Sapkal Attack on Mahayuti : शेतकरी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान गप्प : सपकाळ

Harshwardhan Sapkal

मुंबई : विशेष प्रतिनिधी : परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. तो पिचला असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) केली. (Sapkal Attack on Mahayuti)

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. पिके  गेलीतच. शिवाय लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी.(Sapkal Attack on Mahayuti)

ते म्हणाले, ‘‘ पावसामुळे मुंबईतील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत पण महापालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला. वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महापालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरु आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा.’’

फडणवीसांनी जाहीर माफी मागावी

बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणवीस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक, शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही त्यांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जातीबहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोपही सपकाळ यांनी केला.

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळावा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, त्यांना काँग्रेसने आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्त्वाची पदे दिली. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्त्वाची पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोला लगावला.(Sapkal Attack on Mahayuti)

टिळक भवन येथे मंगळवारी रोजगार मेळावा
राज्यात २.५ लाख सरकारी जागा रिक्त जागा असतानाही सरकार मात्र नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर