज्य सरकारला लाडकी बहिण सावत्र झाली आहे. आता नियम बघून लाडक्या बहिणींचे अनुदान बंद करत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले
काळ बदलला असून आता तरुणाईला काँग्रेसकडे पुन्हा वळवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. तरुणाई गांजाच्या विळख्यात अडकत चालली असून त्या विरोधात काँग्रेसने रस्त्यांवर उतरले पाहिजे. काँग्रेस हा विचार आहे. राहूल गांधी हा विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा वारंवार अपमान केला जात आहे. पण त्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारुन देशभर सर्वांना एकत्र करण्यासाठी पदयात्रा काढली. भाजपकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होणार असून त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजग राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. श्रीपतराव बोंद्रे, पी.एन पाटील यांचा वारशाची धुरा आता आपल्याकडे आली आहे. खचून न जाता आता संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याकडे कोण आहे, कोण गेले याचा विचार करु नका. बंटी पाटील यांच्याकडे तुमच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांची जीवाभावाची संपत्ती आहे. महाभारतात कौरवांची संख्या जास्त असताना कृष्णाने पांडवांना आपण जिंकणार असा विश्वास दिला होता. कारण पांडवांची सत्याची बाजू होती. काँग्रेसची सत्याची बाजू असल्याने आपलाच विजय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माणसं तयार करण्याची फॅक्टरी बंटी पाटील यांच्याकडेच
सतेज पाटील म्हणाले, आगामी महानगरपालिका निवडणूकीत प्रभाग रचना चुकीची करु नका असे पत्र प्रशासनाला दिले आहे. चुकीची प्रभाग रचना काँग्रेस पक्ष हाणून पाडेल. नियमानुसार प्रभाग रचना झाल्यानंतर मतदारांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मध्ये पावनेदोन लाख मते काँग्रेसला मिळाली आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीवर विश्वास दाखवून दहा लाख मतदार आपल्या मागे आहेत. या मतदारांना आपल्यावर वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आपण ज्यांना पदे दिली ते निघून गेली. माणसं येतात आणि जातात पण माणसं तयारी करण्याची फॅक्टरी बंटी पाटलाकडे आहे.
फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करणार
निवडणूकीसाठी आपण सर्वत्र एकत्र राहूया. पण निवडणूकीच्या शेवटच्या पंधरा दिवसात मला फसवण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्या टारगेटवर राहतील. अशा मंडळींच्या विरोधात त्यांच्या प्रभागात माझा मुक्काम असेल आणि त्याचा करेक्ट कार्यक्रमही केला जाईल, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला. आमचे चुकत तर आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका दुरुस्त करु असेही त्यांनी सांगितले.
खासदार शाहू छत्रपतींनी काँग्रेसला मोठा इतिहास असून आता महानगरपालिकेवर विजय हे काँग्रेसचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, आनंद माने, यांची भाषणे झाले. यावेळी आमदार जयंत आसगांवकर सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी यांच्या माजी नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. (Satej Patil)