संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते. तर संग्राम थोपटे सलग तीनवेळा आमदार राहिलेत. साडेचार दशके आमदारकी घरात असलेले संग्राम थोपटेसुद्धा भाजपवासी झाले आहेत. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. (Sangram Thopate)
महाराष्ट्राचे राजकारण एका विचित्र वळणावर पोहोचले आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन पाच महिने झाले आहेत. सरकारमध्ये मोठी धुसफूस असली तरी एवढे प्रचंड बहुमत आहे की मधल्या काळात काही नाट्यमय घडण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत सत्तेशिवाय साडेचार महिने कसे काढायचे, कार्यकर्त्यांना कसे सांभाळून ठेवायचे, असा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांपुढे आहे. त्याचमुळे एकेक मोहरा महायुतीतल्या पक्षांमध्ये जाऊ लागला आहे. मध्यंतरी रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ते तसे बाहेरचेच होते. परंतु काँग्रेसच्या खानदानातले म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटेसुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. थोपटे जाऊ शकतात, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ सोडून कुणीही काँग्रेस सोडून जाऊ शकतो, अशी सध्याची स्थिती बनली आहे. (Sangram Thopate)
अनंतराव थोपटे यांची कारकीर्द
अनंतराव थोपटे यांना अनेक खात्यांचा अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून सुमारे १४ वर्षे काम पाहिले होते. दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) अशी विविध खाती त्यांनी भूषवली.
१९९९ साली काशिनाथ खुटवड यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वांत मोठा धक्का होता. हा पराभव झाला नसता तर अनंतराव थोपटे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असते. मध्यंतरी २०२४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवार त्यांना भेटायला गेले होते. २५ वर्षांनी दोन नेत्यांची भेट झाली. त्यावेळी अनंतराव थोपटे यांनी विजय शिवतारे यांच्या भेटीनंतर जुनी सल बोलून दाखवली होती. (Sangram Thopate)
संग्राम थोपटे हे तीन वेळा आमदार होते. त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी संग्राम थोपटे यांची नियुक्ती होण्याची चर्चा सुरू होती. परंतु काँग्रेसनेही त्यासंदर्भात चर्चेच्या पुढे जाऊन पाऊल टाकले नाही. आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे तीनवेळा आमदार आणि पक्षाशी एकनिष्ठ असूनही त्यांना लाल दिवा मिळाला नाही, ही खंत त्यांच्या मनात कायम होती. पराभवानंतर तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस, हे त्यांच्या राजीनाम्याचं कारण असल्याचं बोललं जातं. (Sangram Thopate)
निष्ठेचं फळ मिळालं नाही…
मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही काँग्रेस का सोडली? गेली अनेक वर्षांपासून तुमच्या वडिलांनी काँग्रेस रुजवली. पण खरं सांगायचं झालं तर ही वेळ काँग्रेसने आणली. पाच-सात वर्षे या परिस्थितीचा विचार करत आहे. विधीमंडळामध्ये अनेक भाजप नेते मला वारंवार सांगायचे संग्राम निर्णय घ्या. किती दिवस तुझ्यावर अन्याय होतोय. पण मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळे या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. तेच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला. परंतु खंत एवढीच आहे की निष्ठा राखून पक्षाचं काम केलं पण निष्टेच फळ मिळालं नाही. संघर्षाच्या भूमिकेतून सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका असतील तिथे एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पक्षाची ताकद मिळो ना मिळो काँग्रेस पक्ष वाढवण्याचं प्रामाणिक काम केलं. (Sangram Thopate)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा परिसर आहे. मला काही मिळावं म्हणून मी इथे आलेले नाही, माझ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने प्राधान्य द्यावं अशीा आग्रहाची विनंती मी करतो, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.
राजगड कारखाना अडचणीत
संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राजगड कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. या कारखान्याला राज्य सरकारने ८० कोटींचे मार्जिन लोन मंजूर केले होते. लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांनी आघाडीचा धर्म पाळला होता. परंतु निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने अजितदादांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली होती. त्याचा परिणाम म्हणजे कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्याला मदत मिळण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्याची चर्चा आहे.
म्हणे विकासासाठी भाजपमध्ये…
म्हणजे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे हा एक नवाच मंत्र महाराष्ट्राच्या कानावर पडू लागला आहे. अजितदादा पवार यांनी तो मंत्र सतत उच्चारला आणि त्यामुळे तो रूढ झाला. अजितदादा शरद पवारांना सोडून जाऊ शकतात तर कुणीही पक्ष सोडून जाऊ शकते, असे म्हटले जाऊ लागले. आणखी एक गोष्ट म्हणजे राजकारण करायचे तर ते सत्ताधारी पक्षातूनच करता येऊ शकते, असा नवा समज रूढ केला जाऊ लागलाय. मोठे नेतेच त्या मार्गाने जाऊ लागल्यामुळे दुस-या तिस-या फळीतील नेत्या-कार्यकर्त्यांनी तोच मार्ग पत्करलेला दिसतोय. त्यात पुन्हा सत्ताधा-यांनी एक नवाच फंडा काढलाय. तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पोलिस ठाण्यापर्यंत सगळीकडं फक्त सत्ताधारी नेत्यांचंच ऐकायचं अशी सक्त ताकीद दिली गेलीय. त्यामुळं प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी विरोधकांना जुमानेनासे झाले आहेत. जे विरोधातले नेते दमदाटीची भाषा करू शकतात त्यांच्यापुढेच सरकारी अधिकारी दबून असतात. त्यामुळेही विरोधी नेत्यांना वैफल्य येऊ लागले आहे. अजून सहा महिनेही झाले नाहीत. पुढच्या साडेचार वर्षांत सगळा बाजार उठेल अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे एकेकजण सत्ताधारी पक्षाची वाट धरू लागला आहे. मग कोण शिंदेच्या शिवसेनेत जातोय. कोण अजितदादांच्या राष्ट्रवादीत, तर कोण भाजपमध्ये. जिथे ज्याला जे सोयीचे असेल तो नेता आणि पक्ष निवडला जातोय. अजितदादांशी टक्कर घ्यायची तर भाजपशिवाय पर्याय नाही या विचाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले. विचारधारा वगैरे काही उरलेली नाही. पक्षनिष्ठेचे पार पोतेरे करून टाकले आहे. आज संग्राम थोपटे गेले. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षातील एकेक नेता त्या मार्गाने जाणार आहे. सगळ्यांना त्याची कल्पना आहे. काँग्रेसपुरते बोलायचे तर हर्षवर्ध सपकाळ यांच्यासारख्या नेत्यापुढे जसे मोठे आव्हान आहे, तशीच मोठी संधीसुद्धा आहे. तळागाळापर्यंत जाऊन सरकारविरोधात जनमत संघटित करण्याची. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात तेवढाच एक आशेचा किरण दिसतो.