Rohit pawar slams Kokate: रोहीत पवार म्हणाले, दिवा विझताना मोठा होतो…

Rohit pawar slams Kokate

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मला रमी कशी खेळतात ते माहित नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा देत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर काही मिनिटातच त्याचे त्या संदर्भातील दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजीनामा तर द्यावाच लागेल, असे नमूद करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस आ. रोहित पवार यांनी हे व्हिडीओ एक्सवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये विधान परिषदेचे कामकाज सुरु असताना कोकाटें मोबाईलवर बोटांनी पत्ते सरकवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दिवा विझताना मोठा होतो, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.., असा टोलाही पवार यांनी लगावला आहे. (Rohit pawar slams Kokate)

या नव्या व्हिडीओमुळे कोकाटेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर विरोधी पक्ष, शेतकरी आणि सामाजिक संघटनांकडून टीकेची झोड उठली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोकाटे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यांनी मी रमी खेळलोच नाही, असा दावा करत राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. तसेच बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला. (Rohit pawar slams Kokate)

त्यानंतर आ. रोहित पवार यांनी २४ सेकंदाचे नवे दोन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करीत त्यात म्हटले आहे की, राजीनामा द्यावाच लागेल, सभागृहाचे कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. (Rohit pawar slams Kokate)
मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर