Book Publication: इतिहासातल्या नोंदीविना संस्कृतीचे मरण क्लेषदायी : डॉ. कुंभार

Book Publication

कोल्हापूर : मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखाद्या संस्कृतीचे मरण तिच्या इतिहासातल्या नोंदीविना होते, तेव्हा ते अधिक क्लेषदायक असते, अशी खंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केली. (Book Publication)

पत्रकार रावसाहेब पुजारी यांच्या ‘कातरबोणं’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

तेजस प्रकाशनच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘जगभरातील भूकंप- स्वरूप, भ्रम आणि वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

डॉ. कुंभार म्हणाले, आजच्या मेंढपाळ-धनगर समाजातल्या अनेक कला, परंपरा इतिहासात कोणतीही नोंद न होताच कालबाह्य होत आहेत. अशा काळात रावसाहेब पुजारी यांची कातरबोणं ही कादंबरी येते. ती मेंढपाळ समूहाचे वास्तव जगणं नोंदविते, ते मराठी साहित्याच्यादृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. (Book Publication)

प्राचार्य कुंभार म्हणाले, धनगर ही आदिम जमात आहे. शेळ्या-मेंढ्या राखता राखता त्यांनी ओव्या, ढोलवादन, गजीनृत्य अशा अनेक कला जोपासल्या. त्यांचे जगणे, खाणे, गाणे आणि वाजविणे ही वेगळीच संस्कृती आहे. एकेकाळी धनगरी रामायण गावोगावी सादर केले जात होते. हे आज नव्या पिढीला सांगावे लागते. त्याची इतिहास नोंद घेत नाही. अभिजनाला त्याच्याशी फारसे देणे-घेणे नाही. १९६५ साली बनगरवाडी आली, तेव्हा ते जग मराठी साहित्याला नवीन जग होते, त्याचे मोठे स्वागत झाले. कातरबोणं त्याच्या पलीकडंचे धनगरांचे वास्तव जग सादर करते. म्हणून तिचे मराठी साहित्यात महत्त्वाचे योगदान आहे. (Book Publication) 

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णात खोत म्हणाले, कातरबोणं या कादंबरीमध्ये मेंढपाळ समाजाच्या जगण्याचे द्रव्य भरलेले आहे. कोणत्याही आकृतीबंधाशिवाय माणसाच्या जगण्याचे चित्रण तिच्यात आलेले आहे. निसर्ग, झाडंझुडपं, गवत, डोंगरदऱ्याविषयीचे मेंढपाळाचं संघर्षमय जगणंही व्यक्त होते. म्हणून ती अधिक भावते.

प्रा. रघुनाथ कडाकणे यावेळी म्हणाले, ‘कातरबोणं’ सहज, सोप्या शब्दात आकाराला आलेली ही साहित्यकृती पारंपरिक कादंबरीच्या आकृतीबंधात कुठेच बसत नसली तरी मेंढपाळ समूहाचे चित्रण खूप बोलकं आहे.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यावेळी बोलताना म्हणाले, धनगर समाजाची अवस्था आज कुणीही हाकावे, अशी झालेली आहे. समाजाला एकमुखी नेतृत्त्व नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला प्रतिनिधीत्व नाही. या समाजाला विकास म्हणजे काय हेच कळलेले नाही. अन्य समाजातील माणसे पुढे गेली, तशी माणसे धनगर समाजातून पुढे जाण्यासाठी धनगर समाजासाठी समाज आणि सरकारकडे कोणतीच योजना नाही. पुजारींची कातरबोणं ही कादंबरी या सगळ्यांची नोंद घेते, याचे समाधान वाटते.

प्रारंभी डॉ. अहिल्यादेवी संजय हुलवान-पुजारी यांनी स्वागत केले. कातरबोणंचे लेखक रावसाहेब पुजारी यांनी कादंबरीलेखनाची प्रेरणा आणि लेखन प्रक्रियेविषयी सांगितले. यावेळी ‘जगभरातील भूकंप’चे लेखक महादेव शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, यशवंत सेनेचे प्रमुख बबनराव हजारे, नारायण मोटे-देसाई, माजी शिक्षण संचालक नेमचंद शितोळे, उद्योजक अतुल कुलकर्णी, सुनिल पाटील, प्रदीप घोडके, नागेश पुजारी, प्रा. टी. के. सरगर, विकास घागरे, प्रा. लक्ष्मण करपे, शिवाजीराव कचरे, पदमाकर पाटील, रावसाहेब पाटील-पाटपन्हाळाकर, पत्रकार दयानंद लिपारे, प्रा. अनिलकुमार पाटील, प्रा. शांताराम कांबळे, अजयकुमार पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Related posts

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे : वासुदेव कुलकर्णी

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?